मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १०२

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०२ 

अती लीनता सर्वभावे स्वभावे ।

जना सज्जनालागी संतोषवावे ।

देहे कारणी सर्व लावीत जावे ।

सगूणी अति आदरेंसी भजावे ।।१०२।।

अर्थ : आपल्यामध्ये स्वभावतःच अतिशय नम्रता असावी. अशा सहज नम्रतेने सत्पुरुषांना आनंद द्यावा. आपला देह सर्व चांगल्या कामांसाठी झिजवावा. अतिशय आदरपूर्वक सगुण भक्ती करावी. 

( लीनता - नम्रता, सर्वभावे - अगदी मनापासून, कारणी - चांगल्या गोष्टींसाठी )

विवेचन 

भक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत ते या श्लोकात समर्थ आपल्याला सांगत आहेत. भगवंताचा भक्त लीन म्हणजे नम्र असतो. अध्यात्मात लीनता हा अतिशय मोठा गुण मानला गेला आहे. ज्या व्यक्तिजवळ लीनता नसेल, त्याच्या ठायी अहंकार निर्माण होतो. हे मी केले, ते माझ्यामुळे झाले अशा प्रकारचा अहंकार निर्माण होतो. साधकासाठी अहंकार हा प्रगतीतील मोठा अडथळा आहे. त्यामुळे आपल्या स्वभावात नम्रता असणे आवश्यक आहे. ती सुद्धा मनापासून असावी. आतून उमलून आलेली असावी. एखाद्या हसतमुख व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणारे हास्य आतून उमलून आलेले असते. हास्याचा कृत्रिम मुखवटा त्याला धारण करावा लागत नाही. तशीच नम्रता देखील आतून यावी. ती स्वभावाचाच एक भाग असावी असे समर्थांना सांगायचे आहे. हल्ली कार्पोरेट जगतात आपले काम साधून घेण्यासाठी लोक कृत्रिम नम्रतेचा आश्रय घेतात. निवडणुका जवळ आल्या म्हणजे मते मागण्यासाठी नेते मंडळी अति नम्र होतात. पण ही खरी नम्रता नसून तो काही काळापुरता धारण केलेला एक मुखवटा असतो. 

ज्याला साधक व्हायचे त्याने नम्र असले पाहिजे. आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचे श्रेय भगवंताला किंवा गुरूंना दिले पाहिजे. दोष असतील तर ते आपले अशी भावना हवी. कर्तेपण भगवंताकडे देतो तो खरा साधक. अशा प्रकारची नम्रता किंवा लीनता अंगी बाणली की सत्पुरुषांना संतोष होतो. गर्विष्ठ किंवा अहंकारी व्यक्ती त्यांना आवडत नाही. ज्ञानेश्वरांसारख्या महान संतांनी आपल्या हातून जे काही कार्य घडले त्याचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे. 

आपला हा नरदेह सर्व चांगल्या कारणांसाठी झिजला पाहिजे. केवळ देहाचे भरणपोषण केले तर आपल्यात आणि पशूत फरक काय ? समाजात अनेक चांगली कार्ये होत असतात. अशा कामांना पैशाने नाही तरी शरीराच्या माध्यमातून श्रम करून हातभार लावला पाहिजे. शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरात, गोंदवल्याला गोंदवलेकर महाराजांच्या मठात अनेक भक्त स्वेच्छेने सेवा देत असतात. अशी उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. यातून भगवंताची सेवा तर घडतेच पण देह भगवंताच्या कारणाने झिजतो. माणसाला जो देहाभिमान असतो, तो नष्ट व्हायला मदत होते. देहबुद्धी कमी होत जाते. 

सर्व संतांनी सगुण भक्ती केली आहे. परमेश्वराच्या सेवेत आपला देह झिजवला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी पांडुरंगाची सगुण भक्ती केली. रामकृष्ण परमहंस कालीमातेची सेवा करीत. मीराबाईंनी श्रीकृष्णाची भक्ती केली. परमार्थात प्रगती करायची असेल तर सगुणाकडूनच निर्गुणाकडे जावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात ' सगुणी अति आदरेसी भजावे ' सगुणात प्रेम निर्माण झाले नाही तर ते निर्गुणात कसे येणार ?

स्वसंवाद 

१. माझ्या रोजच्या वागण्या-बोलण्यात असणारी नम्रता ही केवळ माझे 'काम साधून घेण्यासाठी' घातलेला मुखवटा आहे, की ती माझ्या अंतःकरणातून आलेली खरी 'लीनता' आहे? 

२. ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे, माझ्या आयुष्यातील यशाचे श्रेय मी देवाच्या आणि गुरूंच्या चरणी अर्पण करतो, की 'मी केले' या अहंकाराचा फुगा फुगवत बसतो? 

३. भगवंताने दिलेला हा सुंदर नरदेह मी केवळ स्वतःच्या उपभोगासाठी आणि देहभरणासाठी वापरतो आहे, की कधी सामाजिक व सत्कार्यात 'श्रमदान' करून तो कारणी लावतो? 

४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझ्या आराध्य दैवताची भक्ती केवळ 'वरवरची' करतो, की मनात अथांग आदर आणि प्रेम बाळगून सगुण स्वरूपात त्या परमेश्वराला शोधतो? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१८/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...