मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ९५

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९५ 

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।

तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।

शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।

मुखे बोलता ख्याति झाली पुराणी ।।९५।।

अर्थ : दुराचारी असलेल्या अजामेळाने अंतकाळी आपल्या नारायण पुत्राचे नाव घेतले. त्या मुलाचे सतत नाम घेतल्याने त्याला मुक्ती मिळाली. एका गणिकेने ' राम राम ' हे आपल्या पोपटाचे नाम सतत घेतल्याने तिचा देखील उद्धार झाला. आपल्या अंतकाळी भगवंताचे नाम घेणाऱ्या व्यक्तींच्या या कथा पुराणात प्रसिद्ध झाल्या. 

( शुक - पोपट, कुंटणी - गणिका/वेश्या )

विवेचन 

भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ या श्लोकात पुराणातील दोन वेगळी उदाहरणे आपल्या देतात. अजामेळ ब्राह्मणाची कथा भागवतात आली आहे. अजामेळ हा दुराचारी होता. आपल्या आयुष्यात त्याने कधी भगवंताचे नाम घेतले नाही. आपला अंतकाळ जेव्हा जवळ आला तेव्हा त्याला आपल्या लाडक्या नारायण या पुत्राची आठवण होऊन तो त्याच्या नावाचा जप करू लागला. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्याला मुक्ती दिली अशी कथा आहे. दुसरी कथा आहे पिंगला या गणिकेची. तिने देखील आपल्या संपूर्ण आयुष्यात परमेश्वराची भक्ती केली नाही. परमेश्वराबद्दल तिला एक प्रकारचा तिरस्कार होता असे म्हटले तरी चालेल. त्याच भावनेतून तिने आपल्या आवडत्या पोपटाचे नाव 'राम ' असे ठेवले. अजाणतेपणी का होईना पण त्यानिमित्ताने ती रामनाम घेत गेली. त्यामुळे तिचा उद्धार झाला. 

तर्कशास्त्राच्या कसोटीवर या कथा आजच्या काळात टिकणाऱ्या नाहीत. नास्तिक आणि बुद्धिवादी लोक तर या पुराणातील भाकडकथा आहेत म्हणून सहज उडवून लावतील. पण समर्थांच्या काळात या कथा प्रचलित होत्या. लोकांनी परमेश्वराचे नाम कोणत्याही प्रकारे का होईना पण घ्यावे आणि त्यांना रामनामाचे महत्व पटावे एवढाच समर्थांचा या कथा सांगण्यामागील उद्देश असावा. आपणही तो उद्देश लक्षात घेऊ या. आपल्यासाठी त्या कथांपेक्षा समर्थांचा संदेश महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण धान्य निवडताना आपण फोलपट टाकून देऊन सार आपल्याकडे ठेवतो त्याप्रमाणे बाकी निरुपयोगी फोलपट टाकून सार तेवढे ग्रहण करू या. रामनाम हेच सार आहे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे. 

१. पुराणातील कथांमधील चमत्कारिक गोष्टींवर तर्क लढवत बसण्यापेक्षा, त्यामागे संतांनी दिलेला 'नामस्मरणाचा' मूळ संदेश (सार) मी स्वीकारू शकतो का? 

२. "अजाणतेपणी किंवा मुलाच्या ओढीने घेतलेले नाम जर अजामेळाला तारू शकते," तर मग मी जाणीवपूर्वक आणि मनापासून नाम घेतले तर माझ्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडू शकेल? 

३. संसाराच्या वेगवेगळ्या विवंचनेत अडकलेला असतानाही, मी माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा व्यवहारात भगवंताच्या नामाचे अधिष्ठान ठेवतो का?

 ४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, "रामनाम हेच अंतिम सार आहे" हे स्वीकारून मी मनातील निरर्थक शंकांचे 'फोलपट' टाकून द्यायला तयार आहे का? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१३/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...