मुख्य सामग्रीवर वगळा

प्रस्तावना : पाऊलखुणा आठवणींच्या आणि मूल्यांच्या..विनया भट

प्रस्तावना

पाऊलखुणा आठवणींच्या आणि मूल्यांच्या - विनया भट

माझ्या 'उगवतीचे रंग' या व्हॉट्सॲप समूहावर असलेल्या एक आदरणीय वाचक म्हणजे सौ. विनया भट. त्यांचा माझा तसा थेट परिचय नाही किंवा प्रत्यक्ष भेटही नाही; परंतु एखादी व्यक्ती जेव्हा काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या लेखनातूनच तिची खरी ओळख आपल्याला होत जाते. विनयाताईंनी गृहिणीपदापासून आपल्या संसाराला सुरुवात केली. एक आई, एक आजी आणि समाजातील एक जबाबदार व ज्येष्ठ व्यक्ती या नात्याने त्यांच्या आयुष्यात अनुभवांची भर पडत गेली आणि हे अनुभव त्यांना समृद्ध करत गेले. या समृद्धीतूनच त्यांना 'आपण व्यक्त व्हावे' असे आतून कुठेतरी वाटू लागले. माझ्या आणि इतरांच्या लेखांवर प्रतिक्रिया देण्याच्या निमित्ताने त्या व्यक्त होऊ लागल्या आणि अधूनमधून आपले स्वतःचे लेखनही शेअर करू लागल्या. त्यांच्या लेखनात त्यांच्या नितळ मनाचे प्रतिबिंब दिसते, एक प्रामाणिकपणा जाणवतो. कुठेही प्रौढी मिरवणे किंवा विद्वत्तेचा आव आणणे या गोष्टी त्यांच्या लेखनात मला कुठेही आढळल्या नाहीत. संस्कृतीचा उगम हा मानवी मूल्यांच्या जडणघडणीत असतो. ज्या समाजात अनुभवांचे संचित आणि मनातले भाव पुढच्या पिढीकडे आदराने सुपूर्द केले जातात, तो समाज कधीही वैचारिकदृष्ट्या दरिद्री होत नाही. असेच अनुभवाचे संचित विनायाताईंनी या पुस्तकाच्या माध्यमातून पुढच्या पिढीकडे सुपूर्द केले आहे. 

गृहिणीपदापासून ते लेखिका होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. कोणताही व्यावसायिक पाठिंबा किंवा लिखाणाचा पूर्वअनुभव नसताना केवळ आंतरिक ओढीतून एखादी व्यक्ती कशी उत्तम लेखिका बनू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे विनयाताई! आपल्या मुली लहान असताना त्यांच्या शाळेतील निबंधांसाठी आणि वक्तृत्वासाठी त्या नेहमी आनंदाने मार्गदर्शन करत, मुद्दे सुचवत. जेव्हा या छोट्याशा प्रयत्नांमुळे मुलींना आंतरशालेय स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळत, तेव्हा एका आईचा ऊर अभिमानाने भरून येत असे. पुढे याच मुलींनी त्यांच्यातील सुप्त लेखिकेला ओळखले आणि "आई, तू लेखिका बन ना!" अशी पहिली निरागस साद घातली. वाचनाची आवड तर त्यांना पूर्वीपासून होतीच, पण आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचलेल्या लेखांवर त्यांनी दिलेल्या मार्मिक प्रतिक्रिया अनेकांना भावू लागल्या. लोकांकडून मिळालेल्या याच प्रोत्साहनातून, प्रतिक्रिया लिहिता लिहिता कधी स्वतंत्र लेख लिहून झाले, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही आणि बघता बघता आठवणींचा हा देखणा ठेवा तयार झाला.

माझ्या हाती आलेल्या विनयाताईंच्या 'पाऊलखुणा आठवणींच्या' या पुस्तकाच्या पानातून आणि लेखिकेच्या भावुक मनोगतातून जाताना मला प्रकर्षाने जाणवले की, हा केवळ एक लेखसंग्रह नाही; तर ही एका संवेदनशील मातृत्वाने आजच्या विस्कळीत होत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेला आणि हरवत चाललेल्या मानवी मूल्यांना घातलेली एक मायेची साद आहे. 'विचारांची फुले, अनुभवांची माळा, जीवनाला दिशा देणारे शब्द' हे या पुस्तकाचे ब्रीद वाक्य संपूर्ण पुस्तकात रक्ताभिसरणासारखे वाहते आहे. या पाऊलखुणा जशा आठवणींच्या आहेत, तशाच त्या संस्कारांच्या आणि मूल्यांच्या देखील आहेत.

पुस्तकाचे शीर्षक आणि त्याचे मुखपृष्ठ मनाला भूतकाळातील समृद्ध गल्ल्यांमध्ये घेऊन जाणारे आहे. 'पाऊलखुणा' म्हटलं की आपल्याला आपल्या बालपणाची, आजी-आजोबांच्या मायेची आणि सुट्ट्यांमध्ये अनुभवलेल्या रानमेव्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे मुखपृष्ठ वाचकाला आश्वस्त करते की, आत जे काही दडले आहे ते नितांत सुंदर, सात्विक आणि वाचनीयच असणार. मुखपृष्ठावर उघडे पुस्तक आहे. उघडे पुस्तक पारदर्शीपणाचे प्रतीक आहे. त्यांचे लेखनही असेच उघड्या पुस्तकाप्रमाणे प्रांजळ आहे. मुखपृष्ठावरील पुस्तकातल्या शब्दांप्रमाणे जीवनाला दिशा देणारे शब्द त्यांनी अनुभवाच्या माळेत गुंफले आहेत. या शब्दफुलांना आठवणींचा, मूल्यांचा आणि संस्कारांचा सुगंध आहे. अनुक्रमाणिकेवर नजर टाकली, तरी त्यातील विषयांचे वैविध्य आपल्याला थक्क करते. निसर्ग, संस्कृती, कौटुंबिक नातेसंबंध, तंत्रज्ञानाचे आक्रमण आणि प्राणिमात्र या सगळ्यांना लेखिकेने आपल्या चिंतनाच्या परिघात कल्पकतेने सामावून घेतले आहे. सगळ्या जुन्या, प्राचीन गोष्टी पूर्णपणे कालबाह्य कधीच होत नाहीत आणि नवीन गोष्टीत सगळेच चांगले असेल असेही म्हणता येत नाही. जीवनामध्ये आपल्याला नव्या-जुन्यांचा संगम साधावा लागतो. विनायाताईंचा असाच प्रयत्न या पुस्तकातील लेखातून दिसून येतो. आपल्या परंपरांचा अभिमान बाळगताना त्यांनी नव्या पिढीतील आणि आधुनिक समाजातील चांगल्या गोष्टींचा देखील स्वीकार केला आहे. 

या पुस्तकात एकूण ५४ लेखांचा समावेश आहे. प्रत्येक लेख म्हणजे मानवी स्वभावाचा आणि सामाजिक बदलांचा एक जिवंत दस्तऐवज आहे. काही महत्त्वाच्या लेखांचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला आहे. यातील पहिला लेख 'तूच खरा मानवी घडे घडविणारा कुंभार' हा आहे. यात शिक्षकांचे काम किती महत्त्वाचे आहे यावर लेखिकेने प्रकाश टाकला आहे. आजच्या 'छडी लागे छमछम' मागे पडलेल्या काळात, शिक्षकाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे विनयाताई मोठ्या खुबीने मांडतात. 'आपल्या जीवनाचा मजबूत पाया आपले संस्कार' या लेखात त्यांनी गर्भसंस्कारांपासून ते आईच्या भूमिकेतले जे पदर उलगडले आहेत आणि त्यात जी उदाहरणे दिली आहेत, ती आजच्या पालकांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरतील.

'पानमय जगत' हा लेख वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेपासून ते मानवी अस्तित्वापर्यंतचा धागा जोडतो. 'पानांना विष्णूची दिलेली उपमा' ही लेखिकेची कल्पकता थक्क करणारी आहे. पानांचे विविध उपयोग त्यांनी वाचकांच्या लक्षात आणून दिले असून, त्यातील शास्त्रीय माहिती अत्यंत सोप्या शब्दांत मांडली आहे. 'वाजत गाजत येते ती लक्ष्मी, लपत छपत येतो तो पैसा' या लेखातील चिंतन अत्यंत उच्च दर्जाचे आहे. प्रामाणिकपणाने आणि कष्टाने येते ती लक्ष्मी, जी घरात समृद्धी आणते; पण लांडीलबाडीने येतो तो पैसा, जो सुख हिरावून घेतो. हा भेद आजच्या चंगळवादी युगातल्या तरुणाईने समजून घेणे गरजेचे आहे. या लेखातील विचार—'पैसा कोणत्याही मार्गाने मिळवला तरी चालतो' अशा प्रकारची जी मानसिकता सध्या समाजात निर्माण होत आहे, त्यावर कडाडून प्रहार करणारा आहे.

लेखिकेची नजर केवळ कौटुंबिक विश्वापुरती मर्यादित नाही, त्या समकालीन आणि वृत्तपत्रांत आलेल्या चालू घडामोडींवर देखील भाष्य करतात. बिबट्यांचे जंगल सोडून मानवी वस्तीत येणे असो, वा वाचन आणि टीव्हीच्या माध्यमातून समजलेली जंगलातील वाघ-सिंहाच्या गोटातील 'आई' असो, या सर्व वर्तमान घडामोडींनी त्यांच्या संवेदनशील मनाला स्पर्श केला आणि त्यातून अत्यंत जिवंत लेख जन्माला आले.

'देखणा उत्सव श्री महालक्ष्मी यात्रा (केळशी)' या पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असलेल्या लेखांमध्ये त्या वाचकाला जणू आपल्यासोबतच कोकणात घेऊन जातात. तिथली संस्कृती, तिथला एकोपा, 'वारीपण' आणि बलुतेदार पद्धतीचे जे जिवंत चित्रण त्यांनी केले आहे, ते वाचताना आपण स्वतः त्या यात्रेत फिरत असल्याचा भास होतो. 'तिचे यश' या लेखात आपल्या धडपडणाऱ्या लेकीचे यश पाहून त्यांचे मातृहृदय उचंबळून आल्याचे जाणवते. अर्थात, आपल्या मुलांचे असे यश हे कोणत्याही आई-वडिलांसाठी अभिमानास्पदच असते. मुलीने आपल्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव ठेवून केलेला अभ्यास आणि आईनेही तिच्या कष्टांची कदर करून या लेखात केलेले कौतुक, या दोन्ही गोष्टी अत्यंत स्पृहणीय आहेत.

लेखिकेने 'साधना' आणि 'छावा' यांसारख्या चित्रपटांचा उल्लेख करून केवळ मनोरंजनाचा वेध घेतला नाही, तर त्यातून मिळणारा इतिहास, राष्ट्रप्रेम आणि कौटुंबिक मूल्यांचे दाखले दिले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा उल्लेख वाचकाला अंतर्मुख करतो. तसेच 'जागतिक वसुंधरा दिन' या लेखात त्यांनी मांडलेले 'माती-फळ्यांचे नैसर्गिक शीतकपाट' (फ्रीज) आजच्या 'ग्लोबल वॉर्मिंग'च्या युगात आपण किती चुकीच्या जीवनशैलीकडे वळलो आहोत, यावर बोट ठेवते. "तुम्ही निसर्गाला वाचवा, तो तुम्हाला वाचवेल" यासारखी साधी-सोपी वाक्ये वाचकांच्या मनावर सहज कोरली जातात. सर्वच लेखांचा आढावा घेणे या ठिकाणी शक्य नसले तरी सर्व लेख वाचकाला काहीतरी चांगले वाचण्याचा आनंद देतील हे निश्चित !

विनयाताईंची लेखनशैली ही अत्यंत सहज, प्रवाही आणि संवादात्मक आहे. त्या कुठेही क्लिष्ट शब्दांचा वापर करत नाहीत. भाषेचा उगीच आणलेला फुलोरा त्यांच्या लेखनात कुठेही आढळत नाही. त्यांच्या भाषेत एक अस्सल मराठमोळा गोडवा आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई चौधरी यांच्या वचनांचा आणि कवितांचा केलेला योग्य वापर लेखांची वैचारिक उंची वाढवतो. त्यांच्या लेखनात 'स्वानुभवाला' मोठे स्थान आहे. स्वतःच्या मुलींचे शिक्षण, त्यांना मिळणारे यश, नातवंडांबरोबर अनुभवलेले बालपण किंवा दूधवाले कुटे आजोबा, कातकरी समाजातील 'हशा आणि त्याची बायको हशी' यांची रेखाटलेली चित्रे ही त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीची साक्ष देतात. 'नकारातही गोडवा कसा शोधावा' आणि विधीलिखित गोष्टींकडे सकारात्मकतेने कसे पाहावे, हा समतोल त्यांच्या लेखणीला सुंदर जमला आहे. या सगळ्या लेखांमध्ये विनयाताईंचे सामाजिक भानही प्रकर्षाने अधोरेखित होते. आजच्या काळात माणसाचे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे. विकासाच्या वाटेवर चालणे म्हणजे पर्यावरणाचे नुकसान करणे नव्हे. पण सध्या तरी ते होताना दिसते आहे. विनयताईंच्या लेखात निसर्गाचे प्रेम, पर्यावरण जपण्याचा संदेशही ' पृथ्वीचे मनोगत ' सारख्या अनेक लेखातून प्रतिबिंबित झालेला दिसतो. 

हे पुस्तक आकारास येण्यामागे एका सुजाण कुटुंबाचे पाठबळ उभे आहे. स्वतः लेखिकेचे पती आणि त्यांच्या मुली यांनी लावून धरलेला आग्रह, विभावरी कुलकर्णी यांनी पुस्तकाला दिलेला सुंदर आकार, आणि लेखिकेच्या केळशी गावच्याच असलेल्या 'मनोरमा प्रकाशनच्या' विद्याताई फडके यांनी "तुझे लेख छानच असतात, तू खरंच पुस्तक काढ" असे म्हणत दिलेला शब्द आणि आत्मविश्वासाचे बळ, यांमुळेच हा भावनिक प्रवास आज ग्रंथरूपाने आपल्यासमोर येत आहे.

आजचा माणूस हा भौतिकदृष्ट्या 'कमाईचा बादशहा' झाला असला, तरी मानसिकदृष्ट्या 'समाधानाचा भिकारी' होत चालला आहे, हे लेखिकेचे निरीक्षण तंतोतंत खरे आहे. अशा काळात हे पुस्तक पालकांना आपल्या पाल्यांवर इंटरनेटच्या जमान्यात कसे सुसंस्कार करावेत हे तळमळीने सांगते; त्याचवेळी तरुणांना कष्टाला आणि श्रमाला कशी प्रतिष्ठा द्यावी व व्यवसायाभिमुख शिक्षण कसे घ्यावे याबाबत मार्गदर्शन करते; आणि ज्येष्ठांना नातवंडांच्या रूपात 'दुधावरची साय' कशी अनुभवावी आणि स्वतःचे बालपण कसे जगावे, याचा निवांत विरंगुळा देते. एकंदरीत सर्वच वयोगटातील वाचकांसाठी उपयुक्त ठरावे असे हे पुस्तक आहे.

'पाऊलखुणा आठवणींच्या' हे पुस्तक म्हणजे प्रत्येक घराच्या देव्हाऱ्यात असावा असा एक सुसंस्कारांचा दीप आहे, असे मला वाटते. हे पुस्तक वाचकाला निखळ आनंद तर देईलच, पण सोबतच अंतःकरणात माणुसकीची एक नवी पालवीही फुलवून जाईल यात शंका नाही.

विनयाताईंच्या या पहिल्यावहिल्या पुस्तकाला आणि पुढील साहित्यिक प्रवासाला माझ्या आणि माझ्या 'उगवतीचे रंग' परिवारातर्फे मनापासून अनंत शुभेच्छा!

- विश्वास देशपांडे (ज्येष्ठ साहित्यिक, चाळीसगाव )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...