उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९४
तिन्ही लोक जाळू शके कोप येता ।
निवाला हरू तो मुखे नाम घेता ।
जपे आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ।।९४।।
अर्थ : भगवान शंकर जर कोपले आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला तर तिन्ही लोक जाळून भस्म करू शकतात.अशा महासामर्थ्यशाली भगवान शंकरांनी जेव्हा त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला, तेव्हा रामनामाचा आश्रय घेतल्यावरच तो शांत झाला. माता पार्वती देखील अत्यंत आदराने रामनाम जपते. म्हणून आपण देखील त्याच रामनामाचा आश्रय घ्यावा.
( तिन्ही लोक -स्वर्ग-मृत्यू-पाताळ, निवाला - शांत झाला, हरू - भगवान शंकर )
विवेचन
या ठिकाणी रामनामाचे महत्व स्पष्ट करण्यासाठी समर्थ पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यामागे आपल्या हिताची कळकळ आहे. एखाद्या अभ्यास न करणाऱ्या मुलाला आईवडील जसे एखाद्या अभ्यास करणाऱ्या मुलाचे उदाहरण पुन्हा पुन्हा देतात, तसेच हे आहे. भगवान शंकर देवांमध्ये श्रेष्ठ. म्हणून ते ' महादेव ' ब्रह्मदेव जगाची निर्मिती करतात, विष्णू जगाचे पालनपोषण करतात तर शंकर हे संहारकर्ते मानले जातात. त्यांच्या ठायी एवढे सामर्थ्य आहे की त्यांनी केवळ आपला तिसरा नेत्र उघडला तर क्रोधाने ते हे त्रिभुवन जाळून भस्म करून टाकू शकतात.
अशा सामर्थ्यशाली भगवान शंकरांनी जेव्हा अखिल प्राणिमात्रांच्या कल्याणाच्या हेतूने हलाहल विष प्राशन केले, तेव्हा त्यांच्या कंठाचा प्रचंड दाह होऊ लागला. शीतल चंद्र माथी धारण करून, पवित्र आणि शीतल अशा गंगेला शिरावर धारण केले. एवढे करून देखील त्यांचा दाह शमला नाही. पण अमोघ अशा रामनामामुळे त्यांचा दाह शांत झाला. एवढे सामर्थ्य रामनामाचे आहे. जी विश्वमाता आहे, जगज्जननी आहे अशी माता पार्वती देखील रामनामाचा जप करते. म्हणून आपणही तेच नाम घ्यायला हवे असे समर्थ आपल्याला उदाहरणासह पटवून देतात.
या श्लोकाचा अर्थ आपल्याला वेगळ्या प्रकारेही घेता येतो. आपण मानव म्हणजे गुणदोषांचे पुतळे असतो. क्रोध हा आपला एक प्रमुख शत्रू असतो. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी, नातेसंबंध भस्म करण्याची शक्ती असते. त्यासाठी रामनामाचा आश्रय घेणे हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. रामनामामुळे मन शांत होऊ लागते, क्रोध कमी होऊ लागतो. भगवंताचे नाम हे शांती आणि सौख्य प्रदान करणारे आहे. म्हणून तेच आदरपूर्वक घ्यावे.
स्वसंवाद
१. माझ्या मनात जेव्हा 'क्रोधाचा' (रागाचा) भडका उडतो, तेव्हा मी माझे विवेक आणि नातेसंबंधांचे 'त्रिभुवन' जाळून खाक करतो का? त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी काय करतो?
२. जर तिन्ही लोकांना कवेत घेणारे महादेव आणि अखिल विश्वाची माता असणारी पार्वती अत्यंत आदराने रामनाम जपतात, तर संसारी विवंचनेत अडकलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?
३. माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या चिंता आणि संतापाचा दाह शांत करण्यासाठी, मी कधी शांत चित्ताने रामनामरूपी शीतलता अनुभवली आहे का?
४. "म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता" हा समर्थांचा आग्रहाचा शब्द ऐकून, मी उद्याची वाट न बघता 'आता' या क्षणापासून नामस्मरण करायला तयार आहे का? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा