मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ८९

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८९ 

जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।

अती आदरे गद्य घोषें म्हणावे ।

हरीचिंतने अन्न जेवीत जावे ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।।८९।।

अर्थ : लोकांमध्ये असताना आणि जेवण करताना भगवंताचे नाम घ्यावे. हे नाम घेताना ते आदरपूर्वक आणि मोठ्याने गजर करून स्पष्टपणे म्हणावे. जेवण करताना भगवंताचे चिंतन करावे. असे केल्याने नैसर्गिकपणे भगवंताची प्राप्ती होते. 

( घोषें - मोठ्याने गजर करून, हरीचिंतने - भगवंताच्या स्मरणात राहून, स्वभावे - सहजपणे )

विवेचन 

अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपली भारतीय संस्कृती अन्नाला परमेशराचाच दर्जा देते. अन्नाला इतका मोठा आणि पवित्र दर्जा आपण देतो हेच आपल्या संस्कृतीचे मोठे वैशिष्ट्य आहे. मग असे पवित्र अन्न सेवन करताना आपला भावही पवित्र असावा. भाव किंवा भावना या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी महत्व. आपल्या मानण्यावरच सर्व काही अवलंबून असते. परमेश्वराच्या मंदिरात जाणारा भाविक मनोभावे त्या मूर्तीची पूजा करतो. त्याच्यासाठी ती केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष भगवंताला तो त्या ठिकाणी पाहतो. परंतु त्याच ठिकाणी एखादा नास्तिक माणूस गेला तर त्याच्यासाठी ती फक्त एक पाषाणाची मूर्ती असते. म्हणूनच जेवताना पवित्र भाव असावा. हा पवित्र भाव कसा येईल ? तर अन्नाचा घास घेण्यापूर्वी जेव्हा आपण पवित्र असे भगवंताचे नाम उच्चारू तेव्हा. 

आजकाल हॉटेलमध्ये जाण्याची, बाहेरचे खाण्याची आवड सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कसे जेवतो आपण हॉटेलमध्ये ? जरा आठवून पहा. आजूबाजूला लोकांच्या बोलण्याची कलकल असते. त्यातच आपण वेटर केव्हा आपले जेवण आणतो त्याकडे लक्ष ठेवून असतो. जेवताना बरेच जण मोबाईल पाहतात. जेवणाला आपल्या संस्कृतीत ' उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ' असे म्हणतो. पण तिथे केवळ उदरभरणच होते. त्याला परमेश्वराच्या नामाचे अधिष्ठान आपण देत नाही. 

जेवण म्हणजे एक यज्ञकर्म आहे. एखादा यज्ञ करताना आपण त्या त्या देवतेचे नाव घेऊन अग्निमध्ये आहुती टाकत असतो. अशा प्रकारे दिलेली आहुती अग्निमार्फत त्या त्या देवतेपर्यंत पोचते असे आपण मानतो. आपल्या पोटात देखील जठराग्नी असतो. तो प्रदीप्त झाल्यानंतरच त्याला आहुती द्यायची असते. आपल्या जठरातील अग्नीला ' वैश्वानर ' असे नाव आहे. हा शब्द विश्वात सर्वत्र व्यापून राहिलेल्या अग्निदेवतेचे प्रतिनिधित्व करतो. अर्थात ही अग्निदेवता म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवंताचे स्वरूप आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात," अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।" अर्थात सर्व प्राणिमात्रांच्या शरीरात असलेला वैश्वानर अग्नी म्हणजे मी आहे. 

म्हणून समर्थ म्हणतात की समूहामध्ये जेवण करताना आदरपूर्वक परमेश्वराचे नाम घ्यावे. सर्वांना कळेल, स्पष्टपणे ऐकू येईल अशा पद्धतीने ते म्हणावे. पूर्वी आपल्याकडे जेवणाच्या पंक्तीत बसताना श्लोक म्हणण्याची प्रथा होती. आजही ती काही ठिकाणी पाळली जाते. त्यामुळे अन्नाबद्दल पवित्र भाव बाळगणे, जेवणाला लगेच सुरुवात करण्याऐवजी थोडा संयम पाळणे, भगवंताचे नाम आदरपूर्वक घेणे या गोष्टींचे संस्कार सहजपणे बालमनावर होत होते. आता मात्र पंक्तीत श्लोक म्हणणे फार कमी झाले आहे. कोणी तो म्हणत असेल तर त्याच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. घरी आपण एकटे असू तेव्हा देखील जेवणापूर्वी भगवंताचे नामस्मरण करूनच जेवणाला सुरुवात करावी. 

आपण जसे अन्न खाऊ तसे विचार निर्माण होतात. सात्विक अन्न असेल तर विचार देखील चांगले निर्माण होतात. राजस किंवा तामसीअन्न विकारांना जन्म देते. आपली आई, पत्नी किंवा बहीण जेव्हा स्वयंपाक करते, त्यावेळी तिच्या मनात आपण आपल्या माणसांसाठी हे भोजन बनवतो आहोत असा भाव असतो. ते भोजन तयार करताना मनात  प्रेम असते. साहजिकच ते विचार तिने तयार केलेल्या अन्नात उतरतात. आपले पूर्वज आणि ऋषीमुनी म्हणूनच वाटेल त्या ठिकाणी जेवत नव्हते. महाभारतात श्रीकृष्ण जेव्हा शिष्टाई करण्यासाठी कौरवांकडे जातो, तेव्हा दुर्योधनाने बराच आग्रह करूनही तो त्या ठिकाणी जात नाही. त्याऐवजी विदुराकडील साधेच परंतु सात्विक अन्न जेवणे तो पसंत करतो. 

अनेक लोकांना नोकरी व्यवसायानिमित्त काही वेळा नाईलाजाने बाहेर जेवण घ्यावे लागते. असे जेवण घेताना त्याभोवती पाणी फिरवून आपण भगवंताचा प्रसाद ग्रहण करतो आहे अशी भावना मनात असू द्यावी. मग त्या अन्नाचे प्रसादात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. जेवताना भगवंताचे स्मरण असू द्यावे. असे केले म्हणजे ती आहुती खरोखरच भगवंतापर्यंत पोहोचेल. ज्याला अध्यात्मार्गावर चालायचे आहे त्याला तर अन्न सेवन करताना अशी दक्षता घ्यायलाच हवी. अन्नाचा स्थूल भाग आपल्या शरीराचे भरण पोषण करतो तर त्याचा सूक्ष्म अंश आपल्या मनाचे आणि बुद्धीचे पोषण होते. म्हणून अन्न ताजे, सात्विक, साधे असावे. 

जेवताना आपले लक्ष चवीकडे जास्त असते. एखादी गोष्ट आवडली की आपण खाण्यावर नियंत्रण ठेवत नाही. रसना म्हणजे आपली जीभ यात महत्वाची भूमिका पार पाडते. जिभेची दोन कार्ये आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वाद किंवा चवीचे ज्ञान आपल्याला तिच्यामुळे होते. दुसरे म्हणजे जीभ हे बोलण्याचे साधन आहे. ज्याला जिभेवर नियंत्रण ठेवता आले, त्याला परमार्थ लवकर साधता येतो. खाताना आणि बोलताना अशा दोन्ही अर्थाने. ज्याला भगवंत प्राप्तीची इच्छा आहे त्याने त्याच्या स्मरणाशिवाय एक क्षणही वाया जाऊ देता कामा नये. स्वामी समर्थांच्या वाङ्मयात सांगितल्याप्रमाणे "अहो येता जाता, कार्य करीता, सदा घेता देता, उठत बसता वदनी वदता ग्रास गिळता..." या पंक्तीप्रमाणे सदोदित त्याचे नामस्मरण करत जावे. मग भगवंत दूर नाही. 

स्वसंवाद 

१. मी जेवण करताना केवळ जिभेच्या 'स्वादाचा' आणि आवडीचा विचार करतो, की ते शरीराला ऊर्जा देणारे एक 'यज्ञकर्म' म्हणून शांत चित्ताने स्वीकारतो? 

२. आजकाल जेवताना मोबाईल पाहण्याची किंवा टीव्ही बघण्याची लागलेली सवय सोडून, मी किमान २ मिनिटे देवाचे नाव घेऊन भोजनाला सुरुवात करतो का?

 ३. "अन्नाचा सूक्ष्म अंश माझ्या मनाचे आणि बुद्धीचे पोषण करतो," हे लक्षात ठेवून मी सात्त्विक आहार घेण्याबाबत आणि अन्न शिजवताना मनात चांगले विचार ठेवण्याबाबत जागरूक आहे का? 

४."येता जाता, उठत बसता, ग्रास गिळता" माझ्या मनात आणि वाचेवर त्या जगनियंत्याचे नाव अखंड राहते का?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

८/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...