मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ८४

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८४

विठोने शिरी वाहिला देवराणा ।

तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ।

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।

जिवा सोडवी राम हा अंतकाळी ।।८४।।

अर्थ : प्रत्यक्ष विठ्ठलाने देवराणा म्हणजे श्रीशंकराला डोक्यावर धारण केले आहे. त्या श्रीशंकराच्या हृदयात मात्र रामनामाचा ध्यास आहे हे आपल्याला माहिती नाही का ? मस्तकी चंद्र धारण करणाऱ्या महान तपस्वी अशा भगवान शंकराचा दाह रामनामाने शांत झाला. आपल्या अंतकाळी रामनामच आपल्याला सोडवणार आहे. 

( विठोने - विठ्ठलाने, देवराणा - देवांचा राजा /महादेव, नेणा - जाणत नाही, तापसी -तपश्चर्या करणारा, चंद्रमौळी - शिरावर चंद्र धारण करणारा ( शंकर ), निवाला - शांत झाला )

विवेचन 

रामनामाचे महत्व पुन्हा स्पष्ट करणारा हा सुंदर श्लोक आहे. पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे सर्व संत, वारकरी यांचे दैवत. पांडुरंग हा श्रीकृष्णाचाच अवतार मानला जातो. असा हा भक्तांचा लाडका असणारा पांडुरंग स्वतःच्या मस्तकावर श्रीशंकराला धारण करतो. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवाच्या पिंडीचा आकार दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे पांडुरंग स्वतःच श्रीशंकराचे गुणगान करतो. या अर्थाने देखील तो शंकराला डोक्यावर घेतो असे म्हणता येईल. कारण एखाद्याचे गुणगान करणे म्हणजे त्याला मस्तकी बसवणे. तेच पांडुरंगाने केले आहे.पण समर्थ पुढे म्हणतात की ज्या विठ्ठलाने श्रीशंकराला आपल्या शिरावर घेतले आहे, त्या भगवान शंकरांच्या हृदयात देखील रामानामाचा ध्यास आहे. या ठिकाणी श्रीरामाचे आणि रामनामाचे महत्व फारच सुंदररित्या आपल्याला पटवून दिले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे समर्थ रामनामाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर ठसवण्यासाठी वारंवार श्रीशंकराचे उदाहरण का देत आहेत याचाही विचार केला पाहिजे. ज्यांच्याकडे अथांग ज्ञान आणि वैराग्य आहे, तेच जर नामाचा आश्रय घेत असतील, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचा अहंकार गळून पडायला हवा, हाच समर्थांचा यामागील हेतू असावा.

श्रीशंकरांना रामनामाचा ध्यास लागलेला आहे. रामनाम म्हणजे जणू त्यांचा श्वास आहे. अशा पद्धतीचा ध्यास आपल्यालाही लागावा अशीच समर्थांची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महान तपसामर्थ्य अंगी असणारे भगवान शंकर जेव्हा सातत्याने रामनाम जपतात, तेव्हा आपण तर सामान्य माणसे ! या श्लोकात भगवान शंकरांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात,"स्वये निवाला तापसी चंद्रमौळी." इथे निवाला शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे रामनामामुळे त्यांच्या जीवाला शांती लाभली. दुसरा अर्थ आपल्याला परिचित आहे. तो म्हणजे भगवान शंकरांनी जेव्हा हलाहल ( विष ) प्राशन केले तेव्हा त्यांच्या कंठाचा जो दाह होऊ लागला, तो कशानेही शमेना. त्यांनी मस्तकी गंगा धारण केली, गळ्याभोवती शीतल नाग धारण केला, शीतल असणारा चंद्र मस्तकी धारण केला. परंतु त्यांचा दाह केवळ रामनामानेच शांत झाला. या अर्थानेही ' निवाला ' हा शब्द वापरला आहे. 

श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत आहे. त्यांना नेहमी तो समोर दिसत असतो. म्हणून ते कधीही ' तो राम ' म्हणत नाही. तर ' हा राम ' असे म्हणतात. एवढी त्यांची रामाशी एकरूपता आहे. पांडुरंगाने ज्यांना  मस्तकी धारण केले आहे असे श्रीशंकर सुद्धा रामानामाचा ध्यास घेतात, तेव्हा असे पावन, पवित्र असे रामनाम आपली देखील अंतकाळी या भवसागरातून सुटका करील असे समर्थांना सांगायचे आहे. 

स्वसंवाद 

१. पंढरीचा विठ्ठल आणि कैलासीचा राणा शिव यांच्यात जर कोणतेही द्वैत नाही, तर मी मात्र जाती-पाती, पंथ किंवा संप्रदायांच्या खोट्या भेदांमध्ये का अडकून पडलो आहे ? 

२. संसारातील वेगवेगळ्या संकटांमुळे किंवा वासनांमुळे जेव्हा माझ्या मनाचा 'दाह' होतो, तेव्हा मी तो शांत करण्यासाठी बाह्य गोष्टींकडे धावतो, की भगवान शंकरांप्रमाणे रामनामाचा आश्रय घेतो ? 

३. समर्थांना प्रभू श्रीराम जसे 'हा राम' म्हणून अगदी जवळ (अंतर्यामी) भासतात, तशी आत्मीयता आणि ओढ मला कधी नाम घेताना जाणवते का? 

४. "अंतकाळी हाच राम आपल्याला सोडवणार आहे" हे अंतिम सत्य ठाऊक असूनही, मी माझा आजचा अमूल्य वेळ केवळ नश्वर गोष्टींची चिंता करण्यातच घालवत आहे का?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

४/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...