उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८१
मना मच्छरे नाम सांडू नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ।
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळिता ही न साहे ।।८१।।
अर्थ
हे मना, कोणत्याही प्रकारच्या मत्सराच्या आहारी जाऊन देवाचे नामस्मरण कधीही सोडू नकोस. इतरांचा हेवा करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी, अत्यंत आदराने व निष्ठेने भगवंताच्या नामाचा अखंड ध्यास घे. देवाचे नामस्मरण हेच सर्व श्रेष्ठ साधन आहे. त्याची तुलना अन्य कशाशीही करवत नाही.
( मच्छरे - मत्सराने, सांडू नको - सोडू नको, निजध्यास - मनाला ध्यास/ओढा लागणे, समस्तांमधे - ईश्वरप्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये, दुजी -दुसरी, तूळिता - तुलना करता )
विवेचन
या श्लोकातही समर्थ नामाचा महिमा आपल्याला सांगतात. आधीच्या श्लोकात निर्धारपूर्वक ज्या मत्सराचा त्याग करायला समर्थांनी आपल्याला सांगितले, त्याचा उल्लेख या ठिकाणी पुन्हा येतो. मानवी स्वभाव असा आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही पण दुसऱ्याकडे आहे असे पाहिल्यावर त्या व्यक्तीबद्दल पहिली प्रतिक्रिया मनात येते ती म्हणजे मत्सर. हा मत्सर वाढत गेला की अनर्थ घडतो. नको त्या गोष्टी माणसाच्या हातून घडतात. गीतेत सांगितल्याप्रमाणे ' मत्सर ' हा आसुरी गुण आहे. मागील काही श्लोकात हिरण्यकश्यपूचे उदाहरण आपण पाहिले आहे. हिरण्यकश्यपू राजा होता, सामर्थ्यवान होता, स्वतःच्या शक्तीचा त्याला गर्व होता, इथपर्यंत सर्व ठीक आहे. पण जेव्हा लोक त्याची स्तुती करायची सोडून परमेश्वराची स्तुती करतात, तेव्हा मात्र त्याच्या मनात भगवंताच्या नामाविषयी मत्सर निर्माण होतो. मग प्रजेने आपलेच नाम घ्यावे, भगवंताचे नाम कोणी घेऊ नये असा आदेश तो काढतो. पण त्याचा स्वतःचा मुलगाच विष्णुभक्त असतो. शेवटी मत्सर आणि द्वेषामुळे हिरण्यकश्यपूचा नाश होतो हे आपल्याला माहिती आहे.
काही लोकांना नकळत नामाबद्दलही द्वेष असतो. नामाने असे काय होणार आहे ? त्याला कशाला एवढे महत्व द्यायचे ? मग नकळत नामाबद्दल मनात मत्सर निर्माण होतो. नाम घ्यायला सुरुवात केली असेल तरी मग असा मनुष्य नाम घेणे सोडून देतो. म्हणून समर्थ म्हणतात की बाबारे, मत्सराच्या अधीन होऊन नाम घेणे सोडू नकोस.
मत्सराच्या अधीन झालेल्या माणसाला नामाचे महत्वच कळलेले नसते. महत्व कळण्यासाठी नामाचे सामर्थ्य माहित असावे लागते. त्यासाठी संतांचा उपदेश मनापासून ऐकावा लागतो. तो उपदेश नुसता ऐकून चालत नाही तर तो पटला पाहिजे. इथे बळजबरी उपयोगाची नसते. हे महती जेव्हा पटते, तेव्हा भगवंताबद्दल, नामाबद्दल आदर निर्माण होतो. म्हणून भगवंताचे नाम आदरपूर्वक घेतले पाहिजे. त्यात प्रेम हवे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा ध्यास लागला पाहिजे. आपल्या आवडीची एखादी गोष्ट असते. मग तिचा आपल्याला ध्यास म्हणजेच छंद लागतो. हा छंद लागला म्हणजे मन पुन्हापुन्हा तिकडे ओढ घेते. कोणी सांगावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, " गोविंद गोविंद, मना लागलिया छंद." एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाची आवड निर्माण झाली की त्याला कोणी अभ्यास कर म्हणून सांगावे लागत नाही. साधकाला नामाची गोडी लागली की मग नाम घ्या असे त्याला सांगावे लागत नाही.
परमेश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत. अनेक मार्ग आहेत. पण त्या सर्वांमध्ये ' नाम ' हे साधन श्रेष्ठ आहे. त्यासाठी कोणतीही उपाधी, कोणतेही साधन लागत नाही. जपमाळ नसली तरी चालते. आपले काम करताना देखील नाम जपता येते. ' हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद असे ते सांगतात ते याचसाठी. समर्थही आपल्याला हीच गोष्ट सांगतात. संतांच्या उपदेशात एकवाक्यता असते. लोककल्याणाची तळमळ आढळते. शब्द भलेही वेगळे असतील पण तात्पर्य एकच असते.
तेव्हा हे मना, कोणत्याही परिस्थितीत तू नाम घेणे सोडू नकोस. ते अत्यंत आदरपूर्वक घे. समस्त साधनांमध्ये ते सारभूत आहे. त्याची महती एवढी की त्याची तुलना अन्य कशाशीही होऊ नाही. ' नामपरते तत्व नाही रे अन्यथा.' हे लक्षात ठेव.
स्वसंवाद
१. माझ्याकडे जे नाही आणि इतरांकडे आहे, ते पाहून माझ्या मनात नकळत 'मत्सर' किंवा हेवा निर्माण होतो का? त्यामुळे माझे मनस्वास्थ्य हरवते का ?
२. संतांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनाला संसार किंवा इतर भौतिक गोष्टींऐवजी कधी भगवंताच्या नामाचा 'निजध्यास' (छंद) लागला आहे का ?
३. नाम घेताना भगवंताबद्दल आदर आणि प्रेम माझ्या मनात असते का ?
४. माउलींनी सांगितल्याप्रमाणे "नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा" यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे का ? की माझे मन अजूनही इतर साधनांच्या गराड्यात फिरत असते ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२७/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा