उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९१
नको वीट मानू रघुनायेकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ।
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ।।९१।।
अर्थ : समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात, " हे मना, भगवंताच्या नामाचा कंटाळा ( वीट ) येऊ देऊ नकोस. आपल्या मुखाने अत्यंत आदरपूर्वक रामाचे नाव घे. त्यासाठी एक पैसा देखील खर्च करावा लागत नाही. जानकीला म्हणजे सीतेला अत्यंत प्रिय असलेल्या अशा त्या श्रीरामांच्या नामाचा सतत घोष कर.
( वाचा - मुखाने, न वेचे - खर्च करावे लागत नाही )
रामनामाचे महत्वच या ठिकाणी अधोरेखित करताना समर्थ म्हणतात की हे मना, राघवाच्या नामाचा म्हणजे ते नाम घेण्याचा मुळीच कंटाळा करू नकोस. सामान्य माणसांची मानसिकता समर्थ जाणून आहेत. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली तरी आपल्याला कंटाळा येतो. भगवंत हा तर निर्गुण, निराकार. काही काळ हे नाम घेतल्यानंतर त्याचा काही अनुभव जेव्हा मिळत नाही, तेव्हा सामान्य माणूस ती गोष्ट सोडून देतो. आपण दृश्य जगात जास्त अडकतो. ध्यान करायला बसलो तर डोक्यात नाना विचार येतात. चित्त एकाग्र होत नाही. एखादे उत्तम पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला टीव्ही पाहायला, मोबाईल बघायला जास्त आवडते. दृश्याकडे आपली धाव जास्त असते. तसा अनुभव नामात मिळायला दीर्घ काळ जावा लागतो. नामाची साधना न कंटाळता सातत्याने निश्चयपूर्वक सुरु ठेवावी लागते. हे नामच मला तारून नेईल. या जन्मी जरी मला भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी पुढील जन्मी का होईना पण ती होईल. परंतु मी भगवंताचे नाम घेणे सोडणार नाही असा निर्धार हवा. ज्याला भगवंत हवा आहे, त्याला श्रद्धेने भगवंताचे नाम अखंड मुखात यायलाच हवे.
ते नाम किती सोपे आहे ! त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. भगवंत प्राप्तीचे इतरही मार्ग आहेत. काही मार्गात कठोर तपश्चर्या करावी लागते, तर कोठे तीर्थयात्रा, यज्ञयागादी गोष्टींसाठी भरपूर पैसा लागतो. नामासाठी या कोणत्याच गोष्टी लागत नाहीत. बसल्याजागी काम करताना देखील हरिनामाचा जप करता येतो. म्हणूनच भगवंत प्राप्तीचा हा सोपा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात. या मार्गाने भगवंत विनासायास प्राप्त होतो. आपण हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट शोधत असतो. भगवंत प्राप्तीसाठी ' नाम ' हाच शॉर्टकट समजायला हरकत नाही. संत सोयराबाई म्हणतात," सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी." सर्व संतांचे हेच सांगणे आहे. शब्द वेगळे असतील पण सांगण्यात एकवाक्यता आहे.
समर्थांनी या श्लोकात श्रीरामाच्या एका लोकप्रिय नामाचा उल्लेख केला आहे. ' जानकीवल्लभ ' हे ते नाम ! सीता जनक राजाची कन्या म्हणून जानकी. जानकीला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे. ती म्हणजे श्रीराम !अशा या सीतामातेला जो प्रिय आहे, तो श्रीराम आपल्यालाही प्रिय व्हावा. त्याचेच नाम आपल्या मुखात सातत्याने यावे असे समर्थाना वाटते. ज्यांनीं ज्यांनी त्याचे नाम घेतले ते हा भवसागर तरून गेले. त्यानेच आपले कल्याण होईल. "अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं।" या मंत्रातला गोडवा जो प्रेमाने आणि आदराने ते नाम घेईल, त्यालाच कळेल.गोंदवलेकर महाराज रामनामात पेढ्यासारखी गोडी आहे असे म्हणतात. पण पेढा गोड आहे असे नुसते म्हटले तर त्याची गोडी थोडीच जिभेवर येते ? त्यासाठी तो खाऊनच पाहावा लागतो. पेढ्याचा कोणताही तुकडा खाल्ला तरी तो गोडच लागणार. तसेच भगवंताचे नाम आहे. त्याचे कोणतेही नाम गोडच आहे. ' केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. 'अनुभवून तर बघा !
स्वसंवाद
१. मोबाईल किंवा टीव्ही तासनतास बघताना मला कंटाळा येत नाही, मग विनामूल्य असणारे रामनाम घेताना माझ्या मनाला 'वीट' (कंटाळा) का येतो ?
२. "नामस्मरण हाच भवसागर तरून जाण्याचा सर्वात सोपा आणि विनासायास मिळणारा शॉर्टकट आहे," या संतांच्या वचनावर माझा दृढ विश्वास बसला आहे का ?
३.
४. संत चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे, मी माझ्या रोजच्या कामाच्या व्यापातून किती वेळ 'आवडीने आणि आदराने' त्या विठोबाचे किंवा राघवाचे नाव घेण्यासाठी काढतो ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१०/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा