मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ७२

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७२ 

न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही ।

मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ।

महा घोर संसार शत्रू जिणावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७२।।

अर्थ 

रामनाम घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागत नाहीत. मुखाने रामनाम घेताना काही कष्ट पडत नाहीत. या रामनामाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा संसाररूपी शत्रूवर मात करता येते. त्यासाठी प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे. 

( न वेचे - खर्च करावे लागत नाहीत, ग्रंथीचे - पदरचे, अर्थ - पैसा, घोर - कठीण, जिणावा - जिंकावा )

विवेचन 

माणसाची देहबुद्धी फार प्रबळ असते. देहासाठी आणि देहाच्या सुखासाठी जे जे लागेल, ते मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस असतो. सगळी ऐहिक सुखे उपभोगण्यासाठी पैशाची मोठी गरज असते. त्यामुळे माणूस पैशाला फार जपतो. प्रसंगी देहापेक्षाही पैशाला महत्व देणारी माणसे व्यवहारात पाहायला मिळतात. आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून ती पैसा मिळवण्याच्या मागे लागलेली असते. सामान्य माणूस स्वतःच्या मौजमजेसाठी हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार असतो पण दानधर्माची वेळ आली की हात आखडता घेतो. सर्वसामान्य माणसांची ही मानसिकता समर्थ उत्तम प्रकारे जाणून आहेत. म्हणून रामनाम घेण्याबद्दल ते सांगतात की यासाठी पदरचा एक पैसाही खर्च करावा लागत नाही. वरील ओळीचा अर्थ आणखी एका प्रकारे घेता येईल. ते म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी वेगवेगळे ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करतो. आपली पारमार्थिक बैठक तयार होण्यासाठी आवश्यक त्या ग्रंथांचे वाचन अवश्य करावे. पण तेवढे झाल्यानंतर अधिक ग्रंथ वाचण्यात वेळ न घालवता नामस्मरण करावे. नामस्मरणासाठी ग्रंथ वाचनाची आवश्यकता नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, "वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा..."नुसते पुस्तकी ज्ञान किंवा शब्दपांडित्य महत्त्वाचे नसून, भगवंताच्या नामाची अनुभूती घेणे आणि अंतःकरणात भक्ती बाळगणे हेच वेदांचे खरे सार आहे हेच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगायचे आहे. 

दुसरी गोष्ट अशी की हे रामनाम मुखाने घेण्यास कोणतेही कष्ट पडत नाही. इतर तपसाधनेत तरी देहाला कष्ट पडतात. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा वगैरे करायची म्हटले तरी देहाला कष्ट घ्यावेच लागतात. पदरचा पैसा खर्च करावा लागतो. पण रामनाम घेण्यासाठी यातील काहीही करावे लागत नाही. फक्त आपली इच्छा मात्र हवी. त्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याची आवश्यकता नाही. सर्व संतांनी आपापली कामे करताना मुखाने हरिनामाचा जप सुरु ठेवला होता. आपणही आपली नित्यकर्मे करताना वाचेने किंवा मनाने भगवंताचे नाम घेऊ शकतो. 

आपण सामान्य माणसे ! संसारात अडकलेलो असतो. बांधले गेलेलो असतो. पण हे बंधन दिसत नाही आणि कळतही नाही. आपले आयुष्य शेवटपर्यंत संसारासाठी धावाधाव करण्यातच जाते. शेवटी एक वेळ अशी येते की आपण हे सगळे कोणासाठी आणि कशासाठी केले असे वाटून पश्चाताप होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. संसार म्हणजे विवाहित माणसाचा पती, पत्नी, मुले, नातेवाईक असा साधारण अर्थ आपण घेतो. पण जो माणूस जन्माला आला तो या संसारात अडकला. मग तो विवाहित असो वा अविवाहित. एका संसार या शब्दाचा व्यापक अर्थ हे जग असाही आहे. जीवनाबद्दल एका हिंदी गीतात फार सुंदर ओळी आहेत. ' संसार हैं एक नदिया, दु:ख सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं ...'अशा या संसाररूपी नदीतून तरून जायचं असेल तर रामनामाशिवाय तरणोपाय नाही. 

संसार गोड वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो पण तो आपला मोठाच शत्रू आहे हे लक्षात येत नाही. ते लक्षात येते तेव्हा आयुष्याची किंमत आपण मोजलेली असते. एखाद्या गोष्टीचे माणसाला जेव्हा व्यसन लागते, तेव्हा ती गोष्ट त्याला अती प्रिय होते. मग ती वाईट आहे हे कळले तरी ती त्याला सोडवत नाही. तंबाखू, दारू इ. चे व्यसन लागलेल्यांची अशीच अवस्था होते.

समर्थ श्रीरामस्तुती करताना म्हणतात," संसारसंगे बहू शीणलों मी, कृपा करी रे रघुराज स्वामी." संसार हा आपला महाशत्रू आहे हे लक्षात घेऊन वागणाऱ्याला संसार बाधत नाही. तो संसारात असतो पण साक्षीभावाने प्रपंचाकडे पाहतो. हे सगळे प्रारब्धाचे खेळ आहेत हे तो जाणून असतो. सर्वसामान्यांना तो संसारात रमलेला दिसेलही पण त्याचे चित्त भगवंताकडे असते. आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करीत असतो. काहीवेळा सोबत असलेल्या सहप्रवाशांशी आपल्या छान गप्पा होतात. पण आपले स्टेशन आले की आपल्याला उतरावे लागणार हे आपण जाणून असतो. त्यामुळे त्या सहप्रवाशाना सोडून जाताना विशेष दुःख होत नाही. असेच आपण संसारातही असावे. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त असणाऱ्या कमलदलांप्रमाणे ! हे सगळे सांगणे सोपे पण आचरणे कठीण आहे. पण रामनाम घ्यायला तर सुरुवात करू या. तेव्हा हे मना, अधिक वेळ दवडू नकोस. प्रभात समयापासून भगवंताचे चिंतन कर असेच समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगू इच्छितात. 

स्वसंवाद 

१. ज्या ऐहिक सुखांसाठी आणि पैशासाठी मी रात्रं-दिवस देह झिजवतो, ते सुख मला कधी चिरंतन शांतता देऊ शकेल का?

२. नामस्मरणासाठी पैशांचा खर्च नाही आणि देहाला कष्टही नाहीत, तरीही मी ते टाळण्यासाठी वेळेचे किंवा थकव्याचे निमित्त शोधतो का? 

३. संसारातील नाती आणि कर्तव्यांमध्ये मी इतका गुरफटलो आहे का, की मला या सगळ्याकडे 'साक्षीभावाने' किंवा अलिप्तपणे पाहता येत नाहीये?

४. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे, मी संसारात राहूनही माझे चित्त भगवंतचरणी ठेवण्याचा प्रयत्न करतो का?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२०/५/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...