उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८६
मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेऊनि राहे ।
तयावीण तो सीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ।।८६।।
अर्थ :
विश्राम म्हणजे विश्रांती कुठे आहे तर ज्याच्या मुखात रामनाम आहे तेथेच ! ज्याच्या मुखी रामनाम आहे असा मनुष्य अखंड आनंदाचे सेवन करीत असतो. रामनामाशिवाय अन्य काही करणे म्हणजे व्यर्थ शिणवणे आणि संदेह उत्पन्न करणारे आहे. नाम हेच निजधाम असून ते सर्व शोक हरण करणारे आहे.
( सदानंद - अखंडित आनंद, सीण - शीण/कष्ट/ताप, संदेहकारी - संशय निर्माण करणारा, शोकोपहारी - शोक/दुःख हरण करणारा )
विवेचन
रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की ज्याच्या मुखी हे रामनाम आहे त्याला त्या ठिकाणी शांती, समाधान आणि आनंद या गोष्टी प्राप्त होतात. विश्राम म्हणजे विश्रांती. विश्राम शब्दातही ' राम ' आहे. आपण आनंद मिळावा म्हणून किंवा विश्रांती मिळावी म्हणून आयुष्यभर केवढी खटपट करत असतो ! घर, पत्नी, मुलेबाळे ही सर्व आनंदाची ठिकाणे आहेत असे आम्ही सांसारिक मानतो. तिथेच विश्रांती मिळते असे समजतो. विश्रांतीसाठी काही लोक निसर्गरम्य ठिकाणी जाऊन राहतात. व्यावहारिक दृष्ट्या हे सर्व बरोबरच आहे. परंतु ज्याला अध्यात्मसाधना करायची आहे, अशा व्यक्तीने अंतर्मुख होऊन या बाह्य गोष्टींकडे दुर्लक्षच करणे श्रेयस्कर.
कोणत्याही प्रापंचिक माणसाचा संसाराचा अनुभव संपूर्णपणे सुखद आहे असे होत नाही. तो तिथे सुख शोधू पाहतो पण क्षणिक सुखाचे काही क्षण सोडले तर त्याला दुःख आणि विषादाचीच प्राप्ती होते. मात्र ज्याच्या मुखात रामनाम आहे किंवा भगवंताचे नाम आहे असा माणूस कितीही विपरीत परिस्थिती असली तरी विचलित होत नाही. त्याचा आनंद सुखाने वाढत नाही किंवा दुःखाने कमी होत नाही. म्हणून तर भगवंताच्या नामात असलेले संत एका अनोख्या मस्तीत राहताना आपल्याला आढळतात. त्यांच्या मुखावर तेज असते, ते अंतर्यामी असणाऱ्या आनंदामुळे विलसत असते. हा आनंद अखंडित असतो. ' आनंदाचे डोही आनंद तरंग ' अशी संतांची अवस्था असते ती याचमुळे.
प्रापंचिक माणूस कधी कधी केवळ नामाने मला भगवंताची प्राप्ती खरंच होईल का अशी शंका घेतो. हा संशय वाढत गेला की नामस्मरणावरील त्याचा विश्वास कमी होऊ लागतो. तो पुन्हा विषयविकारात अडकतो. तिथे आनंद शोधू लागतो. पण त्याची ही खटपट व्यर्थ शिणवणारी असते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
" नामपरते तत्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशील झणी ।
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनि श्रीहरी जपे सदा ।।"
गोंदवलेकर महाराज म्हणतात," नामातच भगवंताचा वास आहे. " म्हणून नाम हेच निजधाम आहे. आपल्याला स्वस्वरूप जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी नाम हेच साधन आहे. परमेश्वर वेदांनाही अगम्य आहे म्हणजे वेदही त्याला पूर्णपणे जाणू शकत नाहीत. तो आपल्या कल्पनेपलिकडे आहे. पण नामात त्याचा वास आहे. म्हणून आपण नाम घ्यावे. वैखरी, मध्यमा, पश्यन्ती आणि परा या वाणीच्या चार अवस्था आहेत. अखंड नामस्मरण करीत राहिल्याने एक वेळ अशी येते की आपले नाम परा वाणीपर्यंत पोहोचते. नामस्मरण अखंड सुरु राहते. देहाला सुखदुःखे जाणवत नाहीत. माणूस त्याच्यापलीकडे जातो. तो अखंड आनंदाचे सेवन करतो.
स्वसंवाद
१. मी ज्या घर, कुटुंब किंवा निसर्गरम्य ठिकाणी 'विश्रांती' शोधत आहे, ती मला कायमची शांतता देऊ शकते का ?
२. "केवळ नामाने भगवंत मिळेल का?" अशा 'संदेहकारी' (संशयी) विचारांमुळे मी माझे नामस्मरण अर्धवट सोडून पुन्हा संसाराच्या चक्रात तर अडकत नाहीये ना ?
३. माउलींनी हरिपाठात म्हटल्याप्रमाणे, "वाया आणिक पंथा जाशील झणी" हे ठाऊक असूनही माझे मन इतर निरर्थक मार्गांवर का भटकत असते ?
४. माझे नामस्मरण केवळ वरवरच्या 'वैखरी' वाणीत सुरू आहे, की ते माझ्या अंतर्मनाचा ठाव घेऊन 'परा' वाणीपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील आहे?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा