उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८५
भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ।
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ।।८५।।
अर्थ :
योगेश्वरांचे विश्रांतीस्थान असलेले रामनाम जपा. प्रत्यक्ष गौरीहर म्हणजे शंकर देखील नित्यनेमाने आपला ठरलेला रामनामाचा जप पूर्ण करतात. या नामजपाने भगवान शंकरांना देखील शांती मिळते. असा हा श्रीराम अंतकाळी आपली सुटका करील.
विवेचन
रामनामाचे महत्व सांगताना समर्थ म्हणतात की रामनाम हे योग्यांचा विश्राम म्हणजे विश्रांती आहे. इथे समर्थांनी त्यासाठी ' योगेश्वर ' शब्द वापरला आहे. या शब्दाचे तीन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ जो समर्थांना अपेक्षित आहे तो म्हणजे योगेश्वर भगवान शंकर. आपण श्रीकृष्णाला देखील योगेश्वर म्हणतो. पांडुरंगशास्त्री आठवले तर आपल्या स्वाध्यायात श्रीकृष्णाला ' योगेश्वर भगवानच ' म्हणतात. हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ म्हणजे जे योगी साधक आहेत, तप करणारे आहेत ते. तेव्हा यातील कोणत्याही अर्थाने योगेश्वर शब्द घेतला तरी सर्व श्रेष्ठ पुरुष शेवटी रामनामाचाच आश्रय घेतात. रामनाम हे त्यांचे विश्रांतीस्थान आहे हेच यातून स्पष्ट होते.
श्रीकृष्ण देखील रामनामाचा जप करत असत असा पुराणात उल्लेख आहे. कलियुगात रामनाम हेच तारक आहे असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले होते. श्रीकृष्ण आणि श्रीराम दोघेही विष्णूचेच अवतार. त्यांच्यामध्ये भेद नाही. पण कलियुगात भक्तीचा सोपा मार्ग म्हणून श्रीकृष्णांनी रामनाम घेण्याचा उपदेश केला आहे. राम, कृष्ण आणि शंकर यांच्यातही भेद नाही. जसे भगवान शंकर रामनामाचा जप करीत असतात तसेच श्रीराम देखील भगवान शंकराचे पूजन करीत असतात. शंकराचार्यांनी याच अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन केले होते. परमेश्वर एकच आहे. आपण त्याचे जे कोणते नाम घेऊ, त्यावर आपली दृढ श्रद्धा हवी.
भगवान शंकरांसारखा योगिराणा देखील नित्यनेमाने श्रीरामांचे नामस्मरण करतो. आपल्या नामस्मरणाचा जो नेम आहे, त्यात खंड पडू देत नाही. तपस्वी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांचा दाह रामनामानेच शांत झाला. रामनाम हेच त्यांचे विश्रांतीचे ठिकाण आहे. तिथेच ते रमतात. आपणही या रामनामाचे नित्यनेमाने स्मरण करावे. रामनामाची जीवाला सवय असली तरच अंतकाळी आपल्या मुखात रामनाम येईल. रामनामामुळे आपली ऊर्जा ऊर्ध्वगामी होते. विकारांमुळे आपली ऊर्जा अधोगामी होते. आयुष्यात जाणीवपूर्वक जर नियमितपणे रामनाम घेतले तर अंतकाळी देखील मुखातून तेच बाहेर पडेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात," रामनाम ही अंतकाळी आपल्या मुखातून बाहेर पडणारी शेवटची गोष्ट असली पाहिजे." असे नाम आपल्या मुखात अंतकाळी आले तर श्रीराम आपली या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करील.
१. ज्याप्रमाणे श्रेष्ठ योगेश्वरांचे 'रामनाम' हे विश्रांतीस्थान आहे, तसे माझे मन संसाराच्या धावपळीतून थकल्यावर रामनामात विसावा शोधते का?
२. वेगवेगळ्या देवांमध्ये किंवा पंथांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझे चित्त कलुषित करतो आहे, की सर्वांभूति एकच तत्त्व पाहण्याचा प्रयत्न करतो?
३. माझ्या दैनंदिन जीवनातील विकारांमुळे माझी ऊर्जा 'अधोगामी' (खाली) जात आहे की नामस्मरणामुळे ती 'ऊर्ध्वगामी' (सकारात्मकतेकडे) प्रवास करत आहे?
४. गोंदवलेकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, "रामनाम ही अंतकाळी मुखातून निघणारी शेवटची गोष्ट असावी" यासाठी मी आजपासूनच नामस्मरणाचा 'नित्यनेम' आणि त्याची गोडी मनाला लावली आहे का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा