मुख्य सामग्रीवर वगळा

आभासी जगातील हिरवळ

 उगवतीचे रंग 

आभासी जगातील हिरवळ 

आजकाल संगणक, मोबाईल यांच्या जाळ्यात आपण सारेच अडकलो आहोत. या गोष्टी आता प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्या आहेत असे म्हटले तरी वावगे होणार नाही. पण यावरील माणसे, जग या सगळ्या गोष्टींना आपण आभासी जग ( virtual world ) म्हणत असतो. काही लोक कायम याच विश्वात वावरतात. त्यांना आभासी जगात वावरणारे असे आपण म्हणतो. आभासी म्हणजे जे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही पण मोबाईल, संगणकावर दिसतात अशा गोष्टी. या अशा आभासी जगात वावरणाऱ्यांना आपण बऱ्याचदा नावेही ठेवत असतो. कारण यात बऱ्याचदा फसवणूकही होते. पण अशा या आभासी जगातही हिरवळीची काही बेटं आढळून येतात. सगळ्याच गोष्टी पूर्णपणे वाईट किंवा टाकाऊ नसतात. आपण त्यांचा वापर कसा करतो यावर बरेच काही अवलंबून असते. ही अशीच काही या वाळवंटातील हिरवळीची उदाहरणे. 

साहित्य संस्कृती मंच या नावाचा एक व्हाट्सअप समूह आहे. गेल्या महिन्यात म्हणजे २५ आणि २६ नोव्हेंबर या दिवशी या समूहाने माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच एक साहित्य संमेलनवजा गेट टुगेदर आयोजित केले होते. या समूहात प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि इतरही काही प्रांतातील साहित्यिक आणि साहित्य प्रेमी मंडळी आहेत. मराठी भाषेवरील प्रेम हा या सगळ्यांमधील समान धागा. याच धाग्याने सर्वांना जोडून ठेवले आहे. याच प्रेमामुळे भौगोलिक अंतर कितीही असले तरी आपल्या माणसांसाठी, आपल्या भाषेसाठी सारे एकत्र आले. अनेक वर्षांपासून केवळ व्हाट्सअपवर एकमेकांशी संपर्कात असलेली लेखक, कवी, कथाकार आदी मंडळी या निमित्ताने एकत्र आली. एकमेकांशी प्रत्यक्ष भेटता आले, बोलता आले आणि सहवासाचा आनंद घेता आला. सहभोजनाचा लाभ घेता आला. या आनंदाचे वर्णन शब्दात करता येणार नाही. 

जळगावच्या जैन हिल्स परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. जळगावमधील प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून या परिसराची निर्मिती झाली. याच परिसरात खरोखरीच एखाद्या तीर्थक्षेत्राचे रूप धारण केलेले गांधीतीर्थ आहे. म. गांधींच्या जीवनावर अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांना येथे विपुल साधन सामुग्री उपलब्ध आहे. राहण्याची सोय आहे. ही आधुनिक तीर्थक्षेत्रेच आहेत. पालकांनी आवर्जून मुलांना दाखवावीत अशी. आता भवरलालजींचे चिरंजीव  अशोक जैन या सगळ्या गोष्टींवर देखरेख ठेवतात. या परिसरात अनेक सुदर कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. या सगळ्या गोष्टींना अशोकजींचा सक्रिय पाठिंबा असतो. 

या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, अशोकजी जैन, सुप्रसिद्ध हास्य कवी अशोकजी नायगावकर, ज्येष्ठ कवी अरुणजी म्हात्रे आदी दिग्गज मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन ज्यांच्या कल्पनेतून साकारले आणि ज्यांनी प्रचंड मेहनत ज्यांनी घेतली ते प्रा. डॉ. श्रीकांत तारे, बऱ्हाणपूर येथील पूर्णिमाताई हुंडीवाले प्रत्येक सदस्याकडे आवर्जून लक्ष देत होते. त्यांना प्रा. संजय दहाड, ऍड सुशील अत्रे आदींची सक्रिय साथ होती. जळगावचे नाट्यकर्मी शंभू पाटील होते. प्रा. संजय बारी यांचे बहारदार सुत्रसंचलन, जळगावच्या भगिनी वर्गाने आपल्या नृत्यगीतांतून साकारलेला माय मराठीचा जागर सर्वाना आनंदित करून गेला. प्रकाशक आणि लेखक यांना येणाऱ्या समस्यांवर एक मनमोकळे चर्चासत्र झाले. अतिशय बहारदार असे काव्यसंमेलन झाले. अरुण म्हात्रे यांनी मार्मिक काव्यपंक्तींनी केलेले सुत्रसंचलन सगळ्यांनाच सुखावत होते. कवितांचे विविध प्रकार सादर झाले. काव्यातील रस, रंग, गंध श्रोत्यांपर्यंत यशस्वी पोहोचत होता. मला काही आवश्यक कारणामुळे लवकर निघून जावे लागल्यामुळे संध्याकाळी अशोकजी नायगावकर आणि अरुणजी म्हात्रे यांच्या काव्याच्या जुगलबंदीचा आनंद आणि दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांचा आनंद घेता आला नाही. पण उपस्थितांनी त्याचा जो वृत्तांत नंतर शब्दबद्ध केला, त्यावरून काहीतरी चांगल्या गोष्टींना आपण मुकल्याची जाणीव झाली. 

पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मात्र खूप जिवाभावाची माणसे भेटली. मागे बऱ्हाणपूरला मी एका व्याख्यानानिमित्त गेलो होतो. तेथील मराठी प्रेमी मंडळींनी त्या प्रांतातही माय मराठीचे जतन, संवर्धन करण्याचे व्रत घेतले आहे. तिथे ज्या मंडळींचा परिचय झाला होता, त्यातील काही मंडळी जळगावच्या या साहित्य संमेलनासाठी आली होती. पूर्णिमाताई हुंडीवाले, उज्ज्वलाताई कापडिया, विद्याताई श्रॉफ या भेटल्या. ज्यांच्या कविता नेहमी वाचत असतो अशा गीताताई  गद्रे, कांचनताई संगीत यांची भेट झाली. मूळ चाळीसगावच्या पण सध्या पुण्यात वास्तव्यात असलेल्या अनिताताई देशमुख भेटल्या. या ग्रुपवर अनेक मान्यवर आणि दिग्गज साहित्यिक, कवी आहेत. त्यांचीही उपस्थिती आनंददायी होती. सगळ्यांचीच नावे घेणे शक्य नाही. पण या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य हे जाणवले की आयोजकांनी आलेल्या प्रत्येकाची दखल घेतली, सन्मान केला. 

महाराष्ट्र मित्र या व्हाट्सअप समूहाचे पण दोन वेळा असेच सुदर असे गेट टुगेदर पुण्यात दोन वेळा झाले. त्यातही अनेक नामवंत साहित्यिकांचा समावेश आहे. प्रशांतजी गौतम यांनी मोठ्या कौशल्याने आणि प्रेमाने  सगळ्यांनी एकत्र बांधून ठेवले आहे. मनमंदिर हा असाच एक ग्रुप. विभाताई देशपांडे, गिरीशजी वसेकर आणि त्यांचे सहकारी ही या ग्रुपला बांधून ठेवणारी मंडळी. या गृपनेही पुण्यात दोन वेळा एक दिवशीय कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करून सगळ्यांच्या गाठीभेटी घडवून आणला. प्रत्यक्ष सादरीकरणाला वाव दिला. माझा उगवतीचे रंग हाही असाच  एक समूह. पुण्यात गेल्यावर या ग्रुपमधील सदस्यही भेटत असतात. कुठल्या तरी निमित्ताने आम्ही एकत्र येतो, एकमेकांना भेटतो, विचारांची देवाणघेवाण होते. आम्हां वर्गमित्रांचा फ्रेंड्स फॉरेव्हर हा ग्रुप असेच एकत्र येऊन एकमेकांच्या भेटी घेतो, कार्यक्रमांचे आयोजन करतो. चाळीसगावच्या बागेतील जॉगिंग करणाऱ्या मंडळींचा देखील असा समूह आहे. 

हे असे कार्यक्रम आयोजित करणारे समूह म्हणजे आजच्या आभासी जगातील हिरवळच म्हटली पाहिजे. ही सगळी मंडळी एकत्र येऊन केवळ  मनोरंजनाचे कार्यक्रमच आयोजित करीत नाहीत तर मराठी आणि एकूणच भारतीय संस्कृतीच्या वाढीला हातभार लावतात. काही समूहांच्या कार्यक्रमांमुळे नकळत वाचन संस्कृतीला हातभार लावला जातो. नवीन कवी, लेखकांना मार्गदर्शन, प्रेरणा मिळते. समविचारी मंडळी एकत्र आल्याने अनेक चांगल्या विधायक गोष्टी घडून येतात. चांगल्या विचारांचा जागर होतो. आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण आपल्या कामात हरवून गेला आहे. पण त्यातून असे चारदोन दिवस वेळ काढून एकत्र येता येते. रोजच्या दगदगीच्या जीवनातून काही काळ का होईना पण विसाव्याचे आणि आनंदाचे क्षण मिळतात. आपले विचार मांडता येतात, मन मोकळे करता येते आणि अशा कार्यक्रमातून रिचार्ज होऊन पुन्हा आपण नवीन उत्साहाने आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळू शकतो हीच या अशा कार्यक्रमांची फलश्रुती म्हणावी लागेल. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०४/१२/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...