उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०५
विवेके क्रिया आपुली पालटावी ।
अति आदरे शुध क्रिया धरावी ।
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।
मना कल्पना सोडी संसार तापा ।।१०५।।
अर्थ : विवेकाच्या साहाय्याने आपल्या वागणुकीत बदल करावा. चांगले आचरण जाणीवपूर्वक आणि आदरपूर्वक करावे. आपले वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असावी. हा संसार जरी दुःखमय असला तरी त्याविषयी उगीचच नको त्या कल्पना करणे सोडून द्यावे.
( विवेक- सारासार विचार, पालटावी - बदल घडवून आणावा, शुध - चांगले/उत्तम आचरण, संसार तापा - संसारातील दुःख )
विवेचन
साधकाने कसे वागावे हे समर्थ मागील श्लोकाप्रमाणे याही श्लोकात सांगत आहेत. आयुष्यात आणि परमार्थ मार्गावर वाटचाल करताना देखील विवेक अतिशय महत्वाचा. विवेकबुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी. काय चांगले आहे, काय वाईट आहे हे समजून त्याप्रमाणे वागणे म्हणजे विवेक. दुर्योधन एकदा श्रीकृष्णाला म्हणाला होता की मला चांगले काय आहे हे समजते. मी वागतो ते वाईट आहे हेही मला समजते. पण मला चांगले वागण्याची बुद्धीच होत नाही. इथे दुर्योधनाच्या वागण्यात विवेक बुद्धीचा अभाव आढळतो. चांगले आणि वाईट म्हणजे श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे आपल्या अंतिम हिताची जी गोष्ट आहे त्याची निवड करणे. प्रेयस गोष्ट सुरुवातीला आकर्षक वाटत असली तरी अंतिमतः आपली हानी करणारी असते. नियमित व्यायाम करणे अंतिमतः माझ्या हिताचे आहे. पण आळसामुळे मला झोप प्रिय वाटते. इथे मी श्रेयसची निवड न करता प्रेयस निवडतो. ते अंतिमतः हानिकारक आहे.
वाईट सवयींचे वळण लागण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. पण चांगल्या गोष्टींची सवय जाणीवपूर्वक लावावी लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात की ' शुध क्रिया धरावी ' म्हणजे जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टींचे आचरण करावे. विवेकाच्या साहाय्याने आपल्या वागण्याबोलण्यात योग्य तो बदल घडवावा.तो सुद्धा कसा ? तर समर्थ म्हणतात, ' अति आदरे.' त्या गोष्टींबद्दल मनात आदर बाळगून आदरपूर्वक त्यांचे आचरण करावे. आपल्या वागण्याने सज्जनांना आनंद होईल अशा प्रकारे वागावे. ' सदाचार हा थोर सांडू नये तो ' असे समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात सांगितले आहेच. पण चांगल्या गोष्टी या पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात.
बऱ्याच वेळा आपले बोलणे आणि वागणे यात अंतर पडते. आपण बोलतो काही आणि करतो काही. म्हणजेच आपल्या ' कथनी और करनी ' यात फरक असतो. एखादी व्यक्ती वारंवार अशा पद्धतीने वागू लागली की समाज अशा लोकांवर विश्वास ठेवत नाही. त्यांच्या शब्दाला काडीचीही किंमत लोक देत नाहीत. म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण जसे बोलतो तसे वागावे.
हा संसार दुःखमय आहे हे मान्य. त्यात पूर्णपणे सुखी आहे अशी कोणीच व्यक्ती नाही. पण म्हणून आपल्या भविष्याविषयी उगीच चिंता करीत बसू नये. कोणी भविष्यात आपले कसे होईल याच्या कल्पना करीत बसतात तर कोणी नको त्या कल्पनेच्या मनोराज्यात रमतात. कल्पनेनेच आपण स्वतःला दुःखी करून घेतो किंवा काल्पनिक गोष्टींमध्ये सुख मानत बसतो. संसार दुःखमय आहेच त्यात आणखी भर अशा कल्पना करून कशाला टाकायची ? कल्पनाच करायची झाली तर ती चांगल्या गोष्टींची करावी. ज्या गोष्टींची कास आपल्याला धरायची आहे त्याबद्दल कल्पना करायला हरकत नाही. कारण त्यातूनच त्या चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा आपण करू शकू.
स्वसंवाद
१. दुर्योधनाप्रमाणे मलाही एखादी गोष्ट 'चुकीची आहे' हे माहीत असूनही, मी केवळ तात्कालिक सुखासाठी (प्रेयससाठी) विवेकाचा बळी देऊन त्याच मार्गावर चालत राहतो का?
२. चांगल्या सवयी आणि आचरण अंगी बाणवण्यासाठी मी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक आणि 'अति आदराने' (मनापासून) प्रयत्न करतो, की आळसाला शरण जातो?
३. चार लोकांमध्ये आदर्श विचार मांडताना, प्रत्यक्षात माझ्या कुटुंबात आणि व्यवहारात माझे बोलणे आणि वागणे यात तंतोतंत एकवाक्यता (प्रामाणिकपणा) असते का?
४. संसारातील चालू घडामोडींना सामोरे जाण्याऐवजी, मी भविष्यातील काल्पनिक संकटांचे 'मनोराज्य' उभे करून स्वतःचा 'संसार ताप' (चिंता) विनाकारण वाढवत आहे का? (क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२२/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा