उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९८
हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहु तारिले मानवदेहधारी ।
तया रामनामीं सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ।।९८।।
अर्थ : भगवंताच्या नामाने खरोखर पाषाणही तरले आहेत. रामनामाने अनेक माणसे तरून गेली आहेत. पण काही माणसांच्या मनात रामनामाबद्दल नेहमी विकल्प म्हणजे संशय असतो. असे जीव म्हणजे खरोखर पापी समजावे की ज्यांच्या मुखात रामनाम येत नाही.
( नेमस्त - खरोखर, विकल्प -संशय/शंका, वदेना - बोलत नाही )
विवेचन
रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की रामनामाने खरोखरीच पाषाण देखील तरले. पाषाण म्हणजे दगड. बुडणे हाच त्याचा धर्म आहे. जो त्याचा संग करील त्याला देखील तो घेऊन बुडतो. परंतु रामनामाची महती एवढी आहे की पाषाणाच्या या मूळ स्वभावात देखील अंतर्बाह्य बदल झाला. पाण्यात बुडणारा पाषाण चक्क रामनामामुळे पाण्यावर तरंगू लागला. या ठिकाणी रामायणातील सेतुबंधनाचा संदर्भ आहे. श्रीरामांना लंकेला जाण्यासाठी समुद्र उल्लंघून जायचे होते. पण जायचे कसे हा मोठा प्रश्न होता. अशा वेळी वानर सेनेतील नल, नील, जांबुवंत आणि हनुमान यांच्या साहाय्याने हा सेतू बांधण्यात आला. अर्थात यात प्रत्येकाचीच मदत झाली. अगदी खारीची देखील ! रामनाम लिहिलेले दगड सागरावर तरंगू लागले आणि पाहता पाहता चक्क समुद्रावर पूल तयार झाला. हा पूल पार करून रामाची सेना लंकेला पोचली.
दगड हे रूपक आहे. या संसारसागरात ज्याने रामनामाचा आश्रय घेतला नाही असा मनुष्य देखील पाषाणासमानच आहे. पण जर तो रामनामाचा आश्रय घेईल तर या भवसागरातून तो निश्चितपणे तरून जाईल यात शंका नाही.
परंतु एवढे उदाहरण डोळ्यासमोर असूनही माणसाच्या मनात रामनामाबद्दल शंका असतात. खरेच रामनामात एवढे सामर्थ्य आहे का ? नुसते रामनाम मला तारील का ? असा माणूस नाम घेण्याचे टाळतो. रामनामाचे विस्मरण होणे हे पाप आहे. पण माणसाची देहबुद्धी अत्यंत प्रबळ असते. बाह्य दृश्यात त्याचे मन रमलेले असते. त्याची दृष्टी अंतराकडे म्हणजे आतमध्ये वळत नाही. अंतरात्म्याला तो जाणून घेऊ इच्छित नाही. अशा माणसाला वेद, पुराणे, शास्त्रे किंवा संतांनी कितीही समजावून सांगितले तरी त्याची खात्री पटत नाही. अशा माणसांच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही. भगवंताचे नाम मुखी यायला देखील भाग्य लागते. पूर्व जन्मीच्या पापामुळे अशा व्यक्तींना भगवंताचे नाम घेण्याची बुद्धी होत नाही. पण ज्यांना कळते आहे त्यांनी तरी रामनाम अवश्य घ्यावे. कोणाच्या सांगण्याची वाट पाहू नये.
स्वसंवाद
१. ज्याप्रमाणे रामनामाने समुद्रावरील जड पाषाणही तरंगले, त्याप्रमाणे माझ्या मनातील संसाराचे जड विचार आणि चिंता दूर करण्यासाठी मी रामनामाची नौका धरली आहे का?
२. "नुसते नाम घेऊन काय होणार?" अशा कुठल्यातरी 'विकल्पाने' (संशयाने) माझे मन घेरलेले आहे का? हा संशय दूर करण्यासाठी मी कधी नाम घेऊन अनुभव पाहीला आहे का?
३. सेतुबंधनातील खारीप्रमाणे, मी माझ्या आयुष्यात परमेश्वराच्या कार्यात किंवा सत्कर्मात माझा खारीचा वाटा उचलण्यास तयार असतो का?
४. माझी दृष्टी केवळ बाह्य दृश्य विश्वातील आकर्षणांमध्येच गुंतून पडली आहे, की मी माझ्या अंतरात्म्याला जाणून घेण्यासाठी कधी अंतर्मुख होतो? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१५/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा