मुख्य सामग्रीवर वगळा

नजर...

उगवतीचे रंग

नजर...

लहानपणीची एक गोष्ट आठवते. आम्ही कुठून बाहेरून खेळून वगैरे आलो की आई किंवा आजी आमच्या चेहऱ्याकडे बघायची. चेहरा चांगला आनंदी वाटला तर काही प्रश्न नसायचा. पण जर चेहरा म्लान झालेला किंवा कोमेजलेला असला तर त्यांना विशेष काळजी वाटायची. त्यातच कधी कधी अंगात कणकण असली किंवा थोडे अंग गरम वाटले तर आई म्हणायची ' कुणाची तरी दृष्ट लागली किंवा नजर लागली माझ्या राजाला. ' आणि मग म्हणायची ' थांब तुझी नजर काढते. ' आणि मग अंगावरून मीठ मोहऱ्या उतरवून काही तरी म्हणायची. मला नीटसं आठवत नाही आता. पण ' मीठ मोहऱ्या पाटीभर गवऱ्या, राम लक्ष्मणा तुझीच दाही, सीता जानकी तुझी दाही ' असं काहीसं म्हणायची. दोन्ही हातातील मुठीत मीठ मोहऱ्या घेऊन ती गरम तव्यावर किंवा लोखंडाच्या गरम पळीवर टाकायची. मग त्या मीठ मोहऱ्या चांगल्या तडतडल्या की म्हणायची, बघ खरंच दृष्ट लागली होती माझ्या राजाला. आता गेली बरं का. आता तुला बरं  वाटेल.

कदाचित हा अंधश्रद्धेचा भाग असेल, मनाचे समाधान असेल आईच्या , आजीच्या आणि त्या काळात आपल्या बालगोपाळांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माताभगिनीच्या. त्यात शास्त्रीय दृष्ट्या फारसे तथ्य नसेलही म्हणजे नाहीच. पण तो एक मोठ्या मानसिक श्रद्धेचा भाग होता. ज्यामुळे एक आधार वाटायचा . ' इडा पीडा टळली ' असे वाटायचे. खरं म्हणजे आपले मन बळकट असलं तर अशी कुठली बाधा किंवा नजर आपलं काही वाकडं करू शकत नाही. जो परमेश्वर सगळ्यांचं रक्षण करतो, तो आपलंही रक्षण करतोच.

पण तरीही काही व्यक्तींची नजर चांगली नसते असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यात काही तरी तथ्य निश्चित असते. त्यांची नजर चांगली नसते, याचा दुसरा अर्थ त्यांचा बघण्याचा हेतू चांगला नसतो, निर्मळ नसतो हा आहे. आपल्याला जसे डोळे असतात, तसे त्यांनाही असतात. आपण पाहतो, तसेच तेही पाहतात. मग फरक कशाने पडतो ? तर त्यांच्या नजरेतला भाव चांगला नसतो. तो भाव पाहणाऱ्याला लगेच कळतो. आईची प्रेमळ नजर, एखाद्या सत्पुरुषाची शांत आणि आश्वासक नजर, एखाद्या लोभी किंवा अधाशी माणसाची नजर लगेच ओळखू येते. स्त्रिया तर समोरच्या व्यक्तीची नजर लगेच ओळखतात. एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या घरात आली तर ती ज्या पद्धतीने आपले घर न्याहाळते, त्यावरून आपल्याला तिच्या मनातले भाव ओळखता येतात.

पूर्वीच्या काळी कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या घरी आली , तर तिला घरात लगेच प्रवेश नसायचा. तिला बाहेरच बसवले जायचे. हे त्या व्यक्तीचा अनादर करण्यासाठी निश्चितच नव्हते. पण आपल्या घरातील स्त्रिया, मुलेबाळे, संपत्ती इ वर त्या व्यक्तीची वाईट नजर पडू नये हा हेतू असायचा. एकदा का ती व्यक्ती पूर्ण परिचयाची झाली की मग काही अडचण नसायची.

पूर्वीच्या गोष्टींना आपण नावे ठेवतो. पण सगळ्याच गोष्टी वाईट नव्हत्या. आताही आपण त्या करतोच. पण जरा नवीन पद्धतीने. अलीकडे ज्या मोठमोठ्या हौसिंग सोसायट्या आहेत, तेथे आपण एकदम आपल्या नातेवाईकाच्या घरात प्रवेश करू शकत नाही. आधी सिक्युरिटीचे लोक आपली चौकशी करतात. त्यांची खात्री झाल्यावर मगच आपण आत जातो. प्रत्येक ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते. तिथे लिहिलेलं असतं  ' आपण सी सी टीव्हीच्या कक्षेत आहात . ' आता नुकत्याच आलेल्या करोनासारख्या साथीमुळे आपण घरामध्ये कशालाही हातपाय धुतल्याशिवाय स्पर्श करत नाही.

आपली नजर ही आपल्या मनातील भावना,  विचार प्रतिबिंबित करते. म्हणून कोणाची नजर कधी आश्वासक असते. दिलासा देणारी असते.  तर कधी तरी आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याकडे एखादा कटाक्ष टाकावा असे आपल्याला वाटत असते. परमेश्वराच्या किंवा साधुसंतांच्या आपल्याकडे असलेल्या नजरेला आपण कृपाकटाक्ष म्हणतो. कधी कधी कोणाची नजर आपल्याला अस्वस्थ करणारी असते.मग अशी व्यक्ती किंवा तिची उपस्थिती आपल्याला नकोशी वाटते.  एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या गोष्टीकडे आपल्याला निर्मळपणे, कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता पाहता आले पाहिजे.नजर निर्मळ , नितळ दिसली पाहिजे.  हे सरावाने जमू शकते. पण त्यासाठी आपल्याला आपली विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. आपले विचार चांगले ठेवावे लागतील.

 काही लोकांची दृष्टी ही नेहमी नकारात्मक असते. प्रत्येक गोष्टीत वाईट काय , तेवढे ते शोधून काढतात. त्यांना चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत, किंवा त्याकडे त्यांचे लक्ष जातच नाही. मागे एक गोष्ट वाचण्यात आली होती. एकदा एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलचे उदघाटन होते. त्या समारंभासाठी अत्यंत प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. अशा वेळी मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग करायचे ठरवले. त्या हॉटेलच्या स्वागत कक्षातील जी समोरची भिंत होती, त्या भिंतीवरील एक वीट लावण्याचे मुद्दाम राहू दिले. बाकी मग स्वागत कक्ष अप्रतिम सजवला होता. सुंदर रोषणाई होती. फुलांची आरास होती. सुंदर पेंटिंग्स लावलेले होते. पण येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष त्या भिंतीकडेच जात होते, जिथे एक वीट लावलेली नव्हती. आणि जाताना प्रत्येक जण म्हणत होता, सगळे छान आहे हो, पण तेवढी एक वीट मात्र लावायला हवी होते. त्यामुळे सगळॆ वाया गेले. फक्त काही मोजकेच लोक असे निघाले की ज्यांनी आपल्या बोलण्यात त्या विटेचा उल्लेख न करता, हॉटेलच्या सौंदर्याबद्दल गौरवोद्गार काढले. तेव्हा जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी पाहण्याची सवय लावून घेऊ या.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
       ९४०३७४९९३२

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...