मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १०७

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०७ 

मना कोप आरोपणा ते नसावी ।

मना बुधि हे साधुसंगी वसावी ।

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।

मना होई रे मोक्षमार्गी विभागी ।।१०७।।

अर्थ : हे मना, क्रोधाला आपल्यावर स्वार होऊ देऊ नकोस. आपल्या बुद्धीचा वापर साधुसंतांच्या सहवासात राहण्यासाठी कर. हे मना, दुष्ट किंवा वाईट लोकांच्या संगतीचा त्याग कर. ( आणि अशा रीतीने ) मोक्षमार्गाचा वाटेकरी हो. 

( कोप - क्रोध/राग, आरोपणा - आरोहण करणे /स्वार होणे, नष्ट - दुष्ट /वाईट, चांडाळ - कर्माने किंवा वागणुकीने नीच मनुष्य, विभागी - वाटेकरी )

विवेचन 

साधकासाठी अत्यंत महत्वाचा उपदेश समर्थांनी या श्लोकात केलेला आपल्याला आढळतो. व्यवहारात आणि परमार्थात क्रोध अपार हानी करतो. ज्याला आपल्या क्रोधावर ताबा ठेवता आला, त्याला आपल्या मनावर ताबा ठेवता आला असे म्हणायला हरकत नाही. व्यावहारिक जीवनात क्वचित प्रसंगी क्रोध येणेही जरूर असते. पण त्याला आपल्या डोक्यावर किती स्वार होऊ द्यायचे हे आपल्याला ठरवता आले पाहिजे. साधकाने तर क्रोधरहित व्हायला शिकले पाहिजे. कारण अति क्रोधामुळे सर्वनाश होऊ शकतो. क्रोधाचा भर ओसरल्यावर होणाऱ्या पश्चातापाचा मग काही उपयोग होत नाही. 

त्यासाठी समर्थ म्हणतात की आपली बुद्धी साधुसंगी वसावी. म्हणजे संत किंवा सज्जन व्यक्तींच्या सहवासात आपण राहिले पाहिजे. आपण कोणाचा संग करतो त्यावरही आपले चारित्र्य अवलंबून असते. " Man is known by the company he keeps." अशी एक इंग्रजी म्हण आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात सज्जनांचा संग करा. सज्जनांच्या किंवा सद्गुरूंच्या सहवासात केवळ देहाने असता उपयोगी नाही. मनाने आणि बुद्धीने देखील त्यांच्या सोबत राहायला हवे. बऱ्याच वेळा थोर पुरुषांच्या सहवासात आलेले त्यांचे नातेवाईक किंवा अनुयायी त्यांची शिकवण न घेता, त्यांचा फायदा आपल्या प्रपंचासाठी करून घेतात. स्वामी समर्थांच्या चरित्रात त्यांचे भक्त म्हणवणाऱ्या अशा अनेक ढोंगी  व्यक्तींची उदाहरणे आपल्याला वाचायला मिळतात. तेव्हा संतांच्या सहवासात मनाने आणि बुद्धीने त्यांचेच होऊन जावे. 

मोरोपंत सुद्धा " सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो " असे म्हणतात. तर तुकाराम महाराजांनी " न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा," असे म्हटले आहे. थोडक्यात संतांचा सहवास हा परीस स्पर्श असतो. तो एकदा झाला की आपल्यातील अहंकार, कर्तेपणा, मी पणा गळून पडतो. क्रोधाची जी सामुग्री असते तीच त्यांच्या सहवासात नष्ट होते. प्रत्यक्ष संतांचा सहवास जरी नाही मिळाला तरी आजच्या काळात त्यांच्या ग्रंथांचे वाचन आणि त्यात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे मनापासून पालन करणे हा देखील संतांचा सहवासच आहे.  त्यामुळे ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा यासारख्या कुठल्यातरी एका ग्रंथाचे नियमितपणे वाचन करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांच्या सहवासात राहण्यासारखेच आहे असे म्हणता येईल.

दुष्ट किंवा वाईट व्यक्तींची संगत जाणीवपूर्वक सोडायला हवी. त्यांच्या सहवासात त्यांचे गुण आपल्यालाही लागण्याची शक्यता असते. वाईटाचे, खोट्या गोष्टींचे समर्थन करण्यात मग आपल्यालाही काही वावगे वाटत नाही. ज्यांचे कर्म अत्यंत दुष्टपणाचे असते, समाजाच्या दृष्टीने घातक असते, अशा व्यक्तींसाठी समर्थांनी ' चांडाळ ' असा शब्द वापरला आहे. ज्यांना मोक्षमार्गावर वाटचाल करायची आहे, त्यांनी तर अशा व्यक्तींचा सहवास कटाक्षाने टाळायला हवा. संतांच्या सहवासात वावरताना मनाने आणि बुद्धिनेही त्यांचे आचरण आत्मसात करून त्यांच्याशी एकरूप व्हावे. क्रोधाचा जाणीवपूर्वक त्याग करावा. अशा रीतीने आपण मोक्षमार्गाचे वाटेकरी व्हावे अशी समर्थांची इच्छा आहे. 

स्वसंवाद 

१. माझ्या मनात येणाऱ्या क्रोधाला (रागाला) मी माझ्या बुद्धीवर आणि नातेसंबंधांवर 'आरोपण' करू (स्वार होऊ) देतो का? राग शांत झाल्यावर मला पश्चात्ताप होतो का? 

२. संतांच्या किंवा सज्जन विचारांच्या सहवासात असताना, मी केवळ माझ्या सांसारिक 'स्वार्थाचा' विचार करतो, की माझ्या अंतःकरणाचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यांचे विचार बुद्धीने आत्मसात करतो? 

३. मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे, "सुसंगती सदा घडो," हे माहीत असूनही मी माझ्या दैनंदिन व्यवहारात केवळ स्वार्थासाठी वाईट किंवा नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची संगत बाळगतो का? 

४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, संसाराच्या विवंचनेतून बाहेर पडून अंतरीची शांती मिळवण्यासाठी मी या 'मोक्षमार्गाचा' वाटेकरी (विभागी) होण्यास तयार आहे का? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२३/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...