मुख्य सामग्रीवर वगळा

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग 

पुत्र व्हावा ऐसा...

आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात 

पुत्र व्हावा ऐसा गुंडा 

ज्याचा तिन्ही लोकी झेंडा...

या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही.

तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा हा अनुवाद नाही पण त्यात कवीला जे काही सांगायचं आहे, ते माझ्या शब्दात सांगण्याचा हा प्रयत्न !

पालक म्हणून आजच्या काळात आपण आपल्या मुलांसाठी काय मागतो ? चांगले मार्क ? उत्तम करिअर ? यश, पैसा, प्रतिष्ठा ? या मागण्या चुकीच्या नाहीतच… पण या मागण्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट हरवत चालली आहे – “एक चांगला माणूस घडवण्याची तळमळ.”

कवी म्हणतो," हे परमेश्वरा, असा मुलगा घडव, जो इतका मजबूत असेल की तो स्वतःची कमजोरी ओळखू शकेल…” आपण कधी, केव्हा आणि कुठे कमी पडतो आहोत, याची जाणीव त्याला असेल. 

( Build me a son, O Lord, who will be strong enough to know when he is weak…)

आज आपल्या आधुनिक समाजात ‘कमजोरी’ ही लाज वाटण्यासारखी गोष्ट मानली जाते. पण मॅकआर्थर यांना मुलामध्ये स्व-ओळखीचं सामर्थ्य हवं आहे. स्वतःला ओळखणं – हे खऱ्या शिक्षणाचं मूळ बीज आहे. नेमकी हीच गोष्ट मोठ्या प्रमाणावर आज दुर्लक्षित होताना दिसते आहे. 

मुलगा धाडसी असावा असं म्हणणं सोपं आणि योग्य आहे. पण तो स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक असेल, स्वतःच्या भीतीला सामोरं जाण्याचं बळ त्याच्यात असेल, तरच तो खऱ्या अर्थानं परिपक्व होतो.

***

“ असा मुलगा हवा, जो प्रामाणिक अपयशात अभिमान बाळगेल,

आणि विजयात नम्र व सौम्य असेल…” अपयश आलं तर हे अपयश माझंच आहे याचा ( आपल्या अपयशाबद्दल इतरांना दोष न देता ) स्वीकार आणि विजय मिळाल्यानंतर आजकाल विजयाचा जो उन्माद दिसतो, त्याऐवजी यशाचा नम्रतेने स्वीकार करणारा तो असावा. 

(…proud and unbending in honest defeat, and humble and gentle in victory…)

आज अपयश सहन करण्याचं धैर्य किती घरांमध्ये शिकवलं जातं ? मुलगा जिंकतो तेव्हा सगळं घर फुलतं, पण हरतो तेव्हा तो स्वतःच हरवतो. प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार होता त्यावेळी त्यांच्यासह सगळेच आनंदात होते. पण अचानक जेव्हा त्यांना आपल्याला वनवासात जावं लागणार हे कळलं, तेव्हा ते  त्या प्रसंगाला संयमाने सामोरे गेले. दोन्ही प्रसंगात आपलं धैर्य, संयम आणि मनाची शांती त्यांनी ढळू दिली नाही. 

मॅकआर्थर सांगतात की पराभव हा केवळ एक क्षण असतो, पण त्यातून माणूस घडतो. आणि विजयात जर नम्रता नसेल, तर तो विजय किंवा आनंद  अहंकाराला जन्म देतो. आपण आपल्या मुलांना हे शिकवतो का ? मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. 

****

“ त्याला सुखसोयींच्या वाटेवर नेऊ नकोस,

पण अडचणींनी भरलेल्या मार्गावर घेऊन जा 

जेथे तो वादळात उभं राहणं शिकेल…”

(Lead him not in the path of ease and comfort, but under the stress and spur of difficulties…)

खरंतर कोणताही पालक आपल्या मुलाला त्रास होऊ नये अशी इच्छा करतो. गौतम बुद्धाच्या पित्याने त्याला जीवनात दुःख दिसू नये, तो नेहमी आनंदातच राहावा अशी व्यवस्था केली होती. पण जीवनातील सत्याचे गौतमाला दर्शन झालेच. आगीत तावून सुलाखून निघाल्यावरच सोन्याचा कस लागतो. 

आजची मुलं अडचणी न आल्यामुळे कोसळतात. त्यांना रडू न देता, सावरणं शिकवायचंय.

****

 “तो इतरांवर प्रभुत्व मिळवण्याआधी स्वतःवर मिळवेल…”

(…a son who will master himself before he seeks to master other men…)

आपल्याला वाटतं की आपली मुलं नेतृत्व करणारी असावी, पण त्याही आधी  आपल्याला हवा आहे तो स्वतःवर संयम असणारा माणूस ! जीभ, राग, लोभ, अहंकार – या गोष्टींवर विजय मिळवलेल्यालाच दुसऱ्यांचं नेतृत्व करता येतं.

***

 “ हे परमेश्वरा त्याला विनोदबुद्धी दे –

जेणेकरून तो गंभीर राहील, पण स्वतःला फारसं गंभीरपणे घेणार नाही…”

(Give him a sense of humor, so that he may always be serious, yet never take himself too seriously…)

जग खूपच गंभीर आहे; त्यात थोडं हास्य असणं, कायम हसतमुख राहणं ही माणसाची उर्जा आहे. विनोदी दृष्टीकोन म्हणजे मोकळा श्वास आहे. तो हसतमुख राहील पण कधी वाटलं तर मुक्तपणे अश्रू ढाळण्यास लाजणार नाही. स्वतःला आपण खूप महत्वाचे आहोत असं समजणार नाही. थोडक्यात म्हणजे ' अहं ' किंवा ज्याला आपण इंग्रजीत ' इगो ' म्हणतो तो त्याच्याजवळ असणार नाही. 

***

ही सुंदर प्रार्थना वाचताना मला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहाम लिंकन यांनी ' हेडमास्तरास लिहिलेल्या पत्राची ' आठवण झाली. त्यांनीही आपल्या मुलाच्या शिक्षकाला पत्र लिहून हेच सांगितलं होतं –

 “त्याला शिकवा की तो सज्जनांशी सौम्य असावा,

पण कटु अनुभवांशीही न घाबरता त्याने सामना करावा इतपत निर्भय त्याला बनवा…”

या दोन महान व्यक्तींनी व्यक्त केलेल्या भावना एकत्र विचारात घेतल्या, तर आपल्याला एक अत्यंत मौल्यवान तत्त्व सापडतं  आणि ते म्हणजे मुलगा कसा हवा तर  “  संवेदनशील, सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न !  कारण तेच आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने फलित आहे.”

या कवितेत कवी शेवटी म्हणतो की असं झालं ( म्हणजे वर उल्लेख केलेले गुण जर त्याच्यात असतील ) तर त्याचा पिता म्हणून मी म्हणू शकेन की 

‘माझं आयुष्य व्यर्थ गेलं नाही.’”

( " Then I, his father, will dare to whisper, "I have not lived in vain.” )

आपल्या मुलातून स्वतःचं अपूर्णत्व पूर्ण करायची इच्छा असणारा प्रत्येक पालक या प्रार्थनेत आपला आवाज शोधू शकतो.

अब्राहम लिंकन यांचं पत्र आणि डग्लस मॅकआर्थर यांच्या सांगण्यात फरक इतकाच की डग्लस मॅकआर्थर परमेश्वराला प्रार्थना करतात तर अब्राहाम लिंकन आपल्या भावना हेडमास्तरांना पत्र लिहून कळवतात. पण पालक या नात्याने दोघांच्या मनातील भावना सारख्याच आहेत. 

ही भावना, ही प्रार्थना, आणि हे विचार – मुलांना माणूस म्हणून घडवण्याचा खरा मंत्र आहे. हा मंत्र जपला पाहिजे पालकांनी, शिक्षकांनी आणि शिक्षण पद्धती ठरवणाऱ्या आजच्या सर्वांनी ! वेगळे असे काही करण्याची आवश्यकताच राहणार नाही. ( ज्यांना ही कविता मुळातून वाचायची असेल त्यांच्यासाठी ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१४/६/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या