मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १०१

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०१ 

जया नावडे नाम त्या येम जाची ।

विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ।

म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे ।

मुखे बोलता दोष जाती स्वभावे ।।१०१।।

अर्थ : ज्या व्यक्तीला भगवंताचे नाम आवडत नाही अशा व्यक्तीला यम त्रास देतो. नामाबद्दल शंका आणि नाना प्रकारचे तर्क कुतर्क ज्याच्या मनात येतात अशा व्यक्तीला तिरस्करणीय नरक प्राप्त होतो. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे. जो भगवंताचे नाम घेतो त्याच्या स्वभावातील दोष हळूहळू नाहीसे होऊ लागतात. 

( येम - यमदूत, जाची - त्रास देतात, विकल्प - शंका/संशय, तर्क - नानाविध कल्पना, स्वभावे - सहजच/नैसर्गिकरित्या )

विवेचन 

एखादी गोष्ट कर असे वारंवार सांगूनही जर कोणी ऐकत नसेल, तर त्या व्यक्तीला तसे न करण्याचे काय परिणाम होतील असे आपण समजावून सांगतो. विशेषतः लहान मुलांना एखाद्या गोष्टीतले धोके आपण सांगतो आणि मग तरी त्यांनी ती करावी अशी अपेक्षा करतो. तसेच समर्थ इथे आपल्याला नामस्मरणाचे महत्व समजावून सांगताना करत आहेत. वारंवार सांगूनही आपण जर नामस्मरण केले नाही तर अंतकाळी आपल्याला यम त्रास देतील, आपल्या मनात नामाबद्दल नको त्या कल्पना आणून जर आपण नाम घेतले नाही, तर लोकांमध्ये आपली छी थू होऊन आपल्या वाट्याला नरक ठरलेलाच आहे. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे. 

आपल्या धर्मशास्त्रात मृत्यूनंतरच्या जीवनासाठी स्वर्ग आणि नरक अशा कल्पना आहेत. पुण्यवान माणसाला स्वर्गप्राप्ती होते आणि पापी मनुष्य नरकात जातो अशी साधारण त्यातील कल्पना आहे. ज्याने पाप केले असेल, भगवंताचे नाम घेतले नसेल अशा व्यक्तीला यमदूत त्रास देतात. नाम न घेणाऱ्याला अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते असे समर्थ सांगतात. समर्थांच्या काळात अशा कल्पनांवर लोकांचा जास्त विश्वास होता म्हणून समर्थांनी त्या प्रकारे समजावून सांगितले आहे. आज आपण ज्या काळात जगतो आहोत, त्या काळातील लोक स्वर्ग, नरक, यम इ. कल्पनांवर विश्वास ठेवणारे नाहीत. म्हणूनच या गोष्टींचा अर्थ आपण वेगळ्या प्रकाराने घ्यायला हवा.

आज जरी बरेचसे लोक स्वर्ग, नरक, यम इ. गोष्टींवर विश्वास ठेवत नसले तरी बरेचसे लोक हे मानतात की आपल्या बऱ्यावाईट वागण्याची फळं आपल्याला या ठिकाणीच भोगावी लागतात. सर्व संतांनी एकमुखाने भगवंताच्या नामाचा महिमा सांगितला आहे. संतांचे वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असते. ते जे बोलतात, त्यामागे स्वानुभवाचे सामर्थ्य असते. गोंदवलेकर महाराज आपल्याला जेव्हा रामनाम घ्यायला सांगतात, तेव्हा त्या नामाची महती त्यांनी स्वतः अनुभवलेली असते. ' आधी केले मग सांगितले ' असा हा रोकडा व्यवहार असतो. म्हणून निदान संतांच्या सांगण्यावर तरी आपण विश्वास ठेवून नाम घ्यायला हवे. 

नाम घेण्याची ही सवय जर लावून घेतली नाही तर अंतकाळी देखील सवयीनुसार नाम न येता दुसऱ्याच गोष्टीत जीव अडकेल. प्राण जाताना त्यामुळे जीवाला वेदना होतील. ऐहिक गोष्टीतच जीव अडकेल. पुन्हा मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. हाच यमदूतांनी दिलेला त्रास आहे असे मानायला हरकत नाही. संतांनी एवढया कळकळीने सांगूनही जर नामाबद्दल विश्वास नसेल आणि त्याच्या खरेपणाबद्दल भलतेच विचार मनात येत असतील, तर मन नामाकडे वळणारच नाही. अशा वेळी माणूस मग दुसऱ्या आकर्षणात अडकतो. कसले नाम, कसला स्वर्ग आणि नरक ? मरणानंतर जे काही होईल ते कोणी पाहिले आहे ? तेव्हा मौजमजा करून या जीवनाचा उपभोग घेऊ असा विचार करून माणूस नको त्या गोष्टीत अडकतो. नको त्या गोष्टी करण्यात वाहवत जातो. मग समाजात अशा व्यक्तीची छी थू होते. त्याची प्रतिष्ठा राहत नाही. लोकांच्या दृष्टीने अशी व्यक्ती तिरस्करणीय बनते. असे जगणे म्हणजे एक प्रकारचा नरकच आहे. 

तेव्हा मनात कोणतीही शंका न ठेवता भगवंताचे नाम घ्यावे. अति आदराने ते नाम घेत जावे. भगवंताच्या नामाचे सामर्थ्य असे आहे की जो कोणी ते नाम घेईल त्याचे दोष हळूहळू कमी होत जातात. जे गुण भगवंताला प्रिय आहेत, असे गुण व्यक्तीच्या स्वभावात वास करतात.

स्वसंवाद 

१. मरणानंतरच्या नरकाची भीती बाळगण्यापेक्षा, मी आजच्या माझ्या चुकीच्या प्रवृत्तींमुळे माझे चालू आयुष्यच 'नरकप्राय' करून घेत नाहीये ना? 

२. संतांनी स्वानुभवातून सांगितलेल्या नामस्मरणाच्या 'रोकड्या व्यवहारावर' विश्वास ठेवण्याऐवजी, माझे मन अजूनही 'तर्क-कुतर्कात' आणि संशयात वेळ वाया घालवत आहे का? 

३. "अंतकाळी सवयीनुसार नाम मुखात यावे" यासाठी मी माझ्या दैनंदिन जीवनात आजपासूनच नामस्मरणाची सवय लावून घेण्यास किती प्राधान्य देतो? 

४. नाम घेतल्याने जर स्वभावातील दोष 'स्वभावे' (सहजच) गळून पडणार असतील, तर मी माझ्या अहंकाराचा आणि रागाचा त्याग करून नामस्मरणाचा आश्रय का घेत नाही? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१७/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...