मुख्य सामग्रीवर वगळा

मराठीचा घसरलेला टक्का!

उगवतीचे रंग

मराठीचा घसरलेला टक्का !

परवा 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट पाहिला. आजच्या गल्लाभरू चित्रपटांच्या दुनियेत एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट पाहताना आनंद वाटला. मराठी शाळांची खालावत चाललेली धक्कादायक अवस्था आणि अस्तित्वाचा संघर्ष या चित्रपटाने अत्यंत ढळढळीतपणे समाजासमोर आणला आहे. हा चित्रपट पाहत असताना मला नुकताच काही दिवसांपूर्वी लागलेला इयत्ता दहावीचा निकाल आठवला. निकालानंतर वर्तमानपत्रात ठळक अक्षरांमध्ये एक मथळा (हेडलाईन) प्रसिद्ध झाला होता ' दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ९४,००० विद्यार्थी अनुत्तीर्ण !' आपल्याच मातृभाषेला दुय्यम स्थान दिल्यामुळे मुले चक्क मराठीत नापास झाली आहेत. ही संख्या थोडीथोडकी नाही. 

" मला सगळ्या विषयात चांगले मार्क आहेत पण फक्त मराठीत गेलो ..." दहावी उत्तीर्ण एका विद्यार्थ्याचे हे उद्गार ! आम्हाला सगळ्या विषयात चांगले मार्क्स असले तरी आमच्या टॉप फाईव्ह मध्ये मराठी नसते. "आमची उज्ज्वल यशाची परंपरा ! आम्ही सर्व विषयांची उत्तम तयारी करून घेतो," असे मोठे मोठे बोर्ड लावणारे क्लासेस मराठी विषयाची तयारी करून घेताना कुठे जातात ?

एका बाजूला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण आनंदाने आणि अभिमानाने स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत; अर्थात, यात वावगे काहीच नाही. पण खरंच माझी मराठी टिकावी, तिची समृद्धी आणखी वाढावी यासाठी आपण मुळापासून काही प्रयत्न करतो आहोत का ? जेव्हा मुलांच्या मराठीतील नापासांचे हे धक्कादायक प्रमाण समोर येते, तेव्हा आपण क्षणभर गडबडतो, आपल्याला धक्काही बसतो. पण तो तेवढ्यापुरताच! या स्थितीला जबाबदार असलेला प्रत्येक घटक आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होतो. मुले म्हणतात, " शाळेत मराठीचे तास नियमितपणे झालेच नाहीत. " बऱ्याच वेळा मराठीचे तास दुसऱ्या विषयाला वापरले जातात. मराठी काय घरीही अभ्यासता येईल. अशी मानसिकता निर्माण केली जाते. दहावीचे शिक्षक म्हणतात, " मुले आमच्याकडे येताना खालूनच कच्ची आली." प्रत्येकजण अशा सबबी देऊन आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होत असतो. पण या विषयावर आपण कधी मुळापासून यावर विचार करणार आहोत की नाही ?

'असर' (Annual Status of Education Report) चा मागील एक अहवाल सांगतो की, जी मुले दहावीत होती, त्यांना इयत्ता तिसरीत असताना पहिलीचे मराठी धडे वाचता येत नव्हते; तर आठवीत असताना दुसरीच्या स्तरावरील उतारा वाचता येत नव्हता. आज इतक्या वर्षांनंतरही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आपल्या मुलांचे मार्कांचे एकूण टक्के वाढले असतीलही, पण ज्ञानाचा आणि मराठीचा खरा टक्का मात्र घसरला आहे. मराठी साहित्य संमेलनांचे भव्य आयोजन करणे, पुस्तक प्रदर्शने भरवणे किंवा दुकानाच्या पाट्या मराठीत लिहायला लावणे या गोष्टी भाषेच्या प्रसारासाठी उपयुक्त असतीलही; पण जोपर्यंत आपण मूळ आजारावर उपाय करत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही.

ज्यांनी 'शांतिनिकेतन'ची स्थापना केली, ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बंगाली भाषेबाबत कमालीचे आग्रही होते. त्या काळात बंगालमधील सरकारी नोकरदार आणि मध्यमवर्गीय लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यात आणि इंग्रजी बोलण्यात धन्यता मानत होते. अशा विपरीत परिस्थितीत गुरुदेवांनी "मातृभाषेतील शिक्षण हेच सर्वात उत्तम शिक्षण" असल्याचा उद्घोष केला. केवळ बोलून न थांबता त्यांनी शांतिनिकेतनमध्ये केवळ बंगालीतूनच शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि पाठ्यपुस्तकेही बंगालीत तयार केली. 'आमार जीवन, आमार बानी' (माझे जीवन, हीच माझी वाणी) हे त्यांचे घोषवाक्य होते. आम्ही मात्र आज स्वातंत्र्याला ऐंशी वर्षे होत आली, तरी इंग्रजी भाषेचे गोडवे गाण्यातच मग्न आहोत.

एकदा एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला रवींद्रनाथांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. त्या काळी असे समारंभ आणि त्यातील भाषणे केवळ इंग्रजीतूनच होत असत (जी आजही होतात). उपस्थितांचीही तीच अपेक्षा होती; पण गुरुदेवांनी तो सगळा इंग्रजी राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) धुडकावून लावला आणि थेट बंगालीत भाषण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या भाषेचा असा अभिमान आपल्यात कधी जागी होणार ?

आपले सरकार इंग्रजी शाळांना धडाधड परवानग्या देत आहे आणि दुसरीकडे मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. "मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे" असा बागुलबुवा उभा करून पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवणे बंद केले. परिणामी, 'विद्यार्थी नाहीत' हे कारण पुढे करून शासनाने शाळा बंद करण्याचा सपाटा लावला आहे. ज्या काही शाळा आज कशाबशा सुरू आहेत, त्यांची अवस्था केविलवाणी आहे; कुठे छप्पर गळतेय, तर कुठे पुरेसे शिक्षक नाहीत.

'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटात हेच विदारक वास्तव अचूक मांडले आहे. विद्यार्थीसंख्या कमी झाली म्हणून शासनाकडून शाळा बंद होण्याची टांगती तलवार जेव्हा मानेवर येते, तेव्हा त्या शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के (सचिन खेडेकर) शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना हाक मारतात. हा चित्रपट आपल्याला एक मोठा धडा देतो. सरकार शाळा बंद पाडत असले आणि समाज उदासीन असला, तरी ज्या शाळेने आपल्याला घडवले, तिच्या पडत्या काळात तिच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येक माजी विद्यार्थ्याची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे. हे दुष्टचक्र मोडून काढण्यासाठी समाज, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि शासन या सर्वांनी आता एकत्र यायलाच हवे.

'मी मराठी, माझी शाळा मराठी' हे आता केवळ वाक्य न राहता आपले ब्रीदवाक्य व्हायला हवे. आमचा इंग्रजीला अजिबात विरोध नाही, ती काळाची गरज म्हणून महत्त्वाची भाषा आहेच आणि ती पुढेही शिकता येते. पण ज्या गोष्टी मातृभाषेतून आमचे मूल सहजपणे आणि आत्मविश्वासाने शिकू शकते, त्या गोष्टी सुरुवातीलाच परक्या भाषेतून लादून त्याच्यावर ताण का आणायचा ? मराठी शाळांमधून केवळ कोरडे शिक्षण दिले जात नाही, तर आपली संस्कृती, शिष्टाचार आणि उत्तम संस्कार तिथे जोपासले जातात. जर आपल्याला आपली संस्कृती टिकवायची असेल आणि मुलांवर सुसंस्कार हवे असतील, तर मराठी शाळा आणि मराठी माध्यम अपरिहार्य आहे.

मुलांना मराठीची खरी गोडी शालेय स्तरापासूनच लागली पाहिजे; ती केवळ 'एक परीक्षा' म्हणून अभ्यासली जाऊ नये. ही गोडी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षक, पालक आणि संपूर्ण समाजाने उचलली पाहिजे. मुलांच्या पाठ्यपुस्तकातील धडे, कविता त्यांना मराठीची गोडी निर्माण होईल अशा असाव्यात. घरातही मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे यावीत. पालकांनी देखील मुलांसमोर दर्जेदार अशी मराठी पुस्तके स्वतः वाचावीत. सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते. नुसते वाचन करा म्हणून सांगितले तर मुले ऐकणार नाहीत. यासोबतच, भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये आणि नोकऱ्यांमध्येही मराठीला मानाचे व अनिवार्य स्थान मिळाले पाहिजे. "मराठी शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही" हे जेव्हा मुलांच्या आणि पालकांच्या लक्षात येईल, तेव्हाच मराठीच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने प्राधान्य मिळेल.

आपल्याला केवळ गणित, विज्ञान, इतिहास किंवा भूगोल येऊन उपयोग नाही; आपल्याला आपली मातृभाषाही उत्तम लिहिता, बोलता आणि वाचता आली पाहिजे. "माझा मराठाचि बोलू कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके।" या माउलींच्या उद्गाराची अनुभूती आमची मुले केव्हा घेणार ? जेव्हा त्यांना मराठी भाषेत खरोखर रस वाटू लागेल तेव्हाच ना ! आणि याच मराठी मातीतून उद्याचे उत्तम साहित्यिक, वक्ते, शास्त्रज्ञ आणि समाजाला दिशा देणारे समाजसेवक निर्माण होतील. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आणि गर्वाने म्हणू शकू...

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..."

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

५/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...