उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८७
मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।
हरिभक्त तो शक्त कामास मारी ।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ।।८७।।
अर्थ :
ज्या व्यक्तीच्या मुखी रामनाम आहे, त्याला कामवासना त्रास देऊ शकत नाही. नामाच्या शक्तीमुळे कामवासनेवर ताबा मिळवण्यासाठी लागणारे धैर्य त्याला आपोआप प्राप्त होते. नामामुळे सामर्थ्य प्राप्त झालेला भगवंताचा भक्त कामवासनेला सहज नष्ट करू शकतो. या गोष्टीचे मूर्तिमंत उदाहरण असलेला आणि ब्रह्मचर्याचे पालन करणारा मारुती जगामध्ये खरोखरच धन्य झाला आहे.
( काम - कामवासना, गुणे - त्या योगाने, शक्त - सामर्थ्य )
विवेचन
काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे माणसाचे मोठे शत्रू आहेत. ठरवले तर क्रोध, मद , मोह आदी विकारांवर नियंत्रण मिळवणे सोपे असते. परंतु काम हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू. त्यावर नियंत्रण प्राप्त करणे भल्याभल्यांनाही अवघड. विश्वामित्रांसारख्या तपस्वी ऋषींची तपश्चर्या मेनकेने भंग केली. पराक्रमी आणि विद्वान असलेला रावण आपल्या कामवासनेवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कामवासना जिंकणे अत्यंत अवघड. संसारी माणसाला कामवासनेचा मर्यादित उपभोग घेण्यास शास्त्रांची ना नाही. परंतु साधना करायची असेल तर संसारी व्यक्तीने देखील कामवासनेवर नियंत्रण ठेवणे क्रमप्राप्त असते. आपण ' काम ' आणि ' राम ' दोन्ही एकाच वेळी साध्य करू शकत नाही. ' राम ' हवा असेल तर ' काम ' सोडावा लागेल.
परंतु ज्याच्या मुखी रामनाम येते आहे, अशी व्यक्ती कामवासनेवर विजय मिळवू शकते. त्याला कामवासना बाधित करू शकत नाही. रामभक्त हनुमान हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्याच्या हृदयात रामनामाचा अखंड जप सुरु आहे. त्यामुळे ' काम ' भावनेला तेथे थारा नाही. हनुमंत म्हणजे अखंड ब्रह्मचर्य पालन करणारा. मुखात रामनाम आणि ब्रह्मचर्य पालन यामुळे त्याच्या अंगी धैर्य, शक्ती यासारखे इष्ट गुण निर्माण झाले आहेत. त्याला ' काम ' विचलित करू शकत नाही. जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी तो लंकेत गेला तेव्हा रावणाच्या अंतःपुरात अनेक सुंदर स्त्रिया नको त्या अवस्थेत त्याच्या नजरेस पडल्या. परंतु सदैव जो रामनामातच रंगला आहे, अशा महाबली हनुमंताला ते दृश्य विचलित करू शकले नाही. सीतेच्या समोरही तो आपल्या स्वतःचा तिचा पुत्र म्हणून उल्लेख करतो. म्हणूनच ब्रह्मचारी असलेला हनुमान जगात धन्य आहे.
म्हणून समर्थ म्हणतात, " हरिभक्त तो शक्त कामास मारी " जो कायम हरीची भक्ती करतो, असा सामर्थ्यशाली माणूस कामवासनेला मारून टाकण्यासाठी समर्थ असतो. अशा व्यक्तीचे नाम परा वाणीपर्यंत पोहोचलेले असते. परा वाणीचे केंद्र हे नाभीजवळ आहे असे म्हटले जाते. कामवासनेचे केंद्र देखील त्याच ठिकाणी आहे. एकदा का नाम नाभीपर्यंत परा वाणीच्या माध्यमातून पोहोचले की तेथे कामवासना राहूच शकत नाही. संत कबीर म्हणतात, " जहाँ काम तहाँ राम कहाँ । जहाँ राम तहाँ काम कहाँ ।"
स्वतः समर्थच या श्लोकाचे उत्तम उदाहरण आहेत. मुखी अखंड रामनाम आणि ब्रह्मचर्य पालन. त्यामुळे शक्ती, धैर्य हे गुण आपोआपच त्यांच्या ठायी वास करीत होते. त्यामुळे रामसेवेचे मोठे कार्य त्यांच्या हातून घडले. म्हणूनच तेही जगात धन्य आहेत.
स्वसंवाद
१. माझ्या दैनंदिन व्यवहारात माझे मन बाह्य आकर्षणे किंवा विकारांमुळे विचलित होते का? अशा वेळी मी हनुमंताप्रमाणे रामानामाचा आश्रय घेतो का ?
२. "जिथे काम तिथे राम नाही, आणि जिथे राम तिथे काम नाही," हे कबीरांचे वचन लक्षात ठेवून मी माझ्या मनात प्रभू श्रीरामांना अढळ स्थान दिले आहे का ?
३. माझ्या हातून होणारे नामस्मरण केवळ ओठांवर (वैखरी) आहे, की ते नाभीपर्यंत (परा वाणी) पोहोचून माझ्या विकारांचे शुद्धीकरण करत आहे ?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, स्वतःमध्ये 'धैर्य आणि शक्ती' हे उत्तम गुण निर्माण करण्यासाठी मी रोजच्या धावपळीत जाणीवपूर्वक भगवंताचे नाम घेतो का ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा