मुख्य सामग्रीवर वगळा

चरैवती चरैवती

 उगवतीचे रंग 

चरैवती चरैवती 

तसे आमचे संस्कृत लहानपणापासून कच्चे. आता अर्थात ते सुधारण्याचा संभव कमीच ! संस्कृतमध्ये काही काही शब्द वेगळ्या अर्थाने येतात. आपल्या मराठीत आणि त्यांच्या मूळ अर्थात फरक असतो. पण आम्हाला हे सांगतो कोण ? लहानपणी रामरक्षा म्हणायचो. अर्थ कळायचा नाही. रामरक्षा म्हणताना ' रामम रमेशम भजे ' असे शब्द यायचे. लहानपणी ' भजे ' म्हणजे भजणे किंवा आळवणे  हा अर्थ माहितीच नव्हता.  पुढे तो केव्हा तरी कळला. तोपर्यंत देवासमोर बसून रामरक्षा म्हणताना हे शब्द आले की आम्हाला भजेच आठवायचे. कधी कधी रामरक्षा म्हणताना समोर डिशमध्ये गरमागरम भजी ठेवली आहेत, आणि ते स्तोत्र म्हणत असताना ती अधूनमधून तोंडात टाकतो आहोत अशी कल्पनाही यायची. 

तसेच कधीतरी ' चरैवती चरैवती ' हे शब्द कानावर पडले होते. मूळ अर्थ माहित असण्याचे काही कारणच नव्हते. लहानपण एका अगदी छोट्याशा खेड्यात गेले. आमच्याकडे शेती असल्याने गाई, बैल वगैरे असायचेच. सकाळी गाई चरायला जायच्या. बैल रिकामे असले तर शेतात चरायला सोडले जायचे. बकऱ्या देखील चरून यायच्या. घरात सुद्धा आम्ही स्वयंपाकघरातील डबे उचकून काही खायला मिळते का हे पाहत असायचो. तेव्हा घरातल्या कोणाचे तरी बोल कानावर पडायचे, ' सारखा चरत असतोस ' त्यामुळे चरणे म्हणजे सतत खाणे हा अर्थ आमच्या मनात अगदी फिट्ट बसला होता. म्हणून जेव्हा ' चरैवती चरैवती ' शब्द कानावर पडले तेव्हा त्यांचा या चरण्याशी म्हणजेच खाण्याशी संबंध असावा असे आमच्या बालबुद्धीस वाटून गेले असल्यास नवल नाही ! त्यामुळे ऋग्वेदात सुद्धा आपल्याला आवडणारी काहीतरी गोष्ट सांगितली आहे हे लक्षात येऊन आम्हाला अतिशय आनंद झाला होता. 

नंतर कधीतरी महर्षी चार्वाकांचा पुढील 'श्लोक कानी पडला होता. त्यात म्हटलं होतं 

यावज्जीवेत सुखं जीवेद ऋणं कृत्वा घृतं पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥'

यात ते म्हणतात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते सुखाने जगून घ्या. हवं तर कर्ज काढून दूध तूप खा प्या. ( कर्ज घ्यावे की नाही, ते फिटेल की नाही याची चिंता करू नका )अहो, जोपर्यंत शरीर आहे, तोपर्यंत मौजमजा करून घ्या. एकदा शरीर नष्ट झाले की संपले सगळे. खरं तर भौतिक गोष्टींचा मोह धरणे ही चांगली गोष्ट नाही. अध्यात्मात तर हे सगळं नश्वर म्हणजे नष्ट होणारं आहे. ब्रह्म सत्य, जग मिथ्या. वगैरे आमच्या कानावर पडत होतं. पण ते पटायला पाहिजे ना ! त्यामुळे त्याच्या बरोबर विरुद्ध  सांगणारा चार्वाक आम्हाला जवळचा वाटू लागला. पुढे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यासारख्या काही लोकांनी बँकांकडून कर्जे घेऊन चार्वाकांचा उपदेश अमलात आणला. 

पण पुढे काळाच्या ओघात अस्मादिकांचे जसजसे शिक्षण वगैरे होत गेले, तसतसे मनावर संस्कार की काय म्हणतात ते झाले असावेत आणि चार्वाक, चरैवती चरैवती वगैरे आम्ही साफ विसरलो. खायचं ते जगण्यासाठी. खाण्यासाठी जगायचं नाही वगैरे गोष्टी लक्षात आल्या. जीवनाचं ध्येय महत्वाचं वगैरे वगैरे यासारख्या मोठमोठ्या शब्दांचा पगडा मनावर बसला. आणि पुढे दोन तीन दीक्षितांनी आमच्या मनावर प्रभाव टाकला. त्यापैकी एक माधुरी दीक्षित होती. पण तिचे केवळ चित्रपट पाहण्यातच आम्ही धन्यता मानली. पुढे जे दोन दीक्षित आले त्यात एक होते स्वदेशीचा पुरस्कार करणारे राजीव दीक्षित आणि दुसरे जगन्नाथ दीक्षित. या मंडळींनी तर आरोग्यासंबंधी अशा काही गंभीर गोष्टी सांगितल्या की आम्ही आहारावर नियंत्रणच आणून टाकले. फक्त दोन वेळा खायचे. मध्ये मध्ये काही वाटले तरी खायचे ( चरायचे ) नाही. आणि त्या मार्गावरच वाटचाल सुरु होती. तसे आमच्या किरकोळ शरीरयष्टीकडे पाहून काही लोक सांगत होते की तुम्हाला हे करायची आवश्यकता नाही. पण आमच्यावर दीक्षितांचा प्रभाव पडला होता. त्यामुळे आम्ही सकाळी आणि चार वाजताच चहा फक्त घ्यायचो. तेवढ्या बाबतीत दीक्षितांनी आम्हाला आमच्याकडे पाहून माफ केलेच असते. पण तसे व्हायचे नव्हते. 

झाले असे की परवा आम्ही जरा लांबचा प्रवास करून आलो. पण प्रवासात कशाने तरी तब्येत बिघडली. तुम्ही म्हणाल खाण्यापिण्यात काही तरी गडबड झाली असावी. पण नाही हो, आम्ही काळजी घेत होतो. दीक्षितांचे म्हणणे जरी कटाक्षाने पाळले नाही तरी खाताना त्यांची आठवण करून खात होतो. आणि पिण्याचे म्हणाल तर आम्ही पाण्याशिवाय आणि चहाशिवाय दुसरे काही पीत नाही. त्यामुळे प्रवासात बाटलीबंद पाणीच प्यायलो. आयुष्यात बाटलीला हात लावला असेल तर तो पाण्यासाठीच ! असो. पण व्हायचे ते झाले. सर्दी, ताप वगैरेंनी त्रस्त होऊन शेवटी डॉक्टरांना शरण गेलो. त्या डॉक्टरांनी गोळ्या औषधे तर दिलीच पण जो काही सल्ला दिला तो फार आवडला. ते म्हणाले, ' दिवसातून चार पाच वेळा थोडे थोडे खात जा . ( आपल्या भाषेत ' चरत जा ' ) म्हणजे पोट व्यवस्थित भरेल. आणि तब्येतीच्या तक्रारी राहणार नाहीत. ' बरं ज्यांनी हा सल्ला दिला ते डॉक्टर पुण्याचे आणि अनुभवी. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष थोडेच करता येणार ? तरी त्यांना मी भीत भीतच माझ्या मनातील शंका विचारली. ' डॉक्टर, पण ते दीक्षित तर दोनपेक्षा जास्त वेळा खाऊ नका म्हणतात. ' यावर डॉक्टर फक्त हसले. ( बहुधा मनातल्या मनात असं म्हणत असतील की काय मूर्ख माणूस आहे हा ! मी सांगतो यावर याचा विश्वास दिसत नाही. ) मग ते म्हणाले,' अहो, सर्वांसाठी तसं आवश्यक नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. ' 

मग काय पुन्हा ' चरैवती चरैवती ' आठवलं. खरं तर चरैवती चरैवती म्हणजे चालत राहा. चालणं आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही ते दोन्ही अर्थानं घेतलं इतकंच. आता बघू या. डॉक्टरांचा सल्ला पाळतो आहे. त्याप्रमाणे चालत राहू. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१९/१२/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...