उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९६
महा भक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी ।
पिता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ।।९६।।
अर्थ : भगवंताचा महान भक्त असलेला प्रल्हाद याचा जन्म दैत्यकुळात झाला. परंतु तो नित्य भगवंताच्या नामाचा जप करीत असे. अत्यंत पापी असलेला त्याचा पिता हिरण्यकश्यपू याला ते पाहवेना. त्याने आपल्या आयुष्यात कधीही नामस्मरण केले नाही.
विवेचन
भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ आपल्याला प्रत्येक श्लोकात वेगवेगळी उदाहरणे देत आहेत. एखाद्या कुशल शिक्षकाने ज्याप्रमाणे विविध उदाहरणे देऊन आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगावे तसे समर्थ आपल्याला सांगत आहेत. या अर्थाने समर्थ हे लोकशिक्षक आहेत. जन उद्धाराची तळमळ त्यांना आहे. 'बुडते हे जन न देखवे डोळा ' या भावनेतून ते आपल्याला रामनामाचे महत्व सांगत आहेत.
प्रल्हाद हा विष्णूचा महान भक्त होता. पण त्याचा जन्म एका दैत्यकुळात झाला होता. दैत्यकुळातील मंडळी म्हणजे साधारणपणे भगवंताला विरोध करणारी किंवा त्याला आपला शत्रू मानणारी होती. अशा प्रतिकूल ठिकाणी प्रल्हादाचा जन्म झाला. पण भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादाला गर्भातूनच मिळाले होते. त्याची आई कयाधू ही गर्भारपणी महर्षी नारदांच्या आश्रमात राहिली होती. तिथेच भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादावर झाले.
प्रल्हादाला आपल्या घरातील परिस्थिती भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी अनुकूल नव्हती. पण भगवंताचा खरा भक्त होण्यासाठी जे गुण लागतात, त्या गुणांनी तो परिपूर्ण होता. त्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड येत असे. ' ओम नमो भगवते वासुदेवाय ' या मंत्राचा नित्य जप तो करीत असे. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रल्हाद नारायणाचे म्हणजे विष्णूचे नाम जपत होता. पण वरील श्लोकात समर्थांनी ' जपे रामनामावळी ' असे म्हटले आहे. नारायण असो की राम, तो सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला दाखवून देतात. त्यामुळे आपण देखील भगवंताच्या नामात भेदभाव करणे योग्य नाही.
परमेश्वराला आपला शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूला अर्थातच हे आवडणे शक्य नव्हते. हिरण्यकश्यपू हा भगवान शंकराचा भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शंकरांकडून असा वर मागून घेतला होता की ज्या वरामुळे त्याला सहजासहजी कोणी मारू शकत नव्हते. त्यामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. आणखीनच उन्मत्त झाला. प्रजेवर आणि भगवंताच्या भक्तांवर जुलूम करू लागला. पण आपला स्वतःचाच मुलगा आपले ऐकत नाही असे पाहिल्यावर त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. पण प्रल्हादाची भगवंतावर अविचल श्रद्धा होती. भगवंताने हर प्रकारे त्याचे सर्व संकटातून रक्षण केले. हिरण्यकश्यपू पापी असला तरी प्रल्हादासारखे भगवंतावर अविचल निष्ठा असणारे पुत्ररत्न त्याच्या उदरी जन्मले हे त्याचे केवढे भाग्य ! त्यामुळेच आपल्या अंत्यसमयी हिरण्यकश्यपूला नरसिंहरूपाने भगवंताचे दर्शन झाले आणि त्याला मुक्ती मिळाली.
प्रल्हादाचा जन्म जरी दैत्यकुळात झाला तरी इच्छा असली तरी विपरीत परिस्थितीत देखील भगवंताचे नाम घेऊन तरून जाता येते हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. आपणही प्रल्हादाप्रमाणे भगवंताचे नाम घेऊन या भवसागरातुन तरून आपला उद्धार करून घेऊ शकतो. तो आपल्याला सर्व संकटातून सोडवेल.
स्वसंवाद
१. माझ्या सभोवतालची परिस्थिती किंवा घरचे वातावरण परमार्थ साधण्यासाठी अनुकूल नाही, असे रडत न बसता मी प्रल्हादासारखा 'अविचल' राहून नामस्मरण करू शकतो का?
२. राम, कृष्ण, विष्णू किंवा शिव यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझ्या मनाची ऊर्जा वाया घालवतो आहे, की सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हे सत्य स्वीकारतो?
३. हिरण्यकश्यपूप्रमाणे मीही उन्मत्त होऊन माझ्या जवळच्या माणसांवर किंवा सत्प्रवृत्तींवर अन्याय तर करत नाहीये ना? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा