उगवतीचे रंग
माझं जीवन हाच माझा संदेश...
नाशिक आजचं आणि पूर्वीचं...! जमीन-अस्मानाचा बदल झाला आहे यात. काळानुसार शहराचे चेहरेमोहरे बदलले, पण एक गोष्ट मात्र शतकानुशतके तीच राहिली आहे—ती म्हणजे ही संथ वाहणारी गोदामाई! पण तिचं पाणी तेव्हा मुक्तपणे, अवखळपणे वाहत होतं. आज ते ठिकठिकाणी सिमेंटच्या भिंतींनी अडवलंय. ते पाणी तेव्हा ओंजळीने सहज पिता यायचं; आजची परिस्थिती तर तुम्ही जाणताच. इथे बारा वर्षांतून एकदा कुंभमेळा भरतो, त्यानिमित्ताने शहरात नव्या तयारीची लगबग सुरू असते. मी काठावर उभा राहून ती सगळी गर्दी, तो कोलाहल पाहत असतो... आणि मग माझ्या मनात चक्रं फिरतात, मला आठवतात ते पूर्वीचे दिवस!
साधारण ७,००० वर्षांपूर्वीची ही गोष्ट. ज्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती, रस्ते नव्हते, चहूकडे फक्त अथांग आणि घनदाट जंगले होती. अशा अरण्यांमध्ये हिंस्ट्र श्वापदे आणि क्रूर प्रवृत्तीच्या राक्षसांची वस्ती होती. अशा एका भीषण कालखंडात या जीवनकथेची सुरुवात होते.
माझे नुकतेच लग्न झाले होते. डोळ्यांत भविष्याची सुंदर स्वप्ने रेंगाळत होती. सुखाचे दिवस आता मोरपिसारा फुलवून अंगणात आले असे वाटत असतानाच, अचानक परिस्थितीने एक क्रूर वळण घेतले. नियतीच्या एका फटकाऱ्यासरशी मला अचानक राजवैभव, राजमुकुट सोडून १४ वर्षांचा वनवास पत्करावा लागला. महालात सुखासीन आयुष्य जगलेली माझी सुशील, सुकुमार आणि सुंदर पत्नी मला संकटात साथ देण्यासाठी राजवैभवाचा त्याग करून स्वतःहून माझ्यासोबत वनवासात आली. मी कितीही नाही म्हणत असताना, माझ्यावर अपार प्रेम करणारा आणि जणू माझेच प्रतिबिंब असलेला माझा धाकटा भाऊदेखील आमची सावली बनून सोबत निघाला. उत्तरेकडून प्रवास करत करत आम्ही या दक्षिणायनात येऊन पोहोचलो. सोपा नव्हता हा प्रवास; या वाटेने आम्हाला जगण्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.
असे भटकत आम्ही आलो नाशिकच्या या रम्य परिसरात. घनदाट अरण्य, वटवृक्षांची केवढी ती गर्दी आणि त्यांची ती शीतल छाया! हे ठिकाण आमच्या मनाला खूप भावले. ठरवले, आता काही काळ तरी इथंच मुक्काम करायचा. खळाळत वाहणारी गोदामैयाही जणू आम्हाला साद घालत होती, "आता दुसरीकडे कुठे जाऊ नका, माझ्याच कुशीत विसावा घ्या." मग गोदेच्या त्या सुंदर, निर्मळ जलाच्या काठी, पंचवटीच्या निसर्गरम्य परिसरात आम्ही आमची छोटीशी पर्णकुटी बांधली. तिथल्या पावन वातावरणात आमचा संसार सुखाचा सुरू झाला. दिवस सुखाचे जात होते... पण एक दिवस अचानक घात झाला!
मी कुटीत नव्हतो आणि परतून पाहतो तर माझी लाडकी, प्राणप्रिय पत्नी तिथे नव्हती! कोणीतरी तिचे कपटाने हरण केले होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली, डोळ्यांसमोर गहिरा अंधार दाटून आला. कोण होता तो? कुठे घेऊन गेला असेल तिला? काहीच ठाऊक नव्हते. आयुष्यात असं काही वादळ येईल, याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
सामान्यांसारखे डोळ्यात पाणी आणून खचून बसण्याचा तो क्षण होता. पण अंतरात्म्याने हार मानणे नाकारले. मी ठरवले,' छे असं हताश होऊन नाही चालणार.परिस्थितीपुढे गुडघे टेकायचे नाहीत ! मी आणि माझ्या धाकट्या भावाने पाठीवर धनुष्यबाण चढवले, विझलेला निखारा पुन्हा पेटवला आणि त्या अनोळखी, खडतर वाटेवर पाऊल ठेवले. वाट दिसेल तिकडे आम्ही मार्गक्रमण करू लागलो. पायात पादत्राणे नव्हती की पाठीशी राज्याचे लष्कर नव्हते की हाती कोणती सत्ता नव्हती. होते ते फक्त मनातले ध्येय आणि सत्यावरची अढळ निष्ठा!
आम्ही दक्षिण दिशेने पायी चालू लागलो. वाटेत संकटांचे महाकाय डोंगर उभे होते. पण या प्रवासात मला एक गोष्ट उमजली—आयुष्यात संकटं कितीही मोठी आली, तरी निराश होऊन थांबायचं नसतं. जो थांबला तो संपला, जो चालत राहिला तोच जिंकला! या प्रवासात आम्हाला जंगलात राहणारी, वंचितांचे आणि शोषितांचे आयुष्य जगणारी साधी-भोळी वनवासी माणसे भेटली. त्यांच्यावर एका बलाढ्य, उन्मत्त आणि अत्यंत शक्तिशाली सम्राटाचा भयंकर जुलूम सुरू होता. तो शत्रू इतका बलाढ्य होता की त्याच्याकडे सोन्याची नगरी होती, अथांग सैन्य होते आणि अफाट ताकद होती. ही साधीभोळी माणसे त्याच्या दहशतीच्या छायेत आपले रोजचे आयुष्य कंठत होती. या अशा भयाण जगण्याला काय जगणं म्हणायचं? हे सगळं माझ्या मनाला खटकत होतं. मी ठरवलं, स्वतःचं दुःख काही काळ बाजूला ठेवायचं आणि या भोळ्या-भाबड्या लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवायचं!
वेळ पडली तर मला देखील या अन्यायी महासत्तेशी लढावं लागणार होतं. मी विचार केला, मी एकटा या महासत्तेशी कसा लढणार? पण अंतर्मनाने सांगितले की खरी शक्ती ही केवळ शस्त्रात नसते, ती असते माणसांच्या एकजुटीत आणि आत्मबळात ! मी त्या जंगलातील आदिवासींना, वानर समूहाला एकत्र केले. त्यांना हाक दिली, "मित्रहो, जुलूम सहन करणे हे मरणाहून वाईट आहे. घाबरू नका, मी तुम्हाला लढायला शिकवीन!" त्यांचा माझ्या शब्दावर विश्वास बसला. आम्ही त्यांना एकत्र आणले, संघटित केले, युद्धकलेचे प्रशिक्षण दिले, त्यांना त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून दिली; आणि पाहता पाहता एका मातब्बर हुकूमशहाविरुद्ध एक अभेद्य 'लोकचळवळ' उभी राहिली. त्या वनवासी मंडळींनी मग माझ्या संकटात सावलीसारखे उभे राहण्याची तयारी दाखवली.
तिथून पुढे आम्ही भारताच्या दक्षिण टोकापर्यंत, म्हणजेच अथांग समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलो. समोर पसरलेला महासागर गर्जत होता. आपल्याला ज्या शत्रूशी मुकाबला करायचा आहे, तो पार या समुद्रापलीकडे आहे हे समजले होते. पण आता वाट संपली होती. शत्रू समुद्रापलीकडे वैभव उपभोगत होता आणि आम्ही अलीकडे किनाऱ्यावर उभे होतो. पुन्हा तोच यक्षप्रश्न—हा अथांग समुद्र कसा ओलांडायचा? पण जेव्हा हेतू प्रामाणिक आणि पवित्र असतो, तेव्हा निसर्गही रस्ता देतो. आम्ही दगड-धोंडे गोळा केले, प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे खारीचा वाटा उचलला आणि विश्वासाच्या बळावर समुद्रावरही सेतू बांधून पूर्ण केला ! आजपर्यंत समुद्रावर सेतू कोणी बांधला नव्हता. पण ते आश्चर्य घडले. सगळ्यांच्या साथीने आणि सहकार्याने ही अशक्य वाटणारी गोष्ट साध्य झाली.
त्यानंतर काय झाले, तो एक इतिहासच आहे. अटीतटीचे, घनघोर युद्ध झाले. आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले होते. अखेर तो बलाढ्य, उन्मत्त शत्रू पराभूत झाला; अधर्माचा नाश झाला आणि सत्याचा विजय झाला! पण हे सगळे यश केवळ माझे नव्हते. माझ्यासाठी प्राणाची आहुती द्यायला तयार असणाऱ्या माझ्या साऱ्या वनवासी, सहकारी बांधवांच्या एकजुटीचे हे यश होते. तिथेच माझी प्राणप्रिय पत्नी मला पुन्हा भेटली. विजय मिळवल्यानंतर माझ्या हातात त्या शत्रूचे अथांग, सोन्यासारखे लखलखणारे साम्राज्य चालून आले होते. कोणीही असते तर त्या वैभवाला भुलले असते. माझ्या भावानेही भावनावश होऊन मला विचारले, "दादा, आपण आपले राज्य तर सोडलेच आहे, तर या सुवर्ण भूमीतच राहायला काय हरकत आहे ?"
पण मी मंद हसलो. मी त्या सुवर्णनगरीकडे पाहिले आणि म्हणालो, "नाही बंधो, हे वैभव कितीही अथांग असले, तरी माझ्या मातृभूमीची सर याला येऊ शकत नाही!"
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
(ही सोन्याची लंका मला भुरळ पाडू शकत नाही. जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.)
मित्रांनो, हा माझा ७,००० वर्षांपूर्वीचा प्रवास आज तुम्हाला का सांगतोय? कारण, तुम्हा प्रत्येकाचं जीवन ही देखील एक अविरत लढाई आहे, हे मी जाणतो. आज तुम्हीही अशाच अनंत संकटांशी, अपयशाशी लढत आहात. तुमच्या जगातील समस्या कदाचित वेगळ्या असतील, आधुनिक जीवनशैलीने त्या तुमच्यासमोर उभ्या केल्या असतील. पण परिस्थिती कशीही असू द्या, शाश्वत जीवनमूल्ये कधीही कालबाह्य होत नाहीत!
हिंमत हरू नका. अनंत संकटे वेगवेगळ्या रूपात तुमच्या समोर उभी राहतील. कधी पराभव स्वीकारावा लागेल, कधी अपमान होईल, तर कधी विपरीत परिस्थिती मानसिक खच्चीकरण करेल. कधी एखादा बलाढ्य वाटणारा आजार किंवा बिकट आर्थिक परिस्थिती तुमच्यासमोर रावणासारखी उभी ठाकेल. पण लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही अंधःकारमय असली, तरी धीर सोडू नका. तुमच्यातल्या सुप्त आत्मबळाला जागवा, प्रामाणिक माणसांची साथ घ्या आणि लढत राहा. मात्र, कोणतीही किंमत मोजावी लागली तरी आपली जीवनमूल्ये आणि आदर्श कधीही सोडू नका.
कदाचित तुम्हाला वाटेल, या पडत्या काळात हा अनुभव सांगणारा मी कोण?
मी दुसरा कोणी नसून, ७,००० वर्षांपूर्वी नाशिकच्या याच गोदावरीच्या काठावरून, पंचवटीतून पायी निघून, अथांग समुद्र ओलांडून लंकेवर विजय मिळवणारा, दशरथाचा पुत्र 'राम' आहे. आणि हा माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा जीवनप्रवास आहे. लक
Ⓒविश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा