मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ९०

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ९०

न ये राम वाणी तया थोर हाणी ।

जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी ।

हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।

बहू आगळे बोलिली व्यासवाणी ।।९०।।

अर्थ : ज्याच्या मुखात रामाचे नाव येत नाही असा माणूस आपल्या जीवनाचे मोठे नुकसानच करून घेत असतो. अशा व्यक्तीचे जगणे व्यर्थ आहे. अशी व्यक्ती अत्यंत हीन समजावी. वेदशास्त्रे, पुराणे यात महर्षी व्यासांनी हरिनामाची महती विविध प्रकारे सांगितली आहे. 

( हाणी - हानी/नुकसान, काणी - क्षुद्र/हीन ) 

रामनामाचे महत्व अपरंपार आहे. आतापर्यंतच्या विविध श्लोकातून त्याचे महत्व विविध प्रकारे आपल्याला सांगितले आहे. या श्लोकात ते ज्याच्या मुखी रामनाम येत नाही अशा मनुष्याची अवस्था वर्णन करतात. मुळात मनुष्य जन्म दुर्लभ. ८४ लक्ष योनी अनेकवार फिरून हा जन्म मिळतो असे सांगितले जाते. अशा या दुर्लभ मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर मुखामध्ये हरिनाम येणे आवश्यक आहे. रामनाम म्हणजे अमृत आहे. जे रामनामाचा आश्रय घेतात अशांचा मुखातून जणू अमृत बाहेर पडते. ते मुख खरोखरच धन्य होय. अन्यथा आयुष्य व्यर्थ बडबडण्यात गेले असे समजावे. अशा व्यक्ती जगल्या काय आणि मेल्या काय सारखेच ! त्यांचे जीवन व्यर्थ गेले. अशा व्यक्तींचे जगणे म्हणजे अत्यंत हीन दीन अशा प्रकारचे आहे असे समर्थ म्हणतात. समर्थानी अशा व्यक्तीसाठी 'काणी ' शब्द वापरला आहे. अशा व्यक्तींचे जिणे कवडीमोलाचे. स्वा. सावरकरांचे शब्द हरिनामाबद्दल वापरायचे तर असे म्हणता येईल," तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण..."

हरीनाम मुखात न येता जगणे म्हणजे मरणच आहे. ' हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रें ' असे ज्ञानदेव म्हणतात. हरिनामाचे सामर्थ्य अगाध आहे. त्याचे नाम मुखात आले की जन्मोजन्मीचे पाप नष्ट होते. त्यासाठी ज्ञानदेव गवत आणि अग्नीची उपमा वापरतात. वाळलेले गवत अग्नीच्या संपर्कात आले की क्षणार्धात जळून नष्ट होते, अग्नीशी समरस होते. तसेच परमेश्वराचे नाम घेणारी व्यक्ती त्याच्याशी एकरूप होते. ती परमेश्वरच होऊन जाते. 

असे हरिनामाचे महत्व साधुसंतांनी निरनिराळ्या प्रकारे वर्णन केले आहे. मनुष्याला त्याद्वारे सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यासांनी वेद, शास्त्रे, पुराणे यांची रचना केली. त्यांनी देखील विविध प्रकारे त्यात हरिनामाचे महत्व स्पष्ट केले आहे. महाभारतात एकदा दुर्योधन श्रीकृष्णाला विचारतो की धर्म म्हणजे काय हे मला कळते पण तसे वागण्याची बुद्धीच मला होत नाही. अधर्म म्हणजे काय हेही मला समजते, पण त्यातून मला बाहेर पडता येत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, " तुझ्या हृदयात तू मला स्थान दे म्हणजे तुला चांगले वागण्याची बुद्धी होईल." प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात परमेश्वराचे वास्तव्य असतेच. परंतु अज्ञानामुळे त्यावर पडदा पडलेला असतो. हा पडदा ज्ञानाच्या प्रकाशाने दूर होतो. पण दुर्योधनासारख्या व्यक्ती प्रत्यक्ष भगवंताने सांगूनही त्याप्रमाणे आचरण करीत नाहीत. अशा माणसांचे जगणे खरोखरच व्यर्थ होय.संत मीराबाई म्हणतात, " रामनाम रस पीजे मनवा, रामनाम रस पीजे, तजि कुसंग संतसंग बैठी नित, हरी -चर्चा सुणी लीजें." रामनामाच्या रसातील गोडी चाखल्याशिवाय कळणार नाही. तेव्हा आपणही रामनामाचा आश्रय घ्यावा. आपल्या मुखात अखंड रामनाम येईल असा सत्संग, असे वागणे असावे. मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यावे. संत एकनाथ म्हणतात, "रामनाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी." 

स्वसंवाद 

१. ८४ लक्ष योनी फिरून मिळालेल्या या 'दुर्लभ मनुष्य जन्माचा' वापर मी केवळ व्यर्थ गोष्टींमध्ये करत आहे, की रामनामाने त्याचे सार्थक करत आहे? 

२. दुर्योधनाप्रमाणे मलाही बऱ्याचदा 'चांगले काय आणि वाईट काय' हे समजत असूनही, माझ्या मनातील अज्ञानाचा पडदा दूर करण्यासाठी मी देवाकडे 'सद्बुद्धी' मागतो का ?

 ३.  संत एकनाथांच्या वचनानुसार, तिन्ही लोकांत 'धन्य' होण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी मी रोजच्या जगण्यात नामस्मरणाचा आश्रय घेतो का ?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

९/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...