उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०४
क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चीत दुश्चीत ते लाजवीते ।
मना कल्पना धीट सैराट धावे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ।।१०४।।
अर्थ : मनुष्य निरनिराळ्या प्रकारे बोलतो. परंतु बोलण्याप्रमाणे त्याचे स्वतःचेच वागणे नसल्याने त्याचे मनच त्याला आतून लाजवते. प्रत्यक्ष आचरण न करता ज्याचे मन नुसत्या स्वैर कल्पना करण्यात दंग असते अशा मनुष्याला परमेश्वर कसा प्रसन्न होईल ?
( नानापरी - विविध प्रकारे, चीत - चित्त, दुश्चित - वाईट विचारांनी दूषित झालेले मन, सैराट - स्वैरपणे/बेलगाम, धीट - अनियंत्रित )
विवेचन
व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांचे बोलणे मोठे आकर्षक असते. आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर छाप पडण्याचा प्रयत्न ते करीत असतात. परंतु ज्यावेळी त्यांच्या परीक्षेचा प्रसंग येतो, तेव्हा अशी माणसे उघडी पडतात. अशी माणसे लोकांना आपल्या बोलण्याने काही काळ प्रभावित करण्यात यशस्वी देखील होतात पण त्यांचे अंतर्मनच त्यांना सांगत असते की तू खोटे बोलतो आहेस, लोकांना फसवतो आहेस. अशा वेळी त्यांचीच त्यांना लाज वाटते. पण हा आतला आवाज ऐकून जे सावध होतात त्यांना प्रगतीची काहीतरी संधी नक्कीच असते. पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून जे आपले वागणे सुरूच ठेवतात, अशा व्यक्ती परमेश्वरापासून लांबच जातात. जे स्वतःशीच प्रामाणिक नाहीत, ते परमेश्वराला कसे प्रसन्न करून घेणार ?
महाराष्ट्रातील एका कीर्तनकाराचे उदाहरण या बाबतीत सांगता येईल. त्यांच्या कीर्तनाला अक्षरश: हजारोंचा जनसमुदाय जमत होता. आपल्या कीर्तनात हे बुवा आपल्या मुलामुलींचे लग्न अत्यंत साधेपणाने करा. अवास्तव खर्च, थाटमाट या सगळ्या गोष्टींना फाटा द्या असे आवाहन करीत. आजची परिस्थिती पाहता सामाजिक बदलाच्या दृष्टीने त्यांची ही सूचना योग्यच होती. कारण सामान्य परिस्थितले अनेक लोक किंवा गरीब शेतकरी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून अडचणीत येतात. पण ज्यावेळी त्यांच्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा त्यांनी साखरपुड्यालाच एवढा प्रचंड खर्च आणि थाटमाट केला की त्यापुढे श्रीमंतांकडील लग्नही फिके पडावे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ' बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.' प्रत्यक्ष आचरणाला अतिशय महत्व आहे.
त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, ' नसत्या कल्पना करू नये.' बऱ्याच वेळा माणूस भूतभविष्याचा विचार करून नको त्या कल्पना करत बसतो. बऱ्याच वेळा या कल्पना मोहाच्या वा विषयांच्या संदर्भात असतात. कल्पनेचा अश्व चौखूर दौडत असतो. कल्पनांना देखील काही एक महत्व निश्चितच आहे. पण त्या वास्तवतेवर आधारित असाव्यात. त्यांच्या साहाय्याने सत्याचा शोध घेण्यात मदत व्हावी अशा त्या असल्या तर जीवनात अत्यंत उपयोगी ठरतात. पण कोणताही वास्तविक आधार नसताना सैराट म्हणजे सैरावैरा धावणारे मन नको त्या कल्पना करते. त्यातून माणूस नको त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होतो. अशा गोष्टींचा सुद्धा संसारात ताप होतो. परमार्थात तर अशा कल्पनांना थारा नाही. म्हणूनच माणसाने बोलण्यासारखे वागावे. आपल्याच वागण्याने आपल्याला लाज उत्पन्न होईल असे कर्म करू नये. चित्त दूषित करणाऱ्या अशा गोष्टींपेक्षा आपले चित्त ईश्वराकडे लावावे.
स्वसंवाद
१. मी समाजमाध्यमांवर किंवा चार लोकांमध्ये जे मोठे आणि आदर्श विचार मांडतो, माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रसंग आल्यावर मी स्वतः खरोखरच त्याप्रमाणे आचरण करतो का?
२. "बोले तैसा चाले" या तुकाराम महाराजांच्या सूत्राचा आदर राखताना, माझे अंतर्मन कधी माझ्याच एखाद्या ढोंगी वागण्यामुळे मला आतून 'लाजवते' का?
३. भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील चिंता यांमुळे माझे मन 'सैराट' (बेलगाम) धावत असताना, मी त्याला विवेकाने आवर घालून वास्तवतेच्या भूमीवर आणतो का?
४. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी बाह्य देखावा किंवा कोरडी बडबड करण्यापेक्षा, मी माझे चित्त 'दुश्चींत' (दूषित) होण्यापासून वाचवून देवाकडे लावायला तयार आहे का? (क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२१/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा