उगवतीचे रंग
नित्य नवा दीस जागृतीचा...
भक्ती सोपी नाही. भक्ती ही सुळावरची पोळी आहे, असे तुकाराम महाराज सांगतात. आणि या भक्तीमार्गात दिखावा चालत नाही. ती मनापासून असावी लागते. या अभंगात तुकोबा म्हणतात ' तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दीस जागृतीचा. '
हा तुकोबांचा अभंग आठवण्याचे एक कारण घडले. परवाच्या दिवशी रात्री माझ्या घरासमोर रस्त्यावर कोणीतरी एक वृद्ध माणूस झोपलेला दिसला. तो कुठून आला होता हे माहिती नाही आणि कुठे जाणार होता हेही माहिती नव्हते. पण रात्रीच्या वेळी आपल्या अंगाचे मुटकुळे करून तो झोपला होता. तो भिकारी होता की वारकरी, प्रवास करणारा होता की ज्याला घरातून कोणी काढून दिले असा निराधार होता. काही समजायला मार्ग नव्हता. त्याचे बूट त्याच्याजवळ पडलेले होते. पायात मोजे होते. त्याच्याजवळ एक छोटीशी बॅग होती. त्यामध्ये त्याचे काही कपडे आणि नित्याच्या वस्तू असतील. ती बॅग तो उशाला घेऊन शांत पडला होता. अंगावरती पांढरे धोतर त्याने ओढून घेतले होते. डास चावतात म्हणून असेल बहुधा. जणू धरतीचा बिछाना, आणि आकाशाचे पांघरूण त्याने ओढून घेतले होते.
तो तसाच रात्रभर तिथे पडून होता. येणारे जाणारे पाहत होते आणि पुढे निघून जात होते. माझ्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या कोणी सुद्धा त्याची चौकशी केली नाही. सकाळी आमच्या सौ लवकर फिरायला जातात. तिने पाहिले आणि मला म्हणाली, ' अहो, गेटला कुलूप लावून घ्या. नाहीतर तो आत यायचा. ' मी म्हटलं नाही येणार. तो यायचा असता तर रात्रीच आला असता किंवा त्याने काही मागितले असते.
थोड्या वेळाने मी फिरायला निघालो. तेव्हा तो जागा झाला होता. आपले कपडे आवरत होता. मी फिरून आलो आणि पाहिले तर तो कुठेतरी निघून गेला होता. आणि मला अचानक स्वतःची लाज वाटू लागली. कोणीतरी त्याची विचारपूस करील अशी वाट मी का पाहिली ? मी काही नाही त्याची चौकशी केली ? कदाचित माझ्या मनात भीती होती. याला कुठला आजार असेल का ? मला ते इन्फेक्शन होईल का ? एक ना दोन हजार शंका. खरं म्हणजे सकाळी माझ्या मनात विचार आला होता की त्याला विचारावं, ' बाबा, चहा घेणार का ? ' मी किमान त्याला चहा तरी देऊ शकलो असतो.दुरून का होईना पण विचारायला काय हरकत होती. पण आता तो निघून गेला होता. ' अब पछताये क्या होत, जब चिडिया चुग गई खेत .' बऱ्याचदा आपण ज्यांना गरज नाही , त्यांना विचारतो. चहा नको असला तरी आग्रह करतो. पण मग या माणसाला का नाही विचारलं ?
रोज आपल्या मनाचाच शोध घ्यावा. हृदयात कुठेतरी सल होता. अपराधीपणाची जाणीव बोचत होती. काही महिन्यांपूर्वीच मी आनंदवन, हेमलकसा इथे जाऊन आलो होतो. बाबा आमटेंचा कुष्ठरोग्यांसाठीचा त्याग, प्रकाश आमटेंचं रोग्यांसाठी जीवापाड झटणं , विकास आमटेंचं आनंदवनाप्रती असलेलं समर्पण मी पाहून आलो होतो. बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुढच्या पिढ्या सुद्धा या सेवाकार्यात आपल्या सगळ्या आनंदाचा होम करून इतरांसाठी आनंद निर्मिती करीत असतानाच प्रत्यक्ष दर्शन मी घेऊन आलो होतो. ते सगळं मनाला भिडलं होत. पण प्रत्यक्षात का नाही आलं ? परवापासून मी आतून कुठेतरी हललो आहे. माझं बोलणं, माझं लिहिणं हे नुसतंच पोपटपंची आहे की काय असं वाटू लागलं आहे. पण नवीन काहीतरी जाणीव झाली हेही नसे थोडके असं म्हणू या. नित्य नवा दीस जागृतीचा.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

Analyse, introspect, meditate and reflect. Nice blog,
उत्तर द्याहटवाThanks a lot...
उत्तर द्याहटवा