मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ९७

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९७ 

मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची ।

अहंतागुणे यातना ते फुकाची ।

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।

म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ।।९७।।

अर्थ : ज्याच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही त्याला मुक्ती कशी मिळणार ? कर्तेपणाच्या अहंकारातून माणसाला विनाकारण यातना भोगाव्या लागतात. शेवटी मृत्यू येतो तो सुद्धा अत्यंत करुणाजनक. म्हणून सर्वानी भगवंताचे नाम घ्यायलाच हवे. 

विवेचन 

आयुष्यभर भगवंताचे नाम घ्यायचे नाही, भक्ती करायची नाही आणि अंतकाळी भगवंताने आपल्याला मुक्ती द्यावी अशी अपेक्षा करायची. पण काही केलेच नाही तर मुक्ती मिळेल कशी ? मुक्तीची अशी अपेक्षा करणे म्हणजे शेतात धान्य पेरण्याचे श्रम करायचे नाहीत आणि आयते धान्य किंवा पीक आपल्या घरात येईल अशी अपेक्षा करण्यासारखेच आहे. आपल्याला आपल्या कर्तेपणाचा भयंकर अभिमान असतो. मी हे केले, मी ते केले. माझ्यामुळेच सगळे होते आहे असा अभिमान मनुष्य बाळगतो. पण शेवटी एक दिवस हा कर्तेपणाचा फुगा फुटतो. वृद्धापकाळी मुले, सुना विचारत नाहीत तेव्हा मनात निराशा घर करते. मी आयुष्यभर एवढे कष्ट केले, मुलांना शिकवून मोठे केले, त्यांचे लग्न केले. पण एवढे असूनही ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत. आपण दुर्लक्षित आहोत ही भावना सर्वात जास्त अस्वस्थ करणारी असते. 

गोंदवलेकर महाराज म्हणतात, " देहाने कर्म करा, पण कर्तेपण स्वतःकडे घेऊ नका. कर्ता राम आहे असे म्हणा." आपले चुकते ते इथेच. आपण कर्तेपण रामाकडे देत नाही. म्हणून आपल्याला अपेक्षाभंगाचे दुःख भोगावे लागते. त्याशिवाय कर्तेपणाच्या धुंदीत भगवंताचे नाम घेतो कोण ? निदान निवृत्त झाल्यावर तरी भगवन्नामात रमण्याची सवय लावून घ्यावी. ही सवय लागली तर संसाराचा मोह हळूहळू कमी होतो, आसक्ती कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत मृत्यू आला तरी तो सुखाचा होतो.पण ही सवय नसेल तर मृत्यूप्रसंगी  देखील संसारातील आसक्ती कमी होत नाही. जो मनुष्य नाम घेत नाही त्याचा अंत दीनवाणा होतो. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येकाने देवाचे नाव घ्यावेच घ्यावे. समर्थ आपल्या एका अभंगात म्हणतात, " काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा । काही धावाधाव करी । जंव तो काळ आहे दूरी ।।"

स्वसंवाद 

१. माझ्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी केलेल्या कष्टांमध्ये मी 'मी केले' हा कर्तेपणाचा अहंकार बाळगून विनाकारण मानसिक यातना तर ओढवून घेत नाहीये ना? 

२. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझे कर्तव्य चोख पार पाडताना "या सगळ्याचा कर्ता-धर्ता तो प्रभू श्रीराम आहे" हा भाव मनात ठेवू शकतो का?

 ३. "मी मुलांसाठी एवढे केले तरी ते मला विचारत नाहीत" या विवंचनेत जगण्याऐवजी, मी आतापासूनच भगवंताच्या नामात रमून संसाराची आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतोय का?

 ४. समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे जर काळ क्षणोक्षणी पुढे जात आहे आणि मृत्यू अटळ आहे, तर मग माझ्या उद्धारासाठी 'देवराणा' श्रीरामाचे नाव घेण्यास मी अजून उशीर का करत आहे ? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१५/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...