प्रा. वसंत गिरी यांच्या 'घे गगन भरारी 'या पुस्तकाचा परिचय
यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने प्रकाशित झालेले घे गगन भरारी हे पुस्तक नुकतेच हातात पडले. नावाला साजेशा मुखपृष्ठामुळे हे पुस्तक आकर्षक झाले आहे.
गिरी सर हे प्राध्यापक म्हणून तर विख्यात आहेतच. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते एक उत्तम विचारवंत आणि संवेदनशील मार्गदर्शक आहेत. अध्यापनाच्या व्यासपीठावरून, वर्तमानपत्रातील लेखांमधून, तसेच त्यांच्या असंख्य व्याख्यानांतून त्यांनी जे विचारमंथन समाजापर्यंत पोहोचवले, त्याचा गहिरा ठसा या पुस्तकात उमटलाआहे. त्यांच्या लेखनात केवळ अनुभवाचा गाभा नाही, तर आजच्या समाजस्थितीचे अचूक भान आणि भविष्यातील मार्गदर्शनही आहे. हाती आलेले हे पुस्तक म्हणजे त्या ज्ञानदीपाची नवी ज्योत आहे. या पुस्तकात सरांच्या विचारांचा झरा वाहतो आहे – कधी चिंतनशील, कधी भावस्पर्शी तर कधी वाचकाला जागं करणारा. प्रत्येक लेखात विचारांची ठिणगी आहे जी वाचकाच्या मनाला उजळून टाकते, आत्मपरीक्षणाची ज्योत प्रज्वलित करते.
सरांचे हे सातवे पुस्तक आहे. या आधी त्यांची सहा पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत. उगवतीचे उन्मेष, तरुणाचे आयडॉल सुभाषचंद्र बोस, क्रांतिउद्यानाचे तपस्वी, गोस्वामी शौर्यगाथा ही त्यांची पुस्तके म्हणजे तरुणाईसाठी इतिहासाचा प्रेरणादायी असा महान ठेवा आहे. तर हास्यगिरी भाग एक व दोन मधून विनोदी आणि उपरोधिक पद्धतीने आजच्या समाजव्यवस्थतील दोषांवर त्यांनी कोरडे ओढले आहेत.
शब्द हे फक्त ध्वनी नसतात; ते विचारांचे दीप असतात. एखादा शब्द अंतःकरणात शिरला, तर तो मनाच्या अंधाऱ्या काना-कोपऱ्याला उजळून टाकतो. प्रा वसंत गिरी सरांचे ' घे भरारी ' हे पुस्तक हाती घेतल्यावर असाच अनुभव येतो. हे लेखन म्हणजे विचारांचा आणि चिंतनाचा वसंत फुलवणारे एक उत्तुंग पर्वत शिखर. या पर्वत शिखरापर्यंत भरारी घेऊन तेथून दिसणार्या दृश्याचे निरीक्षण मात्र बारकाईने करायला हवे.
या पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे वाचकाला विचारांची नवी वाट दाखवणारा दिवा. त्यांची भाषा ओघवती आहे, पण क्लिष्ट नाही किंवा डोळे दिपवणारी नाही. ती साधेपणाच्या कळसावर उभी आहे. वाचकासमोर ते सहजपणे मुद्दे ठेवतात तसेच प्रश्नही ठेवतात. प्रश्नचिन्हांचे हे बीज इतके टवटवीत आहे की वाचकाच्या मनात आत्मपरीक्षणाची पालवी फुटल्याशिवाय राहात नाही.
‘हे बुद्धिनाथा, आम्हाला विवेक दे’ या लेखात गणरायाची स्थापना होत असताना मूर्ती आपण का स्थापन करतो, मूर्तिपूजा का करतो, प्रार्थना का करतो हे सांगताना ते म्हणतात, " मूर्ती हे देवाचे सूक्ष्म रूप. आपले मन एकाग्र करण्यासाठी मनःशांती, संयम, विचारक्षमता, कार्यक्षमता आणि क्षमाशील वृत्ती वाढावी यासाठी मूर्तीची स्थापना आणि प्रार्थना आपण करतो. मानवी मनाची वाटचाल प्रगल्भतेच्या दिशेने व्हावी हाच त्यामागचा हेतू असावा. मानवी मन उच्चतम मानवतेच्या दिशेने चालावे यासारखी विचारप्रवण करणारी सुंदर वाक्ये लेखात आपल्याला आढळतात. ते उत्सवाच्या गलबल्याला आरसा दाखवतात. मिरवणुकीतील गैरप्रकार उन्माद, दिखाव्याची स्पर्धा, भपकेबाज पूजा याबाबत कठोर शब्दात नाराजी व्यक्त करतात. खरी भक्ती ही साधेपणात आहे, ही जाणीव त्यांनी वाचकासमोर अत्यंत सोप्या पण प्रभावी भाषेत मांडली आहे.
‘आजच्या अर्जुनाचा अभ्यासयोग कोणता?’ या लेखात गीतेतील अर्जुन आजच्या विद्यार्थ्याच्या मनात उभा राहतो. “ मन अत्यंत चंचल आहे. त्याला नियंत्रणात ठेवणे महाकठीण बाब आहे.” हे वाक्य वाचताना आपल्यालाही आपल्या धडपडीचे आणि चंचलतेचे भान येते. लेखक सांगतात—“अभ्यास आणि वैराग्यात मनोग्रहाचे रहस्य आहे. यालाच अभ्यासयोग म्हणतात.” हा विचार म्हणजे दिशाहीन तरुणाईसाठी दीपस्तंभच आहे. गिरी सरांमधला चिंतनशील माणूस या ठिकाणी दिसतो. ते म्हणतात, " वर्तमान स्थितीत अभ्यासयोग विद्यार्थ्याला उमजला नाही; कारण तो गुरुलाही उमजला नाही. त्यासाठी आपल्यातील दोष, उणीवा यांची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. या ठिकाणी एका वक्त्याच्या भाषणातील एक सुंदर उदाहरण लेखकाने दिले आहे. वेरूळ अजिंठ्याच्या पाषाणात जे शिल्प तत्कालीन कारागिरांनी निर्माण केले, त्यात त्या पाषाणमूर्तींच्या चेहेऱ्यावर हास्य, आनंद, दुःख, क्रोध, असूया, प्रेम इ. भावभावना दाखवण्यात ते कलाकार यशस्वी झाले आहेत. जर पाषाणात या भावभावना ओतता येतात, तर सजीव अशा विद्यार्थ्यांच्या मनात आवश्यक असे विचार शिक्षकाला का रुजवता येणार नाहीत ? आजी आम्ही भौतिक सुखसुविधात अडकलो आहोत. आध्यात्मिक पातळीवर जाऊन समाधानाचा मार्ग आम्ही शोधतो का ? जगा आणि जगू द्या यासारखी तत्वे आम्ही आचरणात आणतो का ? यासारख्या मूलभूत तत्वांचा विचार या लेखात आपल्यापुढे सर मांडतात. आजच्या अर्जुनाला यशस्वी होण्यासाठी या तत्वांचा विचार करणे गरजेचे आहे.
‘क्रोधावर नियंत्रण’ या लेखात ते म्हणतात, " क्रोध हे दुधारी शस्त्र आहे.त्याचा उपयोग कसा करायचा हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते.नकारात्मक वृत्तीच्या लोकाांना क्रोध विनाशाकडे नेतो.सकारात्मकवृत्तीचे लोक आपला क्रोध संयमाने व्यक्त करतात. तर दुसऱ्या प्रकारचा क्रोध देशाभिमान रुजवतो, सत्कार्य करायला शिकवतो. आपली वृत्ती शांत, संयमी, समाधानी आणि आनंदी ठेवल्यास आपण तणावमुक्त जगू शकतो.
‘सद्गुणाने होते जीवन सुंदर’ हा लेख म्हणजे अंतःकरणातील आरसा. “आपले प्रत्येक कर्म आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढविते आणि घटविते सुद्धा.” या एका वाक्यात जीवनाचे सार सामावले आहे. सद्गुण म्हणजे बाहेरून लावलेला रंग नाही; तो व्यक्तिमत्त्वाच्या गाभ्यातून उमलणारा सुगंध आहे, हे लेखक जाणवून देतात. या लेखात ते म्हणतात, "सत्कार्यातील आनंदामागे अपार मेहनत आणि अविरत कष्ट असतात. ही माणसे त्यांच्या दैनंदिन जीवनात कमालीची प्रसन्न असतात.शुभ्र, स्वच्छ झऱ्यासारखे वाहत असतात. ही अवस्था ज्याला प्राप्त झाली त्याच्या अंतरंगात सत्याचा दीप तेवत असतो. तो आपली तो आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सत्याचा शोध घेत राहतो. त्याचे जीवन म्हणजे निखळ वास्तवतेची प्रयोगशाळा.
तर ‘युवाशक्तीच्या उत्साहाला दिशा हवी’ या लेखात लेखकाने तरुणाईला थेट प्रश्न केला आहे—“उत्साहाला विवेकाची दिशा मिळाली, तरच समाज परिवर्तन घडते.” ही ओळ तरुणांच्या हृदयात नवी उमेद, नवा संकल्प जागवणारी आहे.
‘जीवनात संयम का हवा?’ या लेखातील ते म्हणतात, " युवावस्थेत विचारांची दिशा हवी, म्हणजे जीवनाची दशा होणार नाही. " या लेखातील वाक्य " भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या संपत्तीला कष्टाचा सुगंध येत नाही " आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.
तर प्रगल्भ विचारांची मानवी संपत्ती या आपल्या लेखात गिरी सर म्हणतात, " युवाशक्ती ही देशाची मानवी संपत्ती आहे. हे आपल्या देशातील केंद्र व राज्य शासनालाही कळले पाहिजे. शिक्षणाकडे अनुत्पादक क्षेत्र म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शिक्षण क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे सोपवून त्याचे बाजारीकरण करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत भावी पिढीकडून भरीव कार्याची अपेक्षा कशी करणार ? या लेखातून लेखकाची तळमळ आणि शासनव्यवस्थेतील नाकर्तेपणाविषयीचा संताप तीव्र शब्दात व्यक्त झाला आहे.
आपल्या ' घे भरारी ' या लेखात ते म्हणतात, " मनुष्यदेह हे एक साधन आहे, त्याद्वारे आपण व्यापक व चिरंतन ठरणारी कार्यपूर्ती करणार आहोत. हे आपल्या स्मरणात राहील तर आपणास देहासक्ती ( शरीराचे आकर्षण ) राहणार नाही. आणि आपली अपेक्षित कार्यपूर्ती झाल्यावर देहाची किंमत काहीच नाही. " या लेखात युवकांसाठी मोलाचा संदेश लेखक देतात.
असे या पुस्तकातील एकूण ३१ लेख वाचकाला विचारप्रवण करतात. या पुस्तकाची एक मोठी ताकद म्हणजे त्याची शैली. लेखक वाचकाला प्रवचन देत नाहीत; ते त्याच्याशी संवाद साधतात. त्यांचे लिखाण म्हणजे एखाद्या हृदय संवादासारखे आहे. या संवादात कधी व्यंगाची धार आहे, कधी आत्मीयतेची ऊब आहे, तर कधी अनुभवाच्या गाभ्याला भिडणारी गंभीरता आहे. लेख वाचताना लेखकावर असणारा स्वामी विवेकानंद तसेच देशभक्तांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. आपले म्हणणे ते विविध उदाहरणे देऊन पटवून देतात.
“ ज्ञानाचा दीप जिथे लागतो तिथे अंधार नाहीसा होतो;
आणि जे शिक्षक हा दीप लावतात ते स्वतःच प्रकाशरूप होतात.”
मला वाटते हे पुस्तक सर्वांसाठी आणि विशेषतः आजच्या तरुणाईने वाचणे आवश्यक ठरते. आजच्या काळात जेव्हा आपण वेग, स्पर्धा, उपभोगवाद यांच्या भोवऱ्यात अडकलो आहोत, तेव्हा ‘ घे भरारी ’ हे पुस्तक आपल्याला शांत पण ठाम आवाजात सांगते,“थांब जरा… स्वतःकडे बघ… विचार कर…आणि जीवनाचे खरे ध्येय शोध.” त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच वाचक या पुस्तकाचेही मनापासून स्वागत करतील अशी खात्री आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा