उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०६
बरी स्नानसंध्या करी येकनिष्ठा ।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ।
दया सर्व भूतीं जया मानवाला ।
सदा प्रेमळु भक्तिभावे निवाला ।।१०६।।
अर्थ : आपले जे स्नानसंध्या आदी नित्यनैमित्तिक कर्म असेल ते निष्ठापूर्वक करावे. भरकटणाऱ्या म्हणजेच स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला विवेकाच्या साहाय्याने आवर घालावा. सर्व प्राणिमात्रांबद्दल मनात दयाभाव किंवा करुणा असावी. अशी प्रेमळ व्यक्ती भगवंताबद्दल मनात असलेल्या भक्तिभावाने समाधान पावते.
( येकनिष्ठा - संपूर्ण श्रद्धेने, स्थानभ्रष्ट -भरकटणारे , निवाला - तृप्त झाला/समाधान पावला )
विवेचन
साधकाच्या अंगी कोणते गुण असावेत किंवा हे गुण त्याने कसे विकसित करावेत हे समर्थ या श्लोकात आपल्याला सांगताहेत. आपल्याला आपल्या धर्मात किंवा घरात परंपरेने चालत आलेले जे स्नानसंध्यादि कर्म आहे, ते निष्ठापूर्वक म्हणजेच संपूर्ण श्रद्धेने करायला हवे. त्याचप्रमाणे सद्गुरूंनी नामस्मरण आदी गोष्टींचा जो उपदेश आपल्याला दिलेला असेल, त्याचेही नियमितपणे पालन करणे आवश्यक आहे. स्नानाने आपल्या शरीराला स्नान घडते तर संध्या आपल्या मनाला स्नान घालते. अलीकडे या गोष्टींची कर्मकांड म्हणून जी हेटाळणी केली जाते, ती परमार्थ मार्गात बाधक ठरते. या गोष्टी नियमितपणे करण्याचे वळणच मनाला आणि शरीराला लावून घ्यायला हवे. घरात जर थोडे कर्मठ वातावरण असेल तर त्याचा फायदा असे वळण लागण्यासाठी फार उपयोगी पडतो. घरातूनच असे संस्कार मुलांवर होतात.
आज मोबाईल, टीव्ही यांच्यासारखी अनेक मनोरंजनाची साधने सर्वांना उपलब्ध झाली आहेत. समाजमाध्यमे आहेत. यातून बऱ्याचदा चांगले कमी आणि वाईट गोष्टीच जास्त डोळ्यासमोर येतात. ते सगळे पाहून आणि समाजातील लोकांचे नको ते आचरण पाहून आपले मन भरकटण्याचा म्हणजेच समर्थांच्या शब्दात स्थानभ्रष्ट होण्याचा मोठा धोका असतो. आजकाल समाजात वाटेल ते खाणे, वाटेल त्या वेळी खाणे, मन मानेल तसे वागणे याबद्दल लोक विधिनिषेध बाळगताना दिसत नाहीत. तात्पर्य, स्थानभ्रष्टता मोठ्या प्रमाणावर बोकाळली आहे. तिला आवर घालायचा असेल तर विवेक हवा. विवेक म्हणजे योग्यायोग्यतेची जाणीव होऊन योग्य गोष्टी करणे, अयोग्य गोष्टी कितीही आकर्षक वाटल्या तरी त्या करायचे टाळणे. यासाठी मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय करावी लागते. एखादी गोष्ट वारंवार केली तर तिची सवय लागते. वाईट गोष्टींची सवय लागायला वेळ लागत नाही. चांगल्या गोष्टींची सवय मात्र जाणीवपूर्वक लावावी लागते.
ज्याला साधनामार्गावर वाटचाल करायची आहे अशा व्यक्तीच्या मनात केवळ मनुष्यच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांबद्दल दया किंवा करुणाभाव हवा. आपल्याप्रमाणेच त्यांच्यातही परमेश्वराचा अंश आहे, याची जाणीव हवी. संत एकनाथांनी तृषार्त गाढवाला दुरून आणलेल्या गंगेच्या कावडीतील पाणी पाजले होते. सर्व प्राणिमात्रांबद्दलचा हा समत्वभाव संतांमध्ये आपल्याला विशेष करून दिसते. तुकाराम महाराज म्हणतात,' दया तिचे नाव, सर्व भुतांचे पाळण आणिक निर्दालन कंटकांचे.' हाच ' धर्म नीतीचा व्यवहार 'आहे. सर्वांबद्दल प्रेम असणाऱ्या माणसाच्या मनातच ईश्वराबद्दल भक्तिभाव उत्पन्न होतो. आपल्या आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, " मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. ' ज्या चित्तात अशी मृदुता, प्रेमळपणा असेल आणि ईश्वराबद्दल भक्तिभाव असेल, असे चित्त समाधानी असते. तेच समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात.
स्वसंवाद
१. रोजच्या धावपळीत शरीराच्या स्वच्छतेसोबतच, माझे मन शुद्ध आणि शांत ठेवण्यासाठी मी संतांनी सांगितलेल्या 'संध्या' किंवा नामस्मरणाचा आश्रय नित्यनेमाने घेतो का ?
२. मोबाईल, इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे माझे मन संसाराच्या नको त्या आकर्षणात 'स्थानभ्रष्ट' (भरकटत) होत असताना, मी त्याला विवेकाने आवर घालण्याचा प्रयत्न करतो का ?
३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे माझे चित्त लोण्यासारखे 'मृदू सबाह्य नवनीत' आहे का ? माझ्या मनात घरातील माणसांबद्दल, प्राणिमात्रांबद्दल आणि हाताखालील लोकांबद्दल खरी दया आणि करुणा आहे का ?
४. बाह्य जगात आनंद आणि समाधान शोधण्याऐवजी, मी कधी आंतरिक 'भक्तिभावाने' मनाची तृप्ती किंवा समाधान अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का ? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२२/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा