मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ९९

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९९ 

जगी धन्य वाराणसी पुण्यरासी ।

तयेमाजि जाता गती पूर्वजांसी ।

मुखे रामनामावळी नित्यकाळी ।

जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ।।९९।।

अर्थ : वाराणसी अर्थात काशीक्षेत्र पुण्याने परिपूर्ण असल्याने खरोखरच जगात धन्य आहे. तिथे गेल्यानंतर तेथील पुण्यप्रभावामुळे आपल्यासह आपल्या पूर्वजांना गती मिळते. मुखाने सदैव श्रीरामांचे नाम घ्यावे असा उपदेश भगवान शंकर तिथे आपल्या कानात करतात. 

( पुण्यरासी - पुण्याने परिपूर्ण/भरलेले, गती - मृत्यूनंतर सद्गती अथवा मुक्ती मिळणे  ) 

विवेचन 

या श्लोकात रामनामाचे महत्व स्पष्ट करताना समर्थांनी काशीक्षेत्राचे उदाहरण दिले आहे. आपल्याकडे काशीक्षेत्र सर्व तीर्थांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. त्यावरून ' काशीस जावे नित्य वदावे ' अशी म्हण आपल्याकडे पडली आहे. म्हणजे प्रत्यक्ष काशीला जायला जमले नाही तरी मला काशीला जायचे आहे असे नेहमी म्हणत राहावे. यावरून काशीक्षेत्राचे महत्व आपल्या लक्षात येईल. आपल्याकडे भाविकांमध्ये अशी समजूत आहे की काशीला गेल्यानंतर आपल्याला आपल्या अंतकाळी उत्तम गती प्राप्त होते. केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पूर्वजांना देखील उत्तम गती मिळते. म्हणून प्रत्येक धार्मिक व्यक्तीचे आपण आयुष्यात एकदा तरी काशीला जावे अशी इच्छा असते. पूर्वीच्या काळी तर वृद्ध माणसे काशीला जात असताना तिकडेच देह ठेवला तर मुक्ती मिळाली असे समजत असत. तशी इच्छा मनात धरून बरीचशी मंडळी काशीला जात असत. आजही बऱ्याच भाविकांची तशी श्रद्धा आहे. 

वरील श्लोकात दुसऱ्या ओळीत आलेला ' जाता ' हा शब्द दोन अर्थांनी घेता येतो. पहिला अर्थ म्हणजे काशीला गेल्यानंतर असा घेता येतो तर दुसरा अर्थ काशीला देह ठेवल्यानंतर असा घेता येतो. कोणताही अर्थ घेतला तरी काशी क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे हे लक्षात येते. काशीला भगवान शंकरांचे मंदिर ' काशी विश्वनाथ ' म्हणून प्रसिद्ध आहे. देवाधिदेव महादेवाचे हे स्थान द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. असे मानले जाते इथे येणाऱ्या प्रत्येक जीवाला भगवान शंकर स्वतः ' मुखाने सतत रामनाम घ्या ' ही आपल्या हिताची गोष्ट तेथे कानात सांगतात.

थोडक्यात म्हणजे समर्थांनी या ठिकाणी पुन्हा एकदा भगवान शंकरांचे उदाहरण देऊन रामनामाचे महत्व स्पष्ट केले आहे. या काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्याने मोक्ष प्राप्ती होते असे आपण मानतो, ते भगवान शंकर स्वतः रामनाम घेतात आणि आपल्यालाही रामनाम घेण्याचा उपदेश करतात. तुम्ही काशीला जा किंवा जाऊ नका. पण मुखाने सतत रामनाम घ्या. तेच तुमच्या हिताचे आहे ही गोष्ट समर्थांनी इथे आपल्या मनावर ठसवली आहे. सातत्याने आपण रामनाम घेत गेलो तर आपला देह, आपले मन पवित्र, शुद्ध आणि स्वच्छ होईल. तेच काशीक्षेत्र होईल.

स्वसंवाद 

१. भौतिकदृष्ट्या 'काशीला' जाण्याची ओढ असण्यासोबतच, मी माझ्या अंतःकरणात रामनामाची 'पुण्यरासी' (काशी क्षेत्र) निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का? 

२. जीवाला उत्तम गती प्राप्त होणे म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारे सुख नसून, चालू आयुष्यात रामनामाच्या अनुसंधानात राहून जन्माचे सार्थक करणे आहे, हे मला पटते आहे का? 

३. "काशी विश्वनाथ स्वतः प्रत्येक जीवाच्या कानात रामनामाचा उपदेश करतात," हे ऐकल्यावर माझ्या दैनंदिन जीवनात रामनाम आदराने घेण्याची माझी वृत्ती अधिक दृढ झाली आहे का? 

४. 'पूर्वजांना गती मिळणे' आणि स्वतःचा उद्धार करणे यासाठी विनामूल्य आणि अत्यंत सोपे असणारे रामनाम घेण्यासाठी मी रोज किती वेळ शांत चित्ताने देतो? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१६/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...