मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ७९

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७९

मना पावना भावना राघवाची ।

धरी अंतरी सोडी चिंता भवाची ।

भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।

नसे वस्तूची धारणा वेर्थ गेली ।

अर्थ 

हे मना श्रीरामांचे स्मरण पवित्र करणारे आहे. त्यांचे स्मरण कायम आपल्या अंतरात म्हणजे म्हणजे मनामध्ये ठेव. संसाराची चिंता सोडून दे. या संसाररूपी मायेची भूल मानवाला पडते. जी गोष्ट अस्तित्वातच नाही, अशा गोष्टीची कास धरणे व्यर्थ आहे. 

( पावना - पवित्र, भावना- विश्वास/स्मरण, धरी - धारण कर, भवाची - संसाराची, भूलि - भ्रम, वेर्थ - व्यर्थ )

आधीच्या श्लोकात आपल्याला समर्थांनी देह, संसाराची व्यर्थ चिंता वाहू नका असे सांगितले. या श्लोकात ते आपल्याला हा संसार कसा नश्वर आहे ते सांगत आहेत. आपल्या मनामध्ये नेहमीच या संसाराबद्दल एक आंतरिक ओढ किंवा ममत्व असते. शिक्षण, नोकरी, विवाह, मुलेबाळे, पैसा, जमीनजुमला यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे आपल्याला वाटते. माणूस आयुष्यभर त्यासाठी धडपडत राहतो. परंतु या संसाराची व्यर्थता त्याला शेवटी लक्षात येते. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. 

राघवाचे स्मरण, त्याच्यावरील दृढ श्रद्धा मनाला पवित्र करणारी आहे. कारण तो पतितांना पावन करणारा आहे. आपल्या अंतरात अनेक बऱ्या वाईट भावना, वासना ठाण मांडून असतात. परंतु भगवंताच्या नामाने वासना शुद्ध होत जाते. म्हणूनच समर्थ म्हणतात की हे मना पवित्र करणाऱ्या राघवाची श्रद्धा अंतर्यामी बाळग. त्यासाठी ' धरी अंतरी ' हे शब्द समर्थांनी वापरले आहेत. अंतर्यामी काय धारण करायचे ? तर राघवाचा विश्वास. आणि काय सोडायचे ? तर ' चिंता भवाची ' आपण संसारात असताना एवढे त्यात गुंतलेले असतो, की पुढे माझे कसे होईल, म्हातारपणी मुले मला विचारतील ना ? एक ना दोन अशा अनंत चिंता मन करीत  राहते. संसाराची व्यर्थ चिंता करून उपयोग नाही. म्हणूनच ही चिंता टाकून द्यावी असे समर्थ सांगतात. 

ही चिंता का टाकून द्यायची ? कारण जी गोष्ट मुळात नाहीच आहे, तिच्याबद्दल चिंता करून काय उपयोग ? मोहमायेमुळे हा संसार आपल्याला खरा वाटतो. त्याची भूल आपल्याला पडते. पण खऱ्या सत्यापासून आपण लांब जातो. वाळवंटातील तहानलेल्या माणसाला मृगजळ दृष्टीस पडते. तिथे आपल्याला नक्कीच पाणी मिळेल या आशेने तो त्याच्या शोधात पुढे पुढे जात राहतो. शेवटी त्याला लक्षात येते की आपल्याला जे पाणी वाटले होते, ते तर केवळ मृगजळ ! मृगजळ म्हणजे भ्रम. पाणी नाही हे सत्य. त्याप्रमाणेच हा संसार ! खरा वाटतो पण अखेरीस त्याची व्यर्थता लक्षात येते. खरी वस्तू एकच. ती म्हणजे भगवंताचे नाम. ते नाम पवित्र करणारे आहे. सत्याची जाणीव करून देणारे आहे. संसाराची व्यर्थता लक्षात आणून देणारे आहे. म्हणून हे मना, असे पवित्र नाम तू हृदयात धारण कर आणि संसाराची व्यर्थ चिंता सोडून दे. जी गोष्ट मुळात नाहीच तिची चिंता करण्यात काय अर्थ ?

 तुकाराम महाराज म्हणतात,"हेचि थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची." भक्ती करणे म्हणजे जी गोष्ट आपल्याला अत्यंत प्रिय असते, ती परमेश्वराला अर्पण करावी. संसार, मुलेबाळे या गोष्टी आपल्या अत्यंत प्रिय असतात. त्यांच्यावर आपले जीवापाड प्रेम असते. हेच प्रेम भगवंताला अर्पण करावे. आणि भगवंताचे प्रेम अंतर्यामी धारण करावे. 

स्वसंवाद 

१. ज्या शिक्षण, नोकरी, संपत्ती किंवा नात्यांना मी माझ्या 'जीवनाचे सार्थक' मानून बसलो आहे, ते खरंच चिरंतन सत्य आहे की केवळ एक तात्पुरता भ्रम (मृगजळ) आहे? 

२. "म्हातारपणी माझे कसे होईल? मुले मला सांभाळतील ना?" अशा भविष्यातील 'भवाच्या' (संसाराच्या) व्यर्थ चिंतांमध्ये मी माझा आजचा दिवस आणि मनाची शांतता गमावत आहे का? 

३. माझ्या अंतर्मनात साचलेला बऱ्या-वाईट वासनांचा कचरा साफ करण्यासाठी मी 'पतितांना पावन करणाऱ्या' राघवाच्या नामाचा आश्रय किती वेळा घेतो? 

४. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी प्रपंचातील माझी सर्व आसक्ती आणि प्रेम भगवंताच्या चरणी अर्पण करून 'निर्वासन' भक्तीचा अनुभव घ्यायला तयार आहे का?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२५/५/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...