मुख्य सामग्रीवर वगळा

एक नवी सकाळ तुमची वाट पहात आहे

 उगवतीचे रंग 

 एक नवी सकाळ तुमची वाट पहात आहे 

२०२३ चा आज शेवटचा दिवस आणि उद्याची सकाळ असणार आहे नवीन वर्षाची. सकाळ असेल रोजच्यासारखीच ! पण आठवड्याची सुरुवात ज्या वाराने होते, तो सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस असेल आणि २०२४ ची नवीन कोरी करकरीत सकाळ आपल्या स्वागतासाठी सज्ज असेल. या प्रसंगी मला कविवर्य भा. रा. तांबे यांची ' मावळत्या दिनकरा ' ही कविता आठवते आहे. उगवत्या सूर्याला वंदन करणारे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणारे हे जग ! पण ज्या मावळत्या सूर्याने मला आजचा दिवस दिला, त्याच्याबद्दल मी कृतज्ञ राहायला नको का ? माझा उद्या हा आजच्या पायावरच उभा असणार आहे. कविवर्य तांबे जसे मावळत्या दिनकराला वंदन करतात, तसे मीही मावळत्या वर्षाला करतो. कारण २०२३ च्या पायावरच २०२४ उभे असणार आहे. २०२३ ने मला आणि तुम्हाला खूप काही दिले आहे. 

आर्थिक वर्ष संपत आलं की बँका, वित्तीय संस्था, करसल्लागार त्या त्या वर्षाचा हिशेब मांडतात. जमा बाजू, खर्चाची बाजू, हातात राहिलेली शिल्लक वगैरे. त्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा किती झाला याचाही हिशेब केला जातो. तसंच आपल्या आयुष्यातलं जाणारं वर्ष आपल्याला काय देऊन गेलं आणि आपल्याकडून काय घेऊन गेलं याचाही हिशेब आपण मांडायला हवा. मला जो हिशेब या ठिकाणी अपेक्षित आहे तो हिशेब फक्त पैशांचा नाही. २०२३ च्या आधीची वर्षे कोरोनाचा भयंकर अनुभव देऊन गेली. आपण सगळे भाग्यवान आहोत की कोरोनाच्या भयंकर काळातही आपण जगलो, वाचलो आणि आता तर नव्या वर्षाला सामोरे जात आहोत. २०२३ मध्ये तसा पाऊस खूप पडला. अनेक भागात तर दुष्काळाची स्थिती आहे. ऐन हिवाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते आहे. शेतीमालाला भाव नाही, महागाई, बेकारी यांच्यासारखे प्रश्न आहेतच. या सगळ्या तशा पाहिल्या तर नकारात्मक बाजू आहेत सरत्या वर्षाच्या. पण जमेची बाजू फार मोठी आहे. 

आधीच्या वर्षांमध्ये कोरोना आणि विविध साथीच्या रोगांनी आमच्या सहनशक्तीची जणू परीक्षा घेतली. अजूनही तो धोका टळलेला नाहीच. या वर्षासह मागील काही वर्षे आमच्याकडून खूप काही घेऊन गेली. जातीजातीतील सलोखा कमी होऊन संघर्ष अधिक टोकदार झाला. राजकीय पक्षांनी तर जणू आपली विश्वासार्हता मोडीतच काढली.राजकीय नेत्यांच्या कोलांट्याउड्या पाहून सामान्य माणूस  भांबावला,स्तिमित झाला. जिकडे सत्तेचे लोणी खायला मिळेल तिकडे साऱ्यांची धाव दिसून आली. एकमेकांवर अगदी क्षुल्लक कारणांवरून आरोप करून बोलताना आपली पातळी सोडल्याचे दिसून आले. आपणच यांना निवडून दिले का आणि दिले तर का दिले असाही प्रश्न पडावा अशी सगळी परिस्थिती. पण तुमच्या माझ्यासारखा  सामान्य माणूस अजूनही आपली नैतिकता सांभाळून आहे, आपले मानसिक संतुलन सांभाळून आहे. जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती तशीच आहे. संकटाना, साथीच्या आजारांना तोंड देण्याची विजिगिषु वृत्ती जोपासून आहे. त्याची उमेद, त्याचा उत्साह सरत्या वर्षाने हिरावून घेतलेला नाही. ती संकटे, त्या गोष्टी त्याला पराभूत करू शकल्या नाहीत ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. आणि हीच सरत्या वर्षाची भेट आहे. 

२०२४ हे वर्ष कसे असेल, त्यात कोणकोणत्या घटना घडतील हे आज आपण सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित होईल. राम मंदिर होते आहे. राम, कृष्ण आणि शिव या दैवतांनी आपल्या भारतवर्षाचे वस्त्र उभ्या आडव्या धाग्यांनी विणले आहे. रामराज्याचे गोडवे आपण गातो. त्रेता युगात प्रभू रामचंद्र होऊन गेले. पण आजही इतकी युगे लोटल्यानंतर रामराज्याचे आकर्षण आम्हाला का वाटते ? त्याचे कारण म्हणजे रामराज्य हा भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाळ होता. त्या काळातील लोकांच्या जीवननिष्ठा अभंग होत्या. नैतिक मूल्ये उच्च प्रतीची होती. स्वयंशिस्त होती. स्वच्छता राखा, एकमेकांचा सन्मान करा, जीवनातील सुखांचा शांततेने आणि संयमितपणे आनंद घ्या यासारख्या गोष्टी शाळांमध्ये शिकवल्या जात नव्हत्या, नागरिकशास्त्राचे पाठ ते लोक कदाचित शाळेत गिरवत नसतील, पण या सगळ्या गोष्टींचे पालन मात्र काटेकोरपणे करीत होते. श्रीमंत माणूस तर कर देत होताच पण गरिबातल्या गरीब माणसालाही मी समाजाचं काहीतरी देणं लागतो असं वाटत होतं. त्या भावनेतून तोही कर देत होता. त्या काळातील मंदिरे ही सांस्कृतिक केंद्रे होती. मंदिरातून भक्तिभाव वाढीला लागत होता आणि समाजशिक्षण होत होते.  या सगळ्या आदर्श गोष्टींना कारण म्हणजे त्या काळातील शिक्षणपद्धती तर होतीच पण त्या काळातील ऋषीमुनींनी आणि राजांनी या सगळ्या गोष्टी रुजवण्यासाठी पिढ्यानपिढ्या त्याग केला होता, आपले रक्त आटवले होते. असा समाज उगाच निर्माण होत नाही. त्यासाठी त्याग करणारे आणि उच्च जीवनमूल्ये आचरणात आणणारे आचार्य आणि राजकीय नेते असावे लागतात. तसा समाज घडवण्यासाठी त्यांच्याजवळ इच्छाशक्ती असावी लागते. 

 राममंदिर होणार याचा आनंद आहेच पण उच्च नैतिक मूल्ये, शांत, समाधानी आणि संयमित जीवन जगणारा समाज, एकमेकांचा आदर करणारे नागरिक, गुरुजनांना शीर्षस्थानी बसवणारा आदर्श समाज निर्माण करायचा असेल, तर तो जाणीवपूर्वक घडवावा लागेल. प्रभू श्रीरामांचे गुण अंगी बाणवावे लागतील. रामाचे अतिशय सुंदर, भव्य आणि देखणे मंदिर भलेही आम्ही निर्माण करू, पण रामराज्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्याचाच संकल्प या नवीन वर्षात करू या. 

हा संकल्प करतानाच निसर्गाचे स्रोत मर्यादित आहेत. ते मी जपून वापरीन, पाणी, ऊर्जा, जलसाठे या गोष्टी मर्यादित आहेत. त्या मी काटकसरीने वापरेन. प्लास्टिकचा वापर शक्य होईल तितका कमी करेन. माझं आणि माझ्या कुटुंबाचं हित साधताना मी समाजाचं सुद्धा काही देणं लागतो या भावनेतून माझ्या उत्पन्नातील किमान दहा वीस टक्के भाग  समाजाच्या हितासाठी वापरेन असेही काही नवीन संकल्प नवीन वर्षात घेऊ या. आपली दृष्टी जाणीवपूर्वक विशाल करू या. 

याप्रसंगी मला आपले माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ओळी आठवत आहेत. आपल्या ' आओ फिरसे दिया जलाये ' या कवितेत ते म्हणतात 

हम पडाव को समझे मंजिल 

लक्ष्य हुआ आँखोंसे ओझल 

वर्तमान के मोहजाल में 

आनेवाला कल न भुलायें

आओ फिरसे दिया जलाये ।

सगळीकडे निराशाजनक वातावरण असताना अंतरातील स्नेहाने ही ज्योत आपल्याला पुन्हा प्रज्वलित करायची आहे असे अटलजी म्हणतात. नवीन वर्षाची सकाळ त्यासाठीच जणू आपली वाट पाहते आहे. नवीन वर्षात शक्ती, बुद्धी आणि धैर्य देण्यासाठी रामरायाचे स्मरण करू या. 

मनी धरावे ते होते । विघ्न अवघेचि नासोनि जाते । कृपा केली रघुनाथे । प्रचिती येते ।। श्रीराम ।।

आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

३१/१२/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 










टिप्पण्या