उगवतीचे रंग
आनंदयात्री
मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.
विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी होते. असं सगळं काही देवानं भरभरून दिलेलं असताना हे जोडपं कमालीचं साधं आहे. पाय जमिनीवर आहेत. कुठेही मीपणाची बाधा नाही. डॉक्टर आज सत्तरीच्या घरात आहेत तर विभाताई त्यांच्यापेक्षा दोनतीन वर्षांनी लहान असतील. पण दोघांचा उत्साह दांडगा. दोघेही मुंबईहून आपल्या कारने स्वतः ड्राईव्ह करून पुण्यात येतात आणि जातात.
विभाताईंचा आणि माझा परिचय माझ्या लेखनामुळेच झाला. ती माझी जिवलग बहीण झाली आणि मी तिचा लाडका भाऊ. साधारणपणे वर्षभरापासून आमचे संबंध आले असतील. आम्ही एकमेकांना कधी भेटलो नव्हतो, पाहिले नव्हते. मध्यंतरीच्या काळात ती अमेरिकेत आपल्या मुलींकडे गेली होती. पण तिथूनही आमचा संपर्क कायम होता. तिथून मुंबईत परतल्यानंतर तिची आणि आपली भेट होईल अशी अंधुक आशा मनाला वाटत होती. योगायोगाने आम्ही पुण्यात आल्यावर तिच्या भेटीचा योग आला. मी पुण्यात आल्याचे कळताच विभाताई आणि डॉ गोपाळराव दोघेही आम्हाला भेटायला माझ्या मुलाच्या घरी येऊन गेले. त्यांच्या त्या भेटीबाबत काही दिवसांपूर्वी मी ' एक रात्र मंतरलेली ' या नावाने लेख लिहिला होता.
एप्रिल महिना तसा माझ्या दृष्टीने महत्वाचा. या महिन्यात माझा वाढदिवस, माझ्या मुलीचा वाढदिवस. आणि या वर्षी १७ एप्रिलला माझ्या ' रामायण : महत्व आणि व्यक्तिविशेष ' या पुस्तकाचे प्रकाशनही होते. विभाताईने माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून २३ एप्रिलला मनमंदिर या व्हाट्सअप समूहातील व्यक्तींचे पुण्यात स्नेहसंमेलन ठरवले. आणि त्या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करून अत्यंत सुंदर, देखणा आणि हृद्य कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या ओळखी आणि भेटी झाल्या. डॉ अरुण जोशी, रेश्मा दास, गिरीश वसेकर, गजानन उफाडे, निरंजन वेलणकर, दीनानाथ लेले आदी मंडळी पहिल्यांदाच भेटली आणि आम्ही कायमचे एकमेकांचे होऊन गेलो.
पण या कार्यक्रमापूर्वी १७ तारखेच्या रविवारी माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होते. या कार्यक्रमाला विभाताई आणि गोपाळरावांनी यावं अशी माझी तीव्र इच्छा होती. पण त्यावेळी ते दोघेही मुंबईत होते आणि काही कारणाने आम्ही कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असे विभाताईने मला सांगितले. मी मनातून थोडा खट्टू झालो. कारण या दोघांशिवाय आता कार्यक्रमाची कल्पना मी करू शकत नव्हतो. पण १७ च्या सकाळी कार्यक्रमाच्या वेळी या दोघांनी उपस्थित राहून मला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कार्यक्रमाचे साक्षीदार ते झाले. एका कोपऱ्यात पाठीमागे बसून ताई माझं कौतुक न्याहाळत होती आणि आपल्या अनिमिष नेत्रांनी तिच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर करत होती. मला तरी अजून काय हवे होते !
परवा तिचा फोन आला. विश्वासदा, तुम्ही दोघांनी आमच्याकडे घरी यावं अशी आमची इच्छा आहे. डॉ सुद्धा तुम्हाला बोलावत आहेत. मलाही त्या दोघांना भेटण्याची, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची इच्छा होतीच. त्याप्रमाणे आम्ही दोघं काल म्हणजे २५ एप्रिलला पुण्याजवळील वाकड येथे असलेल्या त्यांच्या घरी गेलो. दोघांनीही मनापासून आमचे स्वागत केले. भरपूर गप्पा झाल्या. ते या घरात कायम राहत नसल्याने स्वयंपाकाचे साहित्य मोजकेच होते. त्यामुळे आम्ही बाहेर जेवणाचा आनंद घेतला.
घरी आल्यावर पुन्हा भरपूर गप्पा झाल्या. डॉ गोपाळराव यांच्याजवळ माहितीचे, ज्ञानाचे भांडार आहे. अनेक किस्से आहेत. सांगण्याची पद्धतही इतकी रंजक आहे की ऐकणारा त्यांच्या प्रेमातच पडतो. सुप्रसिद्ध संत श्री पाचलेगावकर महाराज हे डॉ गोपाळरावांच्या वडिलांचे मित्र होते. त्यांच्या घरी त्यांचे नेहमी जाणेयेणे असायचे. अशा या पाचलेगावकर महाराजांच्या अनेक आठवणी विभाताई आणि गोपाळराव यांच्या बोलण्यातून जिवंत झाल्या.
विभाताई आणि गोपाळराव या दाम्पत्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दोघांना गाण्याची, संगीताची असलेली प्रचंड आवड. त्यामुळे कुठेही दोनचार दिवसांपेक्षा जास्त मुक्काम असला तर ते गाण्याची पेटी ( हार्मोनियम ), गाण्यांच्या वह्या वगैरे गोष्टी आपल्यासोबत घेऊन जातात. तसेच ते पुण्यालाही घेऊन आले होते. मग संध्याकाळी आमची मैफल जमली. आम्ही दोघं श्रोते आणि गायक आणि संगीतकार होते विभाताई आणि डॉ गोपाळराव. त्या दोघांनी त्यांच्या व्याह्यांच्याच परंतु अत्यंत अप्रतिम अशा कविता सादर केल्या. त्या कवितांना त्यांनीच चाली लावल्या आहेत. कवितेचे गाणे कसे होते हे आम्हाला त्यातून कळले. त्यांच्या गाण्यातून कवितांचा अर्थ अलगद उलगडत गेला. अनेक अर्थपूर्ण गाणी, गझला त्यांनी सादर केल्या. विविध रागांवर आधारित असलेल्या या रचना ऐकताना आपण एक उच्च प्रतीचा आनंद घेत आहोत याची पदोपदी जाणीव होत होती. आभाळ जणू आमच्यासाठी खाली उतरले होते. सुरांची बरसात होत होती. आम्ही त्यात न्हाऊन निघत होतो. ' घनघनमाला नभी दाटल्या, कोसळती धारा...' अशा त्या सुरांच्या धारा आम्हाला भिजवत होत्या. घड्याळाचे काटे भराभर पुढे सरकत होते. तेवढ्या धावपळीतही विभाताईने आमच्यासाठी गरमागरम खिचडी, कढी आणि भजी केली होती. त्याचा आस्वाद घेऊन निघालो. घरी आलो तो रात्रीचे अकरा वाजले होते. पण आम्ही तृप्त होतो. आनंदयात्रींचा सहवास आम्हाला लाभला होता. आपण नेहमी मानवी जीवनात येणाऱ्या दुःखांबद्दल बोलत असतो. पण असे हे सुखाचे क्षण सुद्धा आयुष्यात येतात, आपलं आयुष्य समृद्ध करतात आणि चांदण्याची बरसात करून जातात. काय लक्षात ठेवायचे आणि काय विसरायचे हे आपल्या हातात असते.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२६/४/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा