उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७७
करी काम नि:काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे ।
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।
हरिकीर्तनी वृत्तिविश्वास होता ।।७७।।
अर्थ
या राघवाच्या प्राप्तीची मनापासून कामना कर. सकल प्राणिमात्रांच्या ठायी असलेले त्याचे रूप स्वत:मध्येही पहा. त्याचे गुणगान करण्याचा छंद लागला की सारे भेद, द्वंद्व नाहिसे होतील.
( नि:काम -निष्काम होऊन/निरिच्छ वृत्तीने, निर्द्वंद्व - सुखदुःखाच्या पलीकडे जाणे /द्वैतभाव नष्ट होणे, हरिकीर्तन - परमेश्वराचे गुणगान करणे )
विवेचन
परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाने कसे वागावे ते समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. आपण सामान्य प्रापंचिक माणसे आहोत. आपल्या मनात निरनिराळ्या इच्छा, वासना वेळोवेळी उद्भवत असतात. जोपर्यंत वासना आहेत, तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना, ध्यान करतो ते सुद्धा मनात काहीतरी इच्छा ठेवूनच. त्यामुळे एक वेळ आपल्या त्या कामना पूर्ण होतील पण ईश्वर मात्र आपल्यापासून दूरच राहील. म्हणून इतर सर्व वासनांचा त्याग करून मला अन्य काही नको. फक्त परमेश्वर हवा आहे अशा अनन्य भावनेतून जर आपण त्याचे गुणगान केले तर त्याचा एक परिणाम असा होईल की हळूहळू आपल्या इतर वासना नाहीशा व्हायला लागतील. देहबुद्धी कमी होईल.
त्या गोष्टीचे मात्र आपल्याला सतत ध्यान लागले पाहिजे. त्याचा छंद किंवा वेड लागले पाहिजे. असे झाले म्हणजे आपल्या अंतर्यामी असणारा ईश्वर हळूहळू या विश्वात सर्वत्र विद्यमान आहे याची जाणीव होईल. तो जसा माझ्यात आहे तसाच सर्व प्राणीमात्रात देखील आहे याची जाणीव दृढ होत जाईल. तो केवळ सजीवात नसून निर्जीवात किंवा सृष्टीच्या कणाकणात त्याचे अस्तित्व आहे हे जाणवेल. भक्त प्रल्हादाचे उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू देवांना आपला शत्रू समजत होता. पण अशा या असुराचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला विचारले," कुठे आहे तुझा ईश्वर ?" तेव्हा त्याने सांगितले की तो या सर्व चराचरात भरून राहिला आहे. मग हिरण्यकश्यपूने विचारले की या निर्जीव अशा खांबात देखील तो आहे का ? तेव्हा प्रल्हादाने होय उत्तर दिले. नंतर त्याच स्तंभातून परमेश्वराने नरसिंह रूप धारण करून दुराचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला.
पैठणच्या ब्रह्मवृंदासमोर ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे रेड्याच्या मुखातून वेद वदवून सिद्ध केले. संत एकनाथांनी तृषार्त अशा गाढवाला गंगेचे पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला आणि सर्वांचा आत्मा एकच आहे याचा प्रत्यय लोकांना आणून दिला. भगवंताच्या भक्तीने या सगळ्या संतांच्या मनातील द्वंद्व नाहीसे झाले होते.
त्याप्रमाणे हरिनामाचे गुणगान केले की आपल्याही जाणिवा हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतात. मनातील द्वंद्व नाहीसे होते. या जगामध्ये विविध रंग आणि रूपात तोच नटलेला आहे याचा साक्षात्कार होतो. जसे वेगवेगळ्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी त्या भांड्याच्या आकारात राहते. पण पाणी एकच असते. सोन्याचे दागिने विविध प्रकारचे आणि आकाराचे असतात. पण त्यातील सोने एकच असते. त्याप्रमाणेच या विश्वात परमेश्वरच सगळीकडे भरून राहिला आहे ही जाणीव दृढ होत जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, " हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणचि जाहला." अशी साधकाची अवस्था होते. म्हणून आपण निर्वासन होऊन फक्त एका परमेश्वराचीच वासना धरावी असे समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद
१. माझी आजची भक्ती किंवा प्रार्थना ही देवाला काहीतरी 'मागण्यासाठी' (सकाम) आहे, की मी केवळ त्याच्या 'स्वरूपासाठी' (निष्काम) त्याची आराधना करतोय?
२. संतांनी गाढवात किंवा खांबातही देव पाहिला; मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये तोच ईश्वरी अंश पाहू शकतो का?
३. माझ्या मनातील 'आपले-परके', 'चांगले-वाईट' हे द्वंद्व किंवा भेद नष्ट व्हावेत म्हणून माझ्या ठायी रामनामाचा 'वृत्तीविश्वास' दृढ झाला आहे का?
४. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे "हे विश्वचि माझे घर" ही भावना माझ्या मनात रुजण्यासाठी मी माझ्या संकुचित विचारांचा 'छेद' (त्याग) करायला तयार आहे का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२४/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा