मुख्य सामग्रीवर वगळा

मैत्रीचा गाव

उगवतीचे रंग 

मैत्रीचा गाव  

काही दिवसांपूर्वी मी पुण्यात होतो. माझे चाळीसगावचे एक अतिशय जवळचे सहकारी सुद्धा पुण्यातच त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते. परवाच्या दिवशी सकाळी मला अचानक त्यांचा फोन आला. त्यांचा आवाज अगदी खोल गेला होता. मला म्हणाले, ' सर, माझे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे. मला एकदा भेटायला येऊन जा. ' त्यांचे आणि माझे नाते जरी मैत्रीचे असले तरी ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आम्ही सगळेच त्यांना अण्णा म्हणतो. अशा या अण्णांचा फोन आला आणि आम्ही दोघं तातडीनं त्यांना भेटायला गेलो. आम्ही आल्याचा अण्णांना कोण आनंद ! तशाही अवस्थेत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. काय सांगू, किती सांगू आणि कसं सांगू अशी त्यांची अवस्था झाली होती. शेवटी त्यांचा मुलगा म्हणाला, ' अण्णा, तुम्ही बोलू नका. मी सगळं सांगतो. ' 

गंमत म्हणजे आदल्या दिवशीच अण्णांना हॉस्पिटलमधून घरी सोडले होते. अण्णांना जास्त बोलायला डॉक्टरांनी मनाई केली होती. अण्णांनी पूर्ण विश्रांतीच घ्यावी, त्यांना कोणाच्याही फोनचा त्रास होऊ नये या हेतूने मुलांनी त्यांचा फोन काढून घेतला होता. पण तशाही परिस्थितीत अण्णांनी कुठून तरी फोन शोधला आणि पहिला फोन मला केला. त्यांना का वाटलं असेल की मला फोन करावा ? कुठून येते ही ओढ ? मी तर काही अण्णांचा जवळचा नातेवाईक नव्हतो. पण माणुसकीच्या आणि प्रेमाच्या नात्याने मी त्यांचा सगळ्यात जवळचा नातेवाईक होतो. आणि ते नाते मैत्रीचे ! हे नाते रक्तापलीकडचे असते. या नात्यात कोणी काही घेत नाही आणि कोणी काही देत नाही. देवघेव असते ती निखळ प्रेमाची. कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारं हे नातं म्हणजे मनुष्य जीवनातील एक सुंदर मुक्कामाचं ठिकाण. हा मैत्रीचा गाव प्रत्येकाचं जीवन आनंदानं उजळून टाकतो. अण्णांची भेट घेऊन आम्ही निघालो. अण्णा अगदी खुश होते. डॉक्टरांनी दिलेली औषधे तर त्यांच्याजवळ होतीच पण हा मैत्रीच्या औषधाचा डोस पोटात जाताच अण्णांचे दुखणे कुठल्या कुठे पळाले. लवकर बरे होण्यासाठी त्यांना आणखी ऊर्जा मिळाली. 

अलीकडे सगळ्या गोष्टींसाठी काही अटी असतात. कोणतीही जाहिरात पहा. तिथे कुठेतरी स्टारमार्क करून अगदी छोट्या अक्षरात का होईन पण ' अटी लागू ' असे लिहिलेलं असतं. मैत्रीच्या या नात्याला मात्र कुठल्याच अटी लागू  नसतात. किंबहुना अटी असतील तर ती मैत्री कसली ? तो तर व्यवहार ! मैत्री काही मागत नाही. ना वय, ना जातपात, ना धर्म, ना लिंग. कशाकशाचीही आवश्यकता नसते. मैत्री या सगळ्यांच्या पलीकडे असते. रक्ताच्या नात्यात निवडीला चॉईस नसतो. मैत्रीत मात्र तो मुबलक असतो. आवडणाऱ्या मित्रांशी मैत्री होते असे म्हणण्यापेक्षा ती त्यांच्यासोबत जुळते, फुलते आणि खुलते. तिचे रेशमी बंध घट्ट होत जातात. 

मैत्रीचं लावलेलं रोपटं बहरावं म्हणून काही काळजी जरूर घ्यावी लागते. मैत्रीत काही मिळण्याची अपेक्षा तर नसतेच ( म्हणजे ती नसावीच ! ) पण द्यायचं मात्र असतं आणि तेही परतीच्या अपेक्षेनं नाहीच. त्यात व्यवहार नसतोच ! मित्रानं विश्वासानं एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली तर ती प्राणापलीकडे जपायची असते. उद्या चुकून मैत्रीत अंतर पडलं तरी ती गोष्ट फक्त तुमच्यापाशीच ठेवायची असते. आणि सच्चे दिलदार मित्र या गोष्टी पाळतातच. 

खूप वर्षांपूर्वी अमिताभचा ' जंजीर ' हा चित्रपट आला होता. त्यात अमिताभ आणि प्राण यांच्या फार सुरेख भूमिका होत्या. प्राण आणि अमिताभ असतात सुरुवातीला एकमेकांचे वैरी. पण नंतर त्यांची मैत्री होते आणि मग या मैत्रीच्या अनोख्या नात्याचे प्रेक्षक साक्षीदार होतात. या चित्रपटातील मन्नाडे यांनी गायीलेलं गाणं फार सुदर आणि अर्थपूर्ण आहे. ते प्राणच्या तोंडी आहे. ' यारी हैं इमान मेरा, यार मेरी जिंदगी ' हे ते गाणं ! या गाण्यातल्या पुढील ओळी फार सुंदर आहेत...

छुपा ना हमसे हाल-ए-दिल सुना दे तू 

तेरे हंसी की किमत क्या हैं ये बता दे तू 

आपला मित्र उदास आहे, हसत नाही हे पाहिल्यावर सच्च्या मित्राला दुःख होते. त्याच्या फक्त एका हसण्यासाठी तो वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो. 

कहे तो आसमांसे चाँदतारे ले आऊं 

हंसी जवां और दिलकश नजारे ले आऊं 

असे असतात खरे मित्र. अनेक चित्रपटातून ही दोस्तीची अजरामर कथा चित्रित झाली आहे. शोले मधील ' ये दोस्ती हम नही तोडेंगे..' किंवा याराना मधील 'तेरे जैसा यार कहाँ ' किंवा ' बने चाहे दुश्मन जमाना हमारा... हे दोस्ताना चित्रपटातील गीत असो. अशी गाणी ही हृदयाला हात घालतात. 

श्रीकृष्ण आणि सुदामा, श्रीराम आणि सुग्रीव यांच्या मैत्रीच्या कथा तर प्रसिद्धच आहेत. दुर्योधन आणि कर्णाची मैत्रीही प्रसिद्ध आहे. पण त्या मैत्रीत थोड्या नकारात्मक छटा आहेत. दुर्योधन कर्णाकडे अर्जुनाचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो तर कर्ण हा दुर्योधनाच्या मैत्रीच्या ओझ्याखाली दबलेला असतो. आपण दुर्योधनाची बाजू घेतो हे योग्य आणि न्याय्य नाही हे त्याला माहिती असते पण तो काही करू शकत नाही.  सगळ्यात भावणारी मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामा यांची आहे. श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आहे पण त्याला भेटायला जाताना गरीब सुदामा फक्त पोहे घेऊन जातो आणि श्रीकृष्णही अत्यंत आवडीने ते भक्षण करतो. जेव्हा द्वारपाल सुदाम्याला अडवतात हे श्रीकृष्णाला कळते, तेव्हा तो स्वतः त्याच्या स्वागताला जातो. त्याची नगरी सोन्याची करतो. या सगळ्यात केवळ निखळ मैत्री आणि प्रेम आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन, श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची मैत्री अशीच मनभावन आहे. 

हे वर्ष आता संपत आले आहे. हे वर्ष, गेली अनेक वर्षे आणि येणारी पुढील अनेक वर्षे मैत्रीची संजीवनी देत मला आणि तुम्हाला आम्हाला जगवत आहेत. गेल्या काही वर्षात खूप जिवलग मित्र मैत्रिणी मिळाल्या. त्यातील काही तर माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि मानाने मोठे आहेत पण कुठल्याही अपेक्षेशिवाय ही मैत्री पुढे जाते आहे. मैत्रीच्या बिया छान रुजल्या आहेत. त्या जोपासतो आहे. मैत्रीबद्दल बोलताना पु ल देशपांडे म्हणतात 

रोज आठवण व्हावी असे काही नाही 

रोज भेट व्हावी असेही काही नाही 

रोज बोलणं व्हावं असंही काही नाही 

पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री 

आणि 

तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. 

मैत्रीबद्दल लिहिताना मला सुचलेल्या काही ओळी 

प्रत्येकाच्या हृदयात मैत्रीचा एक गाव असावा 

त्या गावात असावेत हक्काने राहणारे मित्र मैत्रिणी 

कधी वाटले काही सांगावेसे तर 

जावे खुशाल हक्काने त्यांच्याकडे 

कराव्या मोकळ्या आपल्या भावना 

मैत्रीत वाटून घेता येते सारे 

उणावते दुःख आणि दुणावतो आनंद 

अशा मित्रांकडे काही काळ जावे 

सुखदुःख सारे वाटून घ्यावे 

असावा असा मैत्रीचा गाव 

मित्र मित्र म्हणता म्हणता वाढत जावा 

मैत्रीचा परीघ 

वाढता वाढता तो विश्वव्यापी व्हावा. 

माझे अनेक वाचक सुद्धा माझ्या जिवाभावाचे मित्र बनले आहेत. काहींना प्रत्यक्ष भेटलो आहे तर काहींची अजून भेट नाही. पण त्या सगळ्यांची या निमित्ताने आठवण करतो आणि पुढील येणाऱ्या अनेक वर्षात ही मैत्री अशीच ' अभंग ' राहील असे वचन देऊन थांबतो. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२९/१२/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...