उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८२
बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ।
विषा औषध घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ? ।।८२।।
अर्थ :
रामनामाची तुलना अन्य कोणत्याही नामाशी होऊ शकत नाही. परंतु जी माणसे पारमार्थिक दृष्ट्या अभागी असतात, त्यांना ( रामनामाचे हे महत्व ) कळत नाही. अहो, प्रत्यक्ष भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनाम हे औषध म्हणून घेतले. मग आपल्यासारख्या सामान्य जीवांची त्यासमोर किंमत काय ?
( तुळेना - तुलना होऊ शकत नाही, अभागी नर - पारमार्थिक दृष्टया दुर्दैवी व्यक्ती, पार्वतीशे - भगवान शंकर/ पार्वतीचे पती, किंकर - चाकर/दास )
या श्लोकामध्ये देखील अन्य श्लोकांप्रमाणे समर्थ रामनामाचे महत्व आपल्या मनावर ठसवत आहेत. श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. त्यामुळे साहजिकच त्यांना रामनामापुढे अन्य नामाचे महत्व वाटत नाही. रामनामाची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही असे त्यांना वाटते. आणि त्यांना असे वाटणे हे अगदी बरोबर आहे. रामरक्षेचा समारोप करताना बुधकौशिक ऋषींनी रामनामाचे महत्व सांगताना, " सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने " असे म्हणतात. अर्थात या श्लोकात भगवान शंकर पार्वतीला रामनामाचे महत्व सांगताना म्हणतात की राम राम या नामातच माझा जीव रमतो. रामनाम हे विष्णूच्या सहस्त्र नामांची बरोबरी करणारे आहे. खरे तर रामनामाचे महत्व स्पस्ट करणारे एवढे मोठे उदाहरण दिल्यानंतर अन्य काही सांगण्याची आवश्यकताच राहत नाही. पण तरीदेखील माता जशी तळमळीने आपल्या मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगते, तसेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.
आपली ज्या देवतेवर श्रद्धा असेल, त्या देवतेचे नाम हे अत्यंत श्रेष्ठ आहे असे आपल्याला वाटले पाहिजे. आपण जर शंकराची भक्ती करीत असू तर ' ओम नमः शिवाय ' या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. आपण जर विष्णूचे भक्त असू तर ' ओम नमो भगवते वासुदेवाय ' या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. तसेच रामनामाचे महत्व श्रीरामाच्या भक्तांना वाटले पाहिजे. ते सांगण्यासाठीच समर्थांची एवढी तळमळ !
पण समर्थ म्हणतात," जी माणसे पारमार्थिक दृष्टया अभागी असतात त्यांना रामनामाचे हे महत्व ( सांगूनही ) कळत नाही. म्हणूनही असे जीव अभागीच आहेत. मुखामध्ये रामनाम यायला किंवा त्याची गोडी वाटायला देखील काही तरी पूर्वसंचित हवे. मुखात रामनाम येणे किंवा रामनाम घ्यावेसे वाटणे हे खरोखरच भाग्याचे लक्षण आहे. ज्यांना तसे वाटत नाही ते जीव अभागी !
देवांनी आणि राक्षसांनी मिळून समुद्रमंथन केले. त्यातून दिव्य अशा चौदा रत्नांसोबतच हलाहल ( जहाल विष ) देखील बाहेर आले. त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या आणि सृष्टीच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न झाला. भगवान शंकरांनी हे हलाहल प्राशन करून सर्व सृष्टी आणि प्राणिमात्रांचे रक्षण केले. पण त्यांचा अंगाचा तीव्र दाह होऊ लागला. तो कशानेच शांत होईना. त्या हलाहलाने त्यांचा कंठ निळा झाला. ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. विषाचा दाह शांत होण्यासाठी त्यांनी शीतल चंद्र मस्तकी धारण केला. गंगेला देखील मस्तकी धारण केले. पण शेवटी रामनामानेच त्यांचा दाह शांत झाला.
जालीमातील जालीम विषाचा देखील ज्या औषधाने दाह शांत होतो, असे औषध म्हणजे रामनाम आहे. सर्व भव म्हणजे संसाराचे भय हरण करणारे, दुःख दूर करणारे असे हे औषध आहे. ज्याप्रमाणे श्रीरामाचा बाण अचूक शरसंधान करतो, तसे रामनाम म्हणजे रामबाण औषध आहे. आधुनिक विज्ञानाने देखील रामनामाचे महत्व मान्य केले आहे. आजचे मानसशास्त्र आणि न्यूरो सायन्स रामनाम हे प्रभावी साउंड थेरपी आणि ध्यान पद्धतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट करतात. तणावमुक्तीसाठी रामनाम ऊर्जा प्रदान करणारे असल्याचे ही आधुनिक शास्त्रे मान्य करतात.
प्रत्यक्ष भगवान शंकर जेव्हा रामनामाच्या आश्रय घेतात तेव्हा आपल्यासारख्या सामान्य नराची काय कथा ? संत तुलसीदासजी म्हणतात, " रामनाम में पावत पावन, रवी तेजोमय चंद्र सुधा धन." रामनाम हे पावन करणारे आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा तेज आणि चंद्राची शीतलता आपल्याला जीवन प्रदान करते, तसेच हे रामनाम सर्व सुख, परम शांती आणि ऊर्जा देणारे आहे.
स्वसंवाद
१. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनामाचा आश्रय घेतला, तसा मी माझ्या आयुष्यातील राग, मत्सर किंवा चिंतेचा दाह शांत करण्यासाठी नामस्मरणाचा आधार घेतो का?
२. "मुखामध्ये रामनाम येणे किंवा त्याची गोडी वाटणे हे भाग्याचे लक्षण आहे," हे लक्षात घेऊन मी माझ्या या परम भाग्याचा रोज सुयोग्य वापर करतो का?
३. माझ्या आराध्य दैवताच्या नामावर आणि मंत्रावर माझी संपूर्ण आणि अनन्य श्रद्धा आहे, की माझे मन अजूनही डळमळीत होत असते?
४. संत तुलसीदासांनी म्हटल्याप्रमाणे, रामनामातील सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता अनुभवण्यासाठी मी दिवसातून काही क्षण तरी शांत चित्ताने नाम घेतो का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा