मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ८३

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८३

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।

उमेसी अती आदरे गूण गातो ।

बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।

परी अंतरी नामविश्वास तेथे ।।८३।।

अर्थ  

मदनाला म्हणजेच कामदेवाला ज्या भगवान शंकरांनी जाळून भस्म केले, ते शंकर स्वतः रामाचे ध्यान करतात. श्रीरामांचे गुण अत्यंत आदरपूर्वक पार्वतीला सांगतात. ज्यांच्या ठायी महान सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य हे गुण एकवटले आहेत, अशा भगवान शंकरांच्या अंतरंगात नामाबद्दलचा दृढ विश्वास वास करून आहे. 

( ध्यातो - ध्यान करतो, उमा - पार्वती ) 

विवेचन 

या श्लोकातही समर्थ रामनामाचे महत्व आपल्याला पटवून देत आहेत. रती आणि मदन ही जोडी म्हणजे कामभावनेच्या देवता मानल्या जातात. कामभावनेचे मानवी जीवनात काही एक महत्व जरूर आहे. परंतु जेव्हा ही कामभावना अतिरेकी रूप धारण करते, तेव्हा ती माणसाला विनाशाकडे नेते. रावणासारख्या पौराणिक व्यक्तिरेखा आणि नंतरच्या काळातही अगदी आजपर्यंत अतिरेकी कामवासनेने ज्यांचा विनाश घडवून आणला अशा अनेक व्यक्तींची नोंद इतिहासात आढळते. त्यातूनच युद्धे देखील उद्भवली आहेत. कामवासना जर ज्ञान, वैराग्य आणि कर्तव्याच्या आड येत असेल तर तिला जाळून भस्म करणेच योग्य ठरते. तेच भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून केले. तिसरा डोळा हा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. त्याचा दुसरा अर्थ असा की ज्ञानाच्या साहाय्याने कामभावनेवर नियंत्रण मिळवावे. 

भगवान शंकरांनी त्यांची तपस्या भंग करणाऱ्या कामदेवाला आपला तिसरा डोळा उघडून भस्म केले. एवढे सामर्थ्य असणारे भगवान शंकर पार्वती मातेला श्रीरामांचे गुणवर्णन करून सांगतात. भगवान शंकर म्हणजे सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य यांचे मूर्तिमंत प्रतीक ! माता पार्वती देखील काही कमी नाही. ती देखील ज्ञान, वैराग्य आणि साधना यांचे प्रतीक आहे. पण या दोघांमध्ये एक समानता आहे. दोघांच्याही अंतरात रामनामाबद्दल अतूट श्रद्धा आहे. एवढे प्रचंड सामर्थ्य ठायी असलेले भगवान शंकर आणि पार्वती जेथे प्रभू श्रीरामाचे ध्यान करतात तेव्हा रामनामाची महती सांगण्यासाठी आणखी कोणते उदाहरण द्यायला हवे ?

आपल्या मनातील कामवासना अनियंत्रित होत असेल, तर त्यावर नियंत्रण मिळवण्यास रामनाम हे अचूक आणि अमोघ अस्त्र आहे. परंतु अशा व्यक्तींनीच रामनाम घ्यावे असा याचा अर्थ नाही. ज्यांच्या ठायी ज्ञान, वैराग्य आणि शक्ती आहे अशा व्यक्ती देखील रामाचे ध्यान करतात. किंबहुना ज्ञान, वैराग्य आणि शक्ती प्राप्त होण्यासाठी रामनामासारखा दुसरा उपाय नाही असे देखील म्हणता येते. ज्ञान, वैराग्य आणि शक्ती यांचे अधिष्ठान रामनाम आहे. संत कबीर म्हणतात," कबिरा राम हृदय बसे, काम कहाँ घर होय ?" जिथे हृदयात रामाला स्थान दिले, तिथे कामासारख्या गोष्टींसाठी जागाच कुठे उरते ?

स्वसंवाद 

१. भगवान शंकर आणि माता पार्वती अत्यंत आदराने रामगुणांचे गायन करतात तरी देखील रामनामाचे महत्व मला स्वतःला पटवून देण्यासाठी अन्य गोष्टींची आवश्यकता वाटते का ?

२. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हे गुण माझ्याकडे नसले, तरी या तिन्ही गुणांचे अधिष्ठान असणारे 'रामनाम' घ्यावे असे मला वाटते का ?

३. माझ्या मनात जेव्हा एखादा वाईट विचार किंवा अनावर वासना डोके वर काढते, तेव्हा मी माझ्या 'ज्ञानाचा तिसरा डोळा' (विवेक) उघडून तिला भस्म करतो का ?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...