उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८८
बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवा मानवा हे चि कैवल्य साचे ।।८८।।
अर्थ : या रामाचे नाव अतिशय चांगले आहे. ते सुंदर, छोटेसे, म्हणायला सोपे आणि बिनखर्चाचे आहे. हे नाम भवाचे म्हणजे संसाराचे मूळ कारणच नाहीसे करते. हे नाम मोक्ष किंवा परमात्म्याचे दर्शन घडवणारे आहे.
( साजिरे - सुंदर /शोभून दिसणारे, स्वल्प - छोटेसे, फुकाचे - बिनखर्चाचे, मूळ - मूळ कारण, निर्मूळ -समूळ उच्चाटन करणे, कैवल्य - मोक्ष/चिरंतन सुख, साचे - नक्कीच/खरोखर )
या श्लोकात समर्थ नामाचे महत्व पुन्हा एकदा स्पष्ट करतात. ' राम ' हे नावच किती चांगले आहे ! सुंदर आहे, अल्पं आहे. ते घेण्यास कोणताही खर्च करावा लागत नाही. बरं, हे नाव घ्यायचे तरी कशासाठी ? तर समर्थ सांगतात की हे नाम ज्या संसारात येऊन माणूस सुखदुःखे भोगतो, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो, त्याचे मूळ कारणच नाहीसे करणारे आहे. हे मूळ कारण नाहीसे करते म्हणजे तरी काय करते ? तर हे नाम कैवल्यप्राप्ती करून देणारे आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे चिरंतन सुख ! तेच प्राप्त करून देणारे हे रामनाम.
एखादी छोटीशी परिणामकारक गोळी असावी आणि ती घेतल्याने आजार समूळ नाहीसा व्हावा तशी ही गुटिका आहे. दिसायला छोटी पण अत्यंत परिणामकारक. ज्याने ज्याने ती घेतली, त्याचा भवंताप नाहीसा झाला. पण खरे कारण असे की आमचा विश्वासच यावर बसत नाही. एक छोटेसे दोन अक्षरांचे नाम. त्याच्यात एवढे सामर्थ्य कसे असेल ? पण त्याच्यातील सामर्थ्याचा प्रत्यय तेव्हाच येईल, जेव्हा ते मनापासून घेतले जाईल. वाल्या कोळ्याने रामनाम घेतले आणि अखिल विश्वाला वंदनीय अशा वाल्मिक ऋषींमध्ये त्याचे रूपांतर झाले. त्यांच्या हातून ' रामायण ' हा अजरामर ग्रंथ लिहिला गेला. रामाचे नाव काय करू शकत नाही. समुद्रात सेतू बांधणाऱ्या वानर सेनेने दगडावर फक्त ' राम ' असे लिहिले आणि काय आश्चर्य ! ज्या दगडांचा मूळ गुणधर्म पाण्यात बुडण्याचा, ते चक्क पाण्यावर तरले. एवढेच नाही तर त्यावरून रामाची सेना लंकेला पोचली.
या भवसागरात आपल्यालाही तरून जायचे असेल तर हृदयामध्ये ' रामनामाला ' स्थान देणे जरूर आहे. अन्यथा पाषाणात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. बुडणे हे ठरलेले. रामनाम ही या भवसागरातून तारून नेणारी नौका आहे. बरं, हे नाम तरी किती सोपं, सुंदर आणि बिनखर्चाचे. बसल्या बसल्या, काम करताना तुम्ही केव्हाही ते घेऊ शकता. त्यातली गोडी ही अनुभवावी लागते. ती सांगून कळत नाही. अनुप जलोटा यांनी गायिलेले भजन ' जगमें सुंदर हैं दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम.' आपल्याला माहिती असेल. ' राम ' या दोन अक्षरी शब्दात ' र ' हे अक्षर अग्निवर्णाचे निदर्शक आहे तर ' म ' हे अक्षर चंद्राची शीतलता दाखवणारे आहे. थोडक्यात म्हणजे 'राम ' या शब्दात सूर्यशक्ती आणि चंद्रबल यांचा मिलाफ आहे. ते संतुलित आहे. म्हणूनच ज्याने ते घेतले, त्याच्या आयुष्यात संतुलन साधले जाते. ' जय जय राम, जय श्रीराम, दो अक्षर का प्यारा नाम, रामनाम के जपनेसेही बन जाते सब बिगडे काम.'
रामनाम घेण्याची मनाला सवय लावली तरच आयुष्याच्या अखेरीस मुखात रामनाम येईल. हे घडले तर कैवल्यप्राप्ती आहेच. मन विषयविकारात अडकले तर अखेरीस ओठावर रामनाम न येता अन्य कशात तरी मन अडकेल आणि मग पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. रामनामाचा जप केल्याने साधक रामरूप होतो. तुकाराम महाराज म्हणतात,"राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनि पदवी घेईजे."
स्वसंवाद
१. जे नाम अतिशय सुंदर, सोपे आणि 'फुकाचे' (बिनखर्चाचे) आहे, ते घेण्यासाठी मी आळस करतो की अत्यंत आदराने त्याचा स्वीकार करतो?
२. संसारातील सुखांमध्ये रमून मी केवळ 'बुडणाऱ्या पाषाणासारखे' आयुष्य जगत आहे, की रामनामाची नौका धरून या भवसागरातून 'तरून' जाण्याचा प्रयत्न करत आहे?
३. माझ्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग येताना मानसिक संतुलन राखण्यासाठी, मी रामनामातील सूर्यशक्ती आणि चंद्रबलाचा अनुभव घेतो का?
४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, "राम म्हणता रामच होईजे" या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझ्या मनाला नामस्मरणाची अखंड सवय लावत आहे का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
६/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा