उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०३
हरिकीर्तने प्रीती रामीं धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणी विसरावी ।
परद्रव्य आणिक कांता परावी ।
येदर्थी मना सांडि जीवीं करावी ।।१०३।।
अर्थ : श्रीरामाबद्दल प्रेमभाव ठेवून हरिकीर्तन आणि निरूपणात देहबुद्धीचा त्याग करून स्वतःला विसरून जावे. परद्रव्य आणि परस्त्री यांचा अगदी मनापासून त्याग करावा.
( हरिकीर्तन - भगवंताचे गुणगान, निरूपण - तात्विक चर्चा, येदर्थी - या कारणाने, सांडि जीवीं करावी -मनापासून त्याग करावा )
या श्लोकात साधकाने कसे वागावे त्याबद्दल समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपण एक लक्षात घेतली पाहिजे की साधक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपण आहोत. आपण त्या मार्गावर वाटचाल करायचे ठरवली म्हणजे आपण साधकच झालो. आपण प्रापंचिक माणसे. आपली देहबुद्धी प्रबळ असते. ही देहबुद्धी कमी होऊन भगवंताकडे आपले चित्त लागावे यासाठी हरिकीर्तन आणि निरूपण यासारखा सहज उपाय दुसरा नाही. हरिकीर्तन करणे म्हणजे भगवंताच्या गुणांचे गुणगान करणे. त्याच्या गुणांचे जेव्हा आपण वर्णन करू तेव्हा त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल.
दुसरी गोष्ट म्हणजे निरूपण. म्हणजे तर्काच्या, बुद्धीच्या साहाय्याने भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे. त्याच्या अवतारकार्याबद्दल, त्याने जो उपदेश केला आहे त्याबद्दल जाणून घेणे. भक्ती आणि ज्ञान इथे हातात हात घालून चालतात. हृदय आणि मेंदू एकत्र येतात. कोरडे ज्ञान उपयोगाचे नाही. भक्ती जेव्हा ज्ञानासहित केली जाते तेव्हा ती डोळस भक्ती असते. म्हणून समर्थ आपल्याला हरिकीर्तन आणि हरिकथा निरूपण असे दोन्ही करायला सांगतात.
भगवंत निर्गुण आणि सगुण असा दोन्ही आहे. भक्तीच्या शक्तीने तो निर्गुणातून सगुणात येतो. म्हणून साधकाला आधी त्याचे सगुण रूपात प्रेम निर्माण होणे आवश्यक असते. त्यातूनच मग पुढे निर्गुणाकडे जाता येते.सगुणाचे प्रेम निर्माण होण्यासाठी त्याच्या रूप गुणांचे गुणगान करता आले पाहिजे. भगवंताबद्दल तात्विक चर्चा करून त्याच्याबद्दल अधिक जाणून घेता आले पाहिजे. आणि यामध्ये दांभिकता नको. कोणतीही गोष्ट मनापासून असावी.
साधकासाठी आणखी दोन महत्वाच्या गोष्टी समर्थांनी या श्लोकात आपल्याला सांगितल्या आहेत. परद्रव्य आणि परस्त्री यांची अभिलाषा धरू नये. तसा विचार मनात देखील आणू नये. या दोन गोष्टी वरवर करायला सोप्या वाटल्या तरी आपल्या देहबुद्धीमुळे त्यावर नियंत्रण मिळवणे फार कठीण जाते. कनक आणि कांता या दोन गोष्टी माणसाला मोहात पडतात. त्यामुळे तो जर परमार्थ मार्गावर वाटचाल करीत असेल तर त्याचा परमार्थ निष्फळ ठरतो. कारण काम, वासना , द्रव्यलोभ या गोष्टी भगवंत प्राप्तीच्या आड येतात. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे भगवंत हवा असेल तर या गोष्टींचा त्याग करायला हवा. आपल्या संसारापुरते आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा परंतु दुसऱ्याच्या पैशावर डोळा नको. तुकाराम महाराज म्हणतात,' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे...' त्याचप्रमाणे परस्त्री मातेसमान मानावी असं आपली संस्कृती सांगते. परमार्थात तर ही गोष्ट फार महत्वाची आहे.
तेव्हा देहबुद्धी कमी करण्यासाठी परमेश्वराच्या गुणगायनात आणि निरूपणात आपला वेळ व्यतीत करावा. ' सदाचार हा थोर सांडू नये तो..जगी तोचि तो मानवी धन्य होतो ' हे समर्थांचे वचन लक्षात ठेवावे.
स्वसंवाद
१. मी माझी भक्ती केवळ 'कोरडी' किंवा भावनिक करतोय, की संतांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान आणि निरूपणाच्या साहाय्याने ती 'डोळस' करण्याचा प्रयत्न करतोय?
२. "एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत" हे लक्षात ठेवून, मी भगवंताची आस धरताना मनातल्या कनक आणि कांतेच्या (लोभ आणि वासनांच्या) तलवारी बाजूला ठेवायला तयार आहे का?
३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, माझा प्रपंच चालवण्यासाठी पैसा मिळवताना माझा व्यवहार 'उत्तम आणि प्रामाणिक' आहे का? मी नकळत परद्रव्याची अभिलाषा तर धरत नाहीये ना?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनातील 'देहबुद्धी' (अहंकार) कमी करण्यासाठी मी दिवसातील काही वेळ तरी हरिकीर्तनात किंवा चांगल्या तात्विक विचारांच्या निरूपणात घालवतो का? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२०/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा