उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७६
नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ।
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७६।।
अर्थ
आपल्या हातून कर्म, धर्म किंवा योग यातील एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही. माणूस पूर्णपणे भोगातही रमत नाही किंवा पूर्णपणे त्यागही त्याच्या हातून घडत नाही. अशा परिस्थितीत समर्थ म्हणतात नामावर विश्वास ठेवा. पहाटेच्या वेळी श्रीरामाचे चिंतन करा.
( त्याग -विरक्ती, सांग - यथासांग/व्यवस्थितपणे )
विवेचन
प्रभाते मनी राम चिंतीत जावा या श्लोकमालिकेतील हा शेवटचा श्लोक. या दहा श्लोकांच्या गटात समर्थांनी भगवंताच्या नामाचा महिमा निरनिराळ्या प्रकारे वर्णन केला आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट ' प्रभाते मनी राम चिंतीत जावा ' या ओळीने झाला आहे. या श्लोकांनी नामस्मरणाचे आणि प्रभात समयी श्रीरामाच्या चिंतनाचे महत्व आपल्या मनावर ठसवले आहे.
आपण प्रापंचिक माणसे. जसे जमेल तसे आपल्या वाट्याला आलेले कर्म करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु मतमतांच्या गलबल्यात आपण एवढे हरवून किंवा गोंधळून जातो की हाती आलेल्या कर्माला व्यवस्थितपणे न्याय देणे आपल्याला जमत नाही. धर्मपालनाच्या बाबतीतही असेच होते. धर्मपालनासाठीच्या विविध गोष्टी, विविध मार्ग ऐकून सामान्य माणूस गोधळतो. मग हे करू की ते करू अशी त्याची अवस्था होते. योगाचा किंवा ध्यानधारणेचा अभ्यास करणे त्याला शक्य होत नाही. थोडक्यात सांगायचे तर सामान्य माणसाची स्थिती एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे होते. लोकांची ही मानसिकता ओळखून त्यांची दिशाभूल करणारे बुवा बाबा त्यांचे उखळ मात्र पांढरे करून घेतात. समर्थांसारखे सद्गुरू लोकांना अशा प्रकारच्या गोंधळाच्या स्थितीतून बाहेर काढण्याचे अचूक कार्य करतात. लोकांना सन्मार्गाची दिशा दाखवतात.
समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस अशा गोंधळलेल्या स्थितीतच होता. तो कर्मकांडात अडकला होता. त्यामुळे ईश्वरप्राप्तीच्या खऱ्या मार्गापासून दूरच चालला होता. अशा वेळी समर्थ, संत तुकाराम आदी संतांनी लोकांना खरा धर्म काय आहे हे समजावून सांगितले. लोकांची परंपरा, अंधश्रद्धा आदींवर प्रहार करून त्यांना खरा ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवला. समर्थांनी नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे. त्यासाठी काही पैसा, वेगळा वेळ, शारीरिक श्रम या गोष्टी लागत नाहीत हे सांगितले.
कालमान बदलले आहे. पूर्वीप्रमाणे लोकांना योग, याग, तप करणे जमणार नाही हे ओळखून त्यांनी परमेश्वर प्राप्तीसाठी लोकांच्या हाती नामस्मरणाची गुरुकिल्ली दिली.आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचे जेवढया चांगल्या प्रकारे शक्य होईल तसे पालन करा, आपण जे काही धार्मिक विधी करतो, त्यात काही तरी अपूर्णता राहून जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण शेवटी म्हणतो, " आवाहनं न जानामी, न जानामी तव अर्चनं..." असे म्हणून परमेश्वराची क्षमा मागतो आणि काही अपूर्ण राहिले असेल ते पूर्ण करून घे अशी प्रार्थना करतो. म्हणूनच धर्म, योग, याग या गोष्टी पूर्णपणे जशाच्या तशा पालन करणे जमणार नाही हे समर्थ जाणतात. पण या सगळ्यात एकच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा असे त्यांचे सांगणे आहे. ती गोष्ट कोणती ? तर ते म्हणतात,"म्हणे दास विश्वास नामी धरावा." इतर गोष्टी जशा जमतील तशा करा. पण नामावर विश्वास ठेवून नामस्मरणाचा सोपा मार्ग अवलंबा असेच त्यांचे सांगणे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात, " एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी." तेव्हा सर्व संतांचे सांगणे एकच आहे. परमेश्वराचे नाम भक्तिभावाने घ्या. जणू तो समोर उभा आहे अशी कल्पना नाम घेताना करा. तुकाराम महाराज म्हणतात,"नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी । ऐसे धरोनिया ध्यान, मनी करावे चिंतन." तेव्हा अशा प्रकारे प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करा.
स्वसंवाद
१. विविध ग्रंथांचे मतमतांतर आणि संभ्रम यात अडकून न पडता, मी समर्थांनी सांगितलेल्या 'नामावरील विश्वासाची' गुरुकिल्ली स्वीकारायला तयार आहे का?
२. "आवाहनं न जानामी" म्हणताना माझ्या मनात माझ्या अपूर्णतेची जाणीव आणि भगवंताप्रती संपूर्ण शरणागती असते का?
३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मुखात नाम घेताना प्रत्यक्ष 'जगजेठी' (परमेश्वर) माझ्या समोर उभा आहे, अशी अनुभूती घेण्याचा मी कधी प्रयत्न करतो का?
४. या १० श्लोकांच्या मालिकेतून मी नेमके काय शिकलो? उद्यापासून माझ्या मनात 'राम चिंतनाची' नवी पहाट होईल का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२३/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा