उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७३
देहेदंडणेचे महा दुःख आहे ।
महादुःख ते नाम घेता न राहे ।
सदाशिव चिंतीतसे देव देवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७३।।
अर्थ
देहाला कष्ट दिल्याने मोठया यातना होतात. परंतु रामनाम घेतल्याने या यातना राहत नाहीत. प्रत्यक्ष भगवान शंकर देखील देवाधिदेव म्हणजेच श्रीरामाचे चिंतन करतात. अशा श्रीरामाचे प्रभात समयी आपण चिंतन करावे.
( देहेदंडणे - देहाला कष्ट/यातना देणे )
अनेक लोक परमेश्वर प्राप्तीसाठी उपासतापास, नवस, तीर्थयात्रा आदी गोष्टी करतात. या सगळ्या गोष्टींनी देहाला कष्ट होतात. त्याच्या यातना किंवा दुःख भयंकर असते. सर्वांनाच या गोष्टी शक्य होतील असेही नाही. नर्मदा परिक्रमा करणे अतिशय पुण्यप्रद मानले जाते. परंतु सर्वांनाच ते शक्य होईल अशातला भाग नाही. बद्रीनाथ, केदारनाथ ही अत्यंत पवित्र धामे आहेत. पण जर शारीरिक क्षमता नसेल तर त्यांची यात्रा करणे कठीण होते. देहाला त्रास देणारी होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तप:साधना करीत असत. त्यासाठी एकांतात जाऊन बारा बारा वर्षे तपश्चर्या करीत. कोणी एका पायावर उभे राहून तप करीत असे तर कोणी नदीच्या पाण्यात उभे राहून. असे अनेक प्रकार होते. या सगळ्या गोष्टींचा उद्देश देहाबद्दलची आसक्ती नाहीशी व्हावी आणि परमेश्वर प्राप्तीकडे मनाचा कल व्हावा असा असायचा. परंतु देहाला एवढे कष्ट देऊन सर्वांनाच परमेश्वर प्राप्ती होईल अशी शाश्वती नव्हती. शिवाय काही कारणाने तप करणे मध्येच थांबले तर सर्वच व्यर्थ जायचे.
परंतु नामसाधनेत असे कष्ट देहाला पडत नाहीत. नामसाधना सोपी आहे. तुकाराम महाराज देखील सांगतात,"नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची."मग एवढे सोपे साधन सोडून देहाला ताडन करणारी इतर साधने का अवलंबावीत ?
या संसारात देखील मानवी देहाला अनेक प्रकारचे कष्ट होतात. नानाविध त्रासांना सामोरे जावे लागते. प्रारब्धाने वाट्याला आलेले दुःख भोगावेच लागते. या सगळ्या गोष्टीत शरीराला प्रचंड त्रास होतो. आपण म्हणतो की कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही. हे खरेच आहे. प्रारब्धाने आलेले दुःख ज्याचे त्यालाच भोगावे लागते. पण सगळ्या परिस्थितीत रामनाम औषधाचे काम करते. देहाला वेदना होतील पण रामनामामुळे तो त्रास मनापर्यंत पोहोचत नाही. देहाच्या दुःखावर इतर औषधे तात्पुरती काम करतात पण रामनाम त्यावर मात करण्याची शक्ती देते. मात्र ते औषध नियमितपणे घोट घोट पोटात जायला हवे.
रामनामाचे इतके महत्व समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट सांगून, समजावूनही पटली नाही तर त्याला एखाद्या मोठया व्यक्तीचे उदाहरण देऊन समजवावे लागते. समर्थ म्हणतात," हे मना, अरे तुला किती आणि काय सांगू ? प्रत्यक्ष योगियांचा राणा असलेले भगवान शंकर देखील श्रीरामाचा जप करतात. त्याचेच चिंतन करतात. मग तुला करायला काय हरकत आहे ?" श्रीराम हे देवांचे देव आहेत. त्यांनीच देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवले आहे. आदी आणि अंत तेच आहेत. तेव्हा हे मना, प्रभात समयी रामाचे चिंतन कर.
स्वसंवाद
१. मी परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा समाधानासाठी केवळ बाह्य कष्टांचे (उपासतापास, कठीण व्रतवैकल्ये) अवडंबर माजवत आहे का?
२. जेव्हा शारीरिक किंवा मानसिक व्याधींमुळे माझ्या देहाला 'दुःख' होते, तेव्हा मी निराश होतो की रामनामरूपी औषधाचा आश्रय घेतो?
३. "कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही" हे त्रिकालाबाधित सत्य स्वीकारून, मी माझ्या मनाला नामस्मरणाने खंबीर बनवले आहे का?
४. जर प्रत्यक्ष भगवान शंकर (देवाधिदेव) निरंतर रामनामाचे चिंतन करतात, तर मग संसारी असलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२१/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा