उगवतीचे रंग
लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता
पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील पूर्वग्रहदूषित नजरेने पाहत आहोत. परंतु त्यांचे खरे कर्तृत्व जाणून घेऊन त्यापासून योग्य तो बोध जर घेता आला तरच समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकतो. अहिल्याबाईंच्या बाबतीतही असेच काहीसे झाले आहे. त्यांच्याकडे आपण केवळ एक धार्मिक व्यक्तिमत्व आणि साध्वी या स्वरूपातच बघतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतर अत्यंत महत्वाचे पैलू दुर्लक्षित राहिले आहेत. त्या स्त्री स्वातंत्र्याच्या अग्रदूत आणि आद्य क्रांतिकारी महिला होत्या. भारतीय संस्कृतीची पारंपरिक चौकट न मोडता पुरोगामी विचारांचा स्वीकार करून त्यांनी भारतीय संस्कृतीला नवे आयाम दिले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना इतिहास, संस्कृती, वर्तमानातील समाजजीवन आणि राष्ट्रीय राजकारणाचे उत्तम ज्ञान होते. राजकीय मुत्सद्देगिरी त्यांच्या ठायी होत्या. पण त्याचबरोबर सत्तेचा वापर लोककल्याणासाठी करायचा हे ब्रीद त्यांनी आयुष्यभर जपले.
भारतीय इतिहासात राजे, महाराजे, योद्धे आणि संतांचे मोठे स्थान आहे. परंतु, ज्यांनी प्रशासन, समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि नीतीमूल्यांचा संगम घडवून आणला, अशा विरळ व्यक्तिमत्त्वांमध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा समावेश होतो. अठराव्या शतकातील भारत हे युद्धग्रस्त, राजकीय अस्थैर्याने भरलेले आणि सामाजिक अन्यायाने वेढलेले होते. अशा काळात एक विधवा स्त्री – जी शिक्षित, नीतिवान आणि न्यायप्रिय होती – तिने संपूर्ण राज्य केवळ यशस्वीपणे चालवलं नाही, तर त्याला आध्यात्मिक व नैतिक अधिष्ठान दिलं.
महेश्वर देवता महिता
अहिल्या हिता राज्ञी विहिता |
प्रजा रक्षिता बालसम्मिता
शंकर पूजा सदैव चरिता,
भवती दर्शने कृतार्थता ||
अहिल्याबाईंनी आपल्या कार्याने हे सिद्ध केलं की उत्तम राज्यकर्त्याचा पाया स्त्री किंवा पुरुष असा लिंगाधिष्ठित नसतो, तर मूल्यांवर आधारित असतो. त्यांचे जीवन म्हणजे कठीण परिस्थितीवर मात करून कर्तव्यानिष्ठेने उभं राहण्याचं उदाहरण आहे. त्यांनी केवळ इंदूरसारख्या संस्थानात शासन केलं नाही, तर भारतभर मंदिरे बांधून, धर्मस्थळांचा जीर्णोद्धार करून एक अध्यात्मिक चळवळही चालवली. त्यांनी दिलेलं योगदान इतकं समृद्ध आहे की आजही त्या केवळ ऐतिहासिक नव्हे, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून स्मरणात आहेत.
त्यांचं राज्य म्हणजे लोककल्याण, नैतिक मूल्यं, न्याय, आणि धर्मसहिष्णुता यांचं मूर्तिमंत रूप होतं. 'राजा हा प्रजेचा सेवक असतो ' हे तत्व त्यांनी फक्त बोलून नाही, तर आपल्या कृतीतून दाखवलं. त्यांच्या न्यायनिवाड्याच्या अनेक कथा आजही मोठ्या आदराने सांगितल्या जातात. अहिल्याबाईंची कामगिरी समजून घ्यायची असेल, तर त्यांच्या जीवनप्रवासाचा बारकाईने मागोवा घ्यावा लागेल – एक सामान्य मुलगी ते राणी, राणी ते सत्ताधीश आणि अखेर लोकमाता असा झालेला त्यांचा प्रवास नुसता प्रेरणादायी नाही, तर आजच्या काळातही अनुकरणीय आहे. त्यांचा हा जीवन प्रवास आजच्या राज्यकर्त्यांना देखील मार्गदर्शक आहे.
आज जेव्हा शासनकर्त्यांकडून जबाबदारीचा अभाव, नैतिक अध:पतन आणि जनतेपासून दुरावलेली धोरणं दिसतात, तेव्हा अहिल्याबाई होळकरांचे कार्य एखाद्या तेजोदीपासारखे मार्गदर्शक ठरते. स्त्री सत्तेचा हा आदर्श आपल्या इतिहासात किती खोलवर रुजलेला आहे हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावाच लागेल.
या महाराष्ट्र कन्येचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या लहानशा गावी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव माणकोजी शिंदे आणि आई सुशीला तथा अंबाबई हे दोघेही कष्टकरी मेंढपाळ होते. आर्थिक दृष्ट्या परिस्थिती सर्वसामान्य होती पण त्यांचं मन उदार आणि प्रबुद्ध होतं. अहिल्याबाई लहानपणापासूनच शांत, मनस्वी, बुद्धिमान आणि जिज्ञासू म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या घराजवळ असणाऱ्या मारुती मंदिरातील तात्या पंतोजी तेथील काही मुलांना शिकवत. त्यांचा या चुणचुणीत मुलीवर फार जीव होता. त्यांच्या आणि आई-वडिलांच्या सत्संगामुळे अहिल्याबाई विविध संस्कारांनी संस्कारीत होत्या. संतांचे अनेक अभंग, आरत्या त्यांना तोंडपाठ झाल्या होत्या. अनेक पुराणकथांचे श्रवण करून त्यातील बोध त्यांनी अंतरंगात मुरवला होता.
त्या काळात मुलींना शिक्षण देणं हे फारसं प्रचलित नव्हतं. पण माणकोजींनी या परंपरेविरुद्ध जाऊन आपल्या मुलीला लिहिणे-वाचणे शिकवले. वयाच्या सातव्या–आठव्या वर्षीच तिने रामायण, महाभारत आणि संतवाङ्मय याचा अभ्यास सुरू केला होता. अहिल्याबाईंमध्ये तेवढ्याच वयात नीतिकथा, दयाळूपणा आणि समतेची बीजं पेरली गेली. अहिल्याबाई या शिवभक्त होत्या. सीना नदीच्या वाळवंटी आपल्या मैत्रिणींना घेऊन त्या शिवलिंग तयार करीत आणि त्याला पाणी - फुले वाहून भक्ती भावाने पूजा करीत. हाच त्यांचा आवडता खेळ आणि विरंगुळा होता.
मल्हारराव होळकर – हे मराठा साम्राज्याचे एक महत्वाचे सेनापती. थोरले बाजीराव आणि मल्हारराव चौंडी येथे मुक्कामास असताना त्यांना अहिल्याबाई दिसल्या. ती शांत, प्रसन्न चेहऱ्याची, पण बुद्धिमान आणि चुणचुणीत असलेली मुलगी त्यांना आवडली. त्यांच्या लक्षात राहिली. त्यांनी आपल्या पत्नी गौतमीबाई यांच्याशी बोलून ती आपली सून व्हावी अशी इच्छा प्रकट केली. त्यावेळी अहिल्याबाई होत्या फक्त आठ वर्षांच्या आणि खंडेराव बारा वर्षांचे होते. या विवाहाला थोरवे बाजीराव यांचा सक्रिय पाठिंबा होता.
लग्नानंतर अहिल्याबाई इंदूरला गेल्या आणि त्या घरातील संस्कृती, रीती रिवाज त्यांनी आत्मसात केले. लवकरच त्या एक सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, आज्ञाधारक आणि बुद्धिमान सून म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. खंडेराव यांच्या सहवासात त्यांनी राणी म्हणून नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी स्वतःला घडवायचं ठरवलं. त्या त्यांच्यासोबत मोहिमांवर जाऊ लागल्या, शासनातील कारभारात रस घेऊ लागल्या. मल्हाररावांनी हळूहळू त्यांना प्रशासकीय कौशल्ये शिकवायला सुरुवात केली.
दुर्दैवाने १७५४ मध्ये खंडेरावांचा कुम्भेरच्या युद्धात मृत्यू झाला. त्यावेळी अहिल्याबाईंचे वय होते फक्त तीस वर्षांचे. ऐन तारुण्यात आलेला हा प्रसंग अत्यंत दु:खदायक होता. परंतु अहिल्याबाईंचं आयुष्य तिथे थांबलं नाही. नियतीला त्यांच्या हातून मोठे कार्य करून घ्यायचे होते. त्या सती जाण्याचा विचार करत होत्या, पण मल्हाररावांनी त्यांना रोखलं. 'तू प्रजेची आई आहेस – तुला त्यांचं रक्षण करायचं आहे' असं त्यांनी म्हटलं. हीच गोष्ट त्यांचे जीवनाला वेगळे वळण देणारी ठरली. अहिल्याबाईंच्या जीवनाचा आलेख पाहिला तर ज्या शिवलिंगाने त्यांना होळकरांची सून बनवले होते, तेव्हाच ती बाल अहिल्या संपली आणि एका कर्तृत्ववान स्त्रीचा जन्म झाला. त्यांना अनेक संकटातून त्यांच्या परमेश्वरावरील दृढ श्रद्धेनेच तारले. त्यामुळे त्या उभ्या राहिल्या. परमेश्वरावर दृढ श्रद्धा असणाऱ्या अहिल्याबाईंनी स्वतःसाठी देवाकडे कधी काही मागितले नाही. त्यांनी प्रत्येक कार्य ईश्वराला स्मरून केले. त्यामुळेच त्यांचा राज्यकारभार अत्यंत पारदर्शी राहिला. गीतेतील कर्मयोगाची शिकवण त्यांनी आचरणात आणली. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने ' कर्मयोगिनी ' होत्या.
खंडेरावांच्या मृत्यूनंतर माळवा प्रांताचा मुलकी कारभार अहिल्याबाई पाहू लागल्या. त्यांची सासू गौतमाबाई यांचीही मदत आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. मल्हाररावांना युद्धासाठी लागणारी रसद त्या पुरवीत असत. युद्धासाठी लागणारा दारुगोळा त्यांच्या देखरेखीखाली तयार होत असे. तत्कालीन राजकीय घडामोडी मल्हारराव त्यांना कळवीत असत. दोघांची त्यावर चर्चा होई. प्रसंगी अहिल्याबाईंचा सल्लाही मल्हारराव मागत एवढा विश्वास त्यांनी आपल्या वागणुकीने निर्माण केला होता. माळवा प्रांतातील जागीरदारांकडून वसुली करणे, दहशत पसरवणाऱ्यांचा सैन्याच्या मदतीने बंदोबस्त करणे ही कामे त्या पाहत असत. अशाच एका बंडखोर असलेल्या गोहदच्या संस्थानिकाचा बंदोबस्त त्यांनी केला. त्याच्याशी युद्ध करून त्याचा पराभव केला आणि त्याला मल्हाररावांचे आदेश पाळायला भाग पाडले. काही दरोडेखोर पठाणांच्या टोळ्या दिल्ल्लीच्या मार्गावर लुटालूट करून दहशत पसरवत होत्या. अशा या पठाणांच्या टोळ्यांचा स्वतः बंदोबस्त करून त्यांनी प्रजेला त्यांच्या भीतीतून मुक्त केले.
परंतु थोड्या काळात दुर्दैवाचे अनेक आघात अहिल्यादेवींवर झाले. तरुण पती खंडेरावांच्या मृत्यूनंतर पित्यासमान असलेले सासरे मल्हारराव, मातेसमान सासू गौतमीबाई, पुत्र मालोजी, जावई यशवंतराव अशा एक दोन नव्हे तर तब्बल २५ आप्तस्वकीयांचे मृत्यू त्यांना पहावे लागले. पण या साऱ्या गोष्टींना त्या अत्यंत धीरोदात्तपणे सामोऱ्या गेल्या. संयमाने आणि साक्षीभावाने त्यांनी हे दुःख सोसले. ही दुःख सोसण्याची अपार शक्ती त्यांना त्यांच्या ईश्वरसाधनेतून लाभली होती.
आता सत्ता हातात घेण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. त्या काळात एका विधवेने सत्तेत येणं हे अत्यंत दुर्मिळ आणि धाडसी पाऊल होतं. पण त्यांनी न डगमगता संपूर्ण इंदूर संस्थानाचं नेतृत्व स्वीकारलं. या काळात अनेक नवनवीन गोष्टी त्या सतत शिकत गेल्या. केवळ लिहिणे वाचणेच नाही युद्धकलेचाही त्यांनी अभ्यास केला. शस्त्र चालवण्याचे शिक्षण घेतले. भालाफेकीत तर त्या एवढया तरबेज होत्या की खुद्द टिपू सुलतानाने त्यांच्या या कौशल्याबद्दल गौरवोद्गार काढले. ' तत्वज्ञ महाराणी ' हा 'किताब आदरपूर्वक त्याने अहिल्याबाईंना दिला. केवळ एवढे करूनच अहिल्याबाई थांबल्या नाहीत तर अन्य महिलांनीही युद्धकलेत तरबेज व्हावे, त्यांना स्वसंरक्षण करता यावे म्हणून त्यांनी स्त्रियांना प्रशिक्षण देण्यासाठी लष्करी केंद्र सुरु केले. महिलांसाठीचे जगातील हे पहिले लष्करी केंद्र ! पाचशे युद्धकुशल महिलांची फौज त्यांनी उभारली. त्यांचे राज्य गिळंकृत करण्याच्या उद्देशाने जेव्हा राघोबादादा महेश्वरवर चालून आले, तेव्हा अहिल्यादेवींनी त्यांना निरोप पाठवला, " मी एक अबला आहे, असहाय स्त्री आहे, या भ्रमात कोणी राहू नये. माझ्याकडे पाचशे महिलांचे सैन्य आहे. मी त्यांच्यासह भाला घेऊन रणांगणात उभी ठाकले, तर तुमचे मनसुबे जागीच जिरतील. तुम्ही हरलात, तर तुम्हाला तोंड दाखवायलाही जगात जागा राहणार नाही. " यानंतर राघोबादादांनी सपशेल माघार घेतली. त्यांच्या या मुत्सद्देगिरीचे कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतात.
मल्हारराव होळकरांच्यानंतर सैनिकी नेतृत्वाचं मोठं ओझं पडलं ते तुकोजीरावांवर. या टप्प्यावर त्यांनी तुकोजी होळकर यांना युद्धक्षेत्र आणि सीमासंरक्षण यासाठी तयार केलं. तुकोजी हे मल्हाररावांचे विश्वासू सेनानायक होते. अहिल्याबाईंनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना उत्तरदायित्व दिलं. ते जरी सक्षम सेनापती होते. तरीही अहिल्याबाईंनी त्यांना केवळ सैनिकीच नव्हे, तर नैतिक, प्रशासनिक दृष्टिकोनही दिला. त्यांना सांगितलं – "लढाई जिंकणं हे अंतिम ध्येय नाही, तर लोकांचं मन जिंकणं महत्त्वाचं आहे. लष्करचं बळ हे केवळ शस्त्रात नाही, तर नीती आणि अनुशासनात असतं." प्रत्येक मोहिमेपूर्वी आणि नंतर अहिल्याबाई स्वतः त्यांच्याशी चर्चा करीत आणि अनुभव जाणून घेत आणि योग्य मार्गदर्शन करीत. जेव्हा तुकोजीरावांनी काही लढायांमध्ये विजय मिळवला, तेव्हा अहिल्याबाईंनी स्वतः त्यांच्या कर्तृत्वाचं खुलेपणाने कौतुक केलं, पण त्याचवेळी अहंकार टाळण्याचंही सांगितलं. पुढे तुकोजीराव एक निपुण सेनापती आणि विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले गेले.
अहिल्याबाईंसारखा नेता – जो सहकाऱ्याला घडवतो, मार्ग दाखवतो, पण नियंत्रण ठेवत नाही – दुर्मिळ असतो. अहिल्याबाईंचा हा गुण विशेष मानला जातो. स्वराज्यासाठी अशी लढणारी माणसं अहिल्याबाईंनी घडवली.
अहिल्याबाईंचं प्रशासन हे अठराव्या शतकातील एका आदर्श राज्यकर्त्याचं उदाहरण ठरतं. त्यांनी सत्तेचा उपयोग स्वतःच्या वैभवासाठी न करता प्रजेच्या कल्याणासाठी केला. त्यांचं राजकारण हे शांततेच्या धोरणावर आधारित होतं. त्यांनी युद्धांपेक्षा समाज उभारणी, न्यायनिवाडा आणि सर्वसामान्यांच्या गरजांकडे लक्ष दिलं.
त्यांच्या कारभारातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे न्यायनिष्ठा आणि पारदर्शकता. प्रत्येक सकाळी त्या राजदरबारात बसत आणि स्वतःच जनतेच्या तक्रारी ऐकत. अगदी सामान्य शेतकऱ्यापासून ते सरदारांपर्यंत प्रत्येकाला आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचता यावं, अशी त्यांची व्यवस्था होती. "राजा म्हणजे प्रजेचा सेवक" हे त्यांनी आपल्या वागणुकीतून सिद्ध केलं. त्यांची न्यायदानाची पद्धत समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वंकष विचार करणारी होती. एक प्रसंग उल्लेखनीय आहे – एका मोठ्या सरदाराने शेतकऱ्याची जमीन बळकावली होती. अहिल्याबाईंनी ते प्रकरण चौकशीसाठी घेतलं. न्यायालयात पुरावे आणि साक्षी घेतल्यावर सरदाराच्या विरोधात निर्णय दिला आणि शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याला परत केली. त्यांनी त्या सरदाराला शिक्षा दिली नाही तर लोकांसमोर क्षमा मागायला लावली एवढे औदार्य त्यांच्या स्वभावात होते आणि न्यायदानात लवचिकताही होती. एखाद्या प्रशासकाने सत्तेचा सुयोग्य वापर कसा करावा याची साक्ष अहिल्याबाईंच्या जीवनातील अनेक घटना पदोपदी देतात.
त्यांचं अर्थकारण अत्यंत शिस्तबद्ध होतं. महसूल संकलनाच्या नवीन योजना राबवल्या गेल्या, पण त्या प्रजेचे अनाठायी शोषण करणाऱ्या नव्हत्या. शेती, सिंचन, जलव्यवस्थापन यावर भर दिला गेला. त्या काळी नर्मदा नदीकाठी आणि इंदूरच्या आसपास अनेक तलाव, विहिरी, घाट यांची उभारणी झाली – जी आजही दिसून येतात.
आज या[आपण स्त्री शिक्षणाबद्दल आणि स्त्री स्वातंत्र्याबद्दल बोलतो. पण या दृष्टीने विचार केला तर अहिल्याबाई या स्त्री स्वातंत्र्याच्या आद्य उद्गात्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी राज्यकारभारात स्त्रियांनाही भूमिका दिली. मुलींच्या शिक्षणासाठी व्यवस्था, आणि अनाथ मुलांना मदत केली. त्या स्त्रियांच्या हक्कांबाबतही अत्यंत संवेदनशील होत्या. त्या काळात स्त्रिया अनेक जाचक रूढींनी बांधल्या गेल्या होत्या. विधवा स्त्रियांची अवस्था तर नरकासमान होती. त्यांना पुन्हा सन्मानाने जगण्याचा अधिकार समाजाने द्यावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. विधवांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. विधवांना आपल्या मर्जीप्रमाणे संपत्तीची वाटणी करण्याचा अधिकार दिला. ही त्यांनी घडवून आणलेली एक फार मोठी सामाजिक क्रांती होती.
स्वतः एक विधवा असूनही त्यांनी खंबीरपणे शासनाचा भार उचलला आणि समाजासमोर एक आदर्श उभा केला. त्यांनी समाजातील विधवांसाठीही आश्रम सुरू केले.पहिला शस्त्रकारखाना उभारला. यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. अशी उदाहरणं त्या काळात दुर्मीळ होती. त्यांच्या राज्यकारभाराची तुलना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशीच होऊ शकेल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे इंग्रजांची लबाडी ओळखून त्यांना चार हात दूरच ठेवले, तशीच शत्रूला ओळखण्याची दूरदृष्टी अहिल्याबाईंजवळ होती. पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्या इंग्रजांबद्दल म्हणतात, " इंग्रज गोडबोल्या आणि अस्वलासारखा धूर्त आहे. त्याच्याशी संग करू नका. तो गुदगुल्या करून मारेल. अस्वलाला मारायचे तर त्याच्या तोंडावरच आघात करावा लागतो. "
लोकांच्या सुखदुःखांशी समरस होणारं संवेदनशील नेतृत्व त्यांनी दिलं. त्या लोकांच्या अडचणी समजून घेत आणि त्यांना मार्गदर्शन करीत. दर वर्षी त्या गावागावात फिरून जनतेच्या अडचणी प्रत्यक्ष पाहत. त्यामुळे प्रजेला त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटत होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही त्यांच्या वागणुकीची वैशिष्ट्ये होती. विद्या - कलांची देवी असलेल्या सरस्वतीप्रमाणेच त्या नेहमी पांढरीशुभ्र स्वच्छ अशी नऊवारी साडी परिधान करीत. राजघराण्याच्या प्रथेप्रमाणे डोक्यावर पदर घेत. पती निधनानंतर कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्या सात्विक चेहऱ्यावरील तेज अधिकच खुलून दिसत होते. त्यांचे दर्शन एखाद्या साध्वी सारखे, पाहताच समोरच्या व्यक्तीने नतमस्तक व्हावे अशा प्रकारचे प्रभावी आणि प्रसन्न होते. त्यांचे बोलणे प्रेमळ आण मृदू होते परंतु आपल्या विचारांवर मात्र त्या ठाम असत. खोटे बोलणे, अन्यायाने वागणे या गोष्टींची त्यांना मनस्वी चीड होती.
अहिल्याबाईंची आपल्या प्रजेसाठी जी कररचना ठरवून दिली ती उल्लखेनीय आणि वैशिट्यपूर्ण होती. कोणावरही अति भार पडणार नाही अशा प्रकारची ही कररचना होती. पूर्वीचे राजे महाराजे प्रजेचे करांच्या रूपाने प्रजेचे शोषण करीत. या मनमानीला त्यांनी चाप लावला. त्यांची कररचना इतकी उत्कृष्ट आणि आदर्श होती की पुढे इंग्रजांनीही आपले राज्य चालवताना त्यांच्या कररचनेचा आधार घेतला. अहिल्यादेवींच्या कल्याणकारी राज्यात प्रत्येक व्यक्तीच्या जीवित-वित्ताची हमी घेतली जाई. त्यासाठी त्या स्वतः दररोज दरबारात उपस्थित असत. त्यांच्यापर्यंत आलेल्या तक्रारींचा स्वतः न्यायनिवाडा करत. एखाद्या गोष्टीवर अधिक विचार करावासा वाटला तर ते प्रकरण न्यायखात्याकडे विचारार्थ पाठवून देत.
अहिल्याबाईंच्या विचारसरणीचं मूळ अध्यात्मात असलं तरी त्या कर्मयोगी होत्या. धर्म म्हणजे दया, समता आणि सेवा – हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांनी कोणत्याही पंथ, जात, वा समाजात दुजाभाव केला नाही. सर्व धर्मांना समान वागणूक देणं, हा त्यांच्या नीतीचा पाया होता. त्यांचे धार्मिक कार्य केवळ कर्मकांडापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी मंदिरांमध्ये सर्व जातींचा प्रवेश सुलभ केला. गरीब यात्रेकरूंसाठी अन्नछत्रं सुरू केली. त्या म्हणायच्या – “ईश्वर सर्वांचा आहे. त्याचं दर्शन केवळ श्रीमंत वा ब्राह्मणालाच मिळावं, हे अयोग्य.” त्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्यात शुद्ध पाणी, अन्नधान्याचा साठा, आपत्ती व्यवस्थापन ( दुष्काळ, पूर इ. ) यासाठी वेगळं नियोजन होतं. त्या काळात कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली, तरी अहिल्याबाई तत्काळ मदतीसाठी योजना अंमलात आणत. त्यांच्या काळात देशभर मंदिरे, धर्मशाळा, पाणीवाटपाची ठिकाणं, अन्नछत्रं उभारली गेली. त्यांनी काशी, प्रयाग, रामेश्वर, बद्रीनाथ, द्वारका, सोमनाथ, गंगा घाट, तुळजापूर, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर अशा अनेक पवित्र स्थळी घाट, मंदिरांचे जीर्णोद्धार आणि नूतनीकरण केलं. त्यांचे लोकसेवेचे प्रचंड कार्य आजही भारावून टाकणारे आहे.
आजच्या काळात आपण अहिल्याबाई होळकर यांचं कार्य केवळ इतिहासापुरतं मर्यादित न ठेवता, त्यातून प्रेरणा घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः जेव्हा आजच्या नेत्यांकडून पारदर्शकता, न्याय, आणि प्रजेविषयी संवेदनशीलता हरवत चालली आहे, आज समाजात जातीयता, धर्माधता, लिंगभेद वाढताना दिसतो. याला अहिल्याबाईंच्या समतेच्या तत्वांनी उत्तर देता येईल. अहिल्याबाईंनी जात पात, धर्मापलीकडे जाऊन माणुसकीला केंद्रस्थानी ठेवलं. त्यांची ही समानतेची शिकवण आजही उपयोगी पडणारी आहे. त्यांचे प्रशासन, त्यांच्या मूल्याधिष्ठित निर्णयप्रक्रिया, त्यांच्या सहकाऱ्यांना समज देणं – हे सर्व आजच्या शासनव्यवस्थेत अनुकरणीय ठरेल. “सत्ता ही सेवा आहे” हे त्यांचं ब्रीद आजच्या प्रत्येक राजकीय नेत्याने आचरणात आणण्यासारखं आहे. स्त्रियांसाठी त्यांनी उभे केलेलं आदर्श, त्यांच्या शिक्षणासाठी दिलेली प्रेरणा, आत्मनिर्भरतेचा संदेश – हे सर्व आजही सामाजिक संस्थांसाठी मार्गदर्शक ठरू शकतं. अहिल्याबाई होळकर हे नाव म्हणजे एका स्त्रीने समाज, धर्म, आणि शासन यांना एकत्र आणून सत्त्वशीलतेने उभं केलेलं यशस्वी उदाहरण. त्यांच्या जीवनाने आपल्याला शिकवले – परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, मनाच्या दृढतेने, विवेकाने आणि निष्ठेने इतिहास घडवता येतो.
अहिल्याबाईंची तत्वे आजही कालबाह्य झाली नाहीत. त्या म्हणत, " स्नानाने शरीरशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. " त्यांनी माणसात देव पाहिला. माणसांची आणि प्राणिमात्रांची सेवा हे भक्तीचेच एक रूप आहे असे त्या मानत. त्यांचे आयुष्य म्हणजे त्याग आणि सेवेचा आदर्श होता.
आज काळ बदलतो आहे. अनेक गोष्टींचे संदर्भ बदलत आहेत. मुलांना आपण शिकवतो तीच पारंपरिक बाराखडी शिकवून आता भागणार नाही. ' अ ' अननसाचा किती दिवस शिकवणार ? त्याऐवजी ' अ ' अहिल्याबाईंचा शिकवला तर त्यांनी जी जीवनमूल्ये आयुष्यभर जपली त्यांचा विचार करणे पुढील पिढीला भाग पडेल.
सध्या आपण त्यांची तीनशेवी जयंती साजरी करतो आहोत. त्यांच्या स्मरणार्थ आज अनेक ठिकाणी स्मारकं, स्तुतीपर लेखन, पुरस्कार दिले जात आहेत पण त्यांच्या जीवनमूल्यांचा अंगीकार करणं आणि त्यांचं कार्य पुढे नेणं हेच त्यांचे खरे स्मरण ठरेल. त्यांचं कर्म, त्यांनी घालून दिलेली मूल्ये आणि विचार आचरणात आणणं – हीच खरी ‘लोकमाता’ म्हणून त्यांना दिलेली मानवंदना ठरेल.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३१/०५/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा