मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ९२

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९२

अती आदरे सर्व ही नामघोषे ।

गिरीकंदरे जाइजे दुरि दोषे ।

हरी तिष्ठतु तोषला नामतोषे ।

विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।

अर्थ : भगवंताच्या नामाबद्दल अत्यंत आदर बाळगून जो कोणी त्याचे नामस्मरण करतो, त्याचे सर्व दोष दूर गिरिकंदरी म्हणजे लांब निघून जातात. ज्या ठिकाणी आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंतांचे नामस्मरण सुरु असते, तिथे भगवंत अत्यंत संतुष्ट होऊन वास्तव्य करीत असतो. भगवान शंकरांना रामनामाचे विशेष वेड लागले आहे (आणि ते सतत त्याचे नामस्मरण करीत असतात )

गिरिकंदरी - पर्वतांमधील गुहेत, तिष्ठतु - थांबून राहतो, तोषणे - संतोष/आनंद होणे, पिसे - वेड )

विवेचन 

भगवंताचे नाम सर्व दोष हरण करणारे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे माहात्म्य स्पष्ट करताना समर्थ म्हणतात की जो कोणी भगवंताचे आदरपूर्वक नामस्मरण करतो त्याचे दोष दूर म्हणजे गिरिकंदरी निघून जातात. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की समर्थ भोजन प्रसंगी आपल्याला भगवंताचे नाम मोठ्याने गजर करून आदरपूर्वक म्हणायला सांगतात. या श्लोकात ते भगवंताचे नाम आपल्याला मोठ्याने उच्चारून म्हणायला सांगतात. मोठ्याने म्हणणे म्हणजे वैखरीने म्हणणे. आधी सुरुवात वैखरीपासून करावी लागते. मग ते नाम क्रमाक्रमाने मध्यमा, पश्यन्ती या वाणींच्या प्रकारांमार्फत परा वाणीपर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा मनातल्या मनात नामजप सुरु असतो. पण त्यावेळी मन दुसरीकडे कुठेतरी असते. म्हणजे मानसिक जपात यांत्रिकता येण्याचा संभव असतो. मुखाने हे नाम उच्चारले तर आपले लक्ष त्या नामाकडे राहते. आपल्या भोवती असणाऱ्या इतर लोकांच्या कानावरही हे नाम आपोआप पडते. 

भगवंताचे नाम घेण्यासाठी दूर कुठे गिरिकंदरात जावे लागत नाही. आपण त्याचे नाम घेऊ लागलो की आपल्यातील दोषच दूर गिरिकंदरात निघून जातात. जिथे नाम आहे तिथे दोष राहणे शक्य नाही. जिथे उजेड आहे, तिथे अंधार कसा राहील ? तुकाराम महाराज सुद्धा नामाचे महत्व सांगताना म्हणतात

नामसंकीर्तन साधन पैं सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वदा ॥
श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत समर्थ आपल्याला परमेश्वराचे वास्तव्य नेमके कुठे असते हे सांगतात. जिथे परमेश्वराचे नामस्मरण, गुणगान आदरपूर्वक किंवा मोठया प्रेमाने चाललेले असते, तिथे तो स्वतःच उपस्थित असतो. त्याला शोधण्यासाठी कुठे दुसरीकडे जावे लागत नाही. आपल्याजवळच तो सदैव उभा असतो. वरील अभंगात तुकाराम महाराजांनी पण हेच सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा ' जेथे नाम तेथे माझे प्राण ' असे म्हणतात. 
नाम घेणे हे वरवर सोपे वाटते. गोंदवलेकर महाराजांचे ३६५ दिवसांच्या प्रवचनाचे एक पुस्तक आहे. यातील प्रत्येक प्रवचनात गोंदवलेकर महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळी उदाहरणे देऊन नामाचा महिमा आपल्याला पटवून दिला आहे. त्यामुळे नाम घेणे सोपे आहे, त्यात विशेष ते काय असे आपल्याला वाटते ? पण जी गोष्ट ऐकायला सोपी वाटते, ती करायला तेवढीच कठीण असते. कारण ती करण्यासाठी निर्धाराची गरज असते. आपण कमी पडतो ते इथेच ! रामनामाचे किंवा भगवंताच्या नामाचे वेड लागले पाहिजे. ज्यांना एखाद्या गोष्टीचे वेड लागते, असेच लोक जीवनात काही करून दाखवतात. इथे समर्थ आपल्याला पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यांना रामनामाचे पिसे म्हणजे वेड लागले आहे असे समर्थ म्हणतात. भगवान शंकर एवढे देवाधिदेव. परंतु ते देखील रामनाम जपत असतात. त्याचे महत्व वारंवार माता पार्वतीला समजावून सांगत असतात. 
रामाची भूपाळी गाताना समर्थ म्हणतात 
उठोनिया प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ 
भाविक जनहो, प्रातःकाळी उठून रामनामाचे स्मरण करा. तो चंद्रमौळी म्हणजे स्वतः शिवशंकर देखील शैलपुत्रीसह म्हणजे माता पार्वतीसोबत श्रीरामांचे ध्यान करतो. 
स्वसंवाद 

१. मी माझे दोष दूर करण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी बाह्य साधनांमागे धावतो आहे, की माझ्याच अंतरी रामनामाचा उजेड पाडून अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतोय ? 

२. मनातल्या मनात नाम घेताना माझे मन संसाराच्या चिंतेत 'यांत्रिकपणे' भटकत राहते का ? माझ्या नामात आदर आणि एकाग्रता आणण्यासाठी मी काय करायला हवे ? 

३. गोंदवलेकर महाराजांच्या वचनानुसार, "जेथे नाम तेथे माझे प्राण" यावर माझा विश्वास आहे का? 

 ४. भूपाळीत म्हटल्याप्रमाणे जर प्रत्यक्ष चंद्रमौळी शिवशंकर शैलबाळीसमवेत उठोनिया प्रातःकाळी रामनाम जपत असतील, तर मग माझ्या दिवसाची सुरुवात मी रामनामाने करतो का ?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

११/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...