उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७४
बहुतांपरी संकटे साधनाची ।
व्रते दान उद्यापने ते धनाची ।
दिनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७४।।
अर्थ
परमेश्वर प्राप्तीच्या साधनांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. व्रते, दानधर्म, उद्यापन करणे या गोष्टींसाठी गाठीशी पैसा लागतो. परंतु दिनांसाठी दयाळू असणाऱ्या भगवंताला आठवण्यासाठी यापैकी कशाची जरुरी नाही. म्हणून अशा या भगवंताचे पहाटेच्या सुमारास चिंतन करावे.
( बहुतांपरी - अनेक प्रकारचे, साधनांची - ईश्वर प्राप्तीच्या विविध मार्गांची, उद्यापन - एखाद्या व्रताच्या अखेरीस केलेला धार्मिक विधी )
विवेचन
ईश्वरप्राप्तीचे अनेकविध मार्ग आहेत. त्यासाठी कोणी व्रतवैकल्ये करतो, कोणी एखादे अनुष्ठान करतो, तर कोणी दानधर्माचा मार्ग अनुसरतो. आपण कोणता मार्ग निवडायचा याचे स्वातंत्र्य अर्थातच साधकाला असते. तरी समर्थ या मार्गातील धोके आणि अडचणी आपल्या निदर्शनास आणून देतात. या सगळ्या गोष्टींसाठी धनाची जरुरी असते. व्रत करायचे म्हटले तर काही तरी नियम आलाच. त्यानुसार शरीराला पडणारे कष्टही आले. शिवाय व्रताचे काही नियम असतात. त्यांचे व्यवस्थित पालन झाले पाहिजे. व्रत व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर त्याची विधिपूर्वक सांगता करावी लागते. त्यासाठी पुरोहितांना बोलावून धार्मिक विधी, दानधर्म, दक्षिणा आदी गोष्टी कराव्या लागतात.
व्रत, दानधर्म आणि उद्यापने या गोष्टी करायच्या तर पैशाची व्यवस्था आधी करावी लागते. बरे, या सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठीचे बाह्य मार्ग झाले. हे सगळे करीत असताना माणूस यातच गुंतून पडतो. परमेश्वर प्राप्तीसाठी अंतर्मुख होण्याची आवश्यकता असते. तो आपल्या अंतर्यामीच वसलेला असतो. सगळे लोक व्रतवैकल्ये, उद्यापन सोहळे,दानधर्म आदी गोष्टी समारंभपूर्वक करतात म्हणून आपल्यालाही असे करायलाच हवे नाहीतर लोक काय म्हणतील अशी भीती सामान्य माणसाच्या मनात असते. बऱ्याच वेळा मग इतरांना दाखवण्यासाठी देखील असे विधी मोठे समारंभपूर्वक करावे लागतात. यात आर्थिक आणि मानसिक कुतरओढ होते ती सर्वसामान्य माणसाची. त्याचा गोंधळ होतो. नेमके काय करावे ते कळत नाही. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पण परमेश्वर यापैकी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून करत नाही.
समर्थांसारख्या संतांना या गोष्टीची अचूक जाणीव असते. समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस जपतप, अनुष्ठान, व्रते, उद्यापने यासारख्या कर्मकांडात अडकून पडला होता. तो बहिर्मुख झाला होता. त्याला अंतर्मुख करणे आवश्यक होते. समर्थांसारखे सद्गुरू लोककल्याणाचा कळवळा असल्यानेच नामस्मरणासारखा सोपा मार्ग सांगत आहेत. परमेश्वर हा अत्यंत दयाळू आहे. त्याची दीन होऊन म्हणजेच आर्ततेने भक्ती केली, तर तो आपल्या दासांवर कृपा करतो. ' नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ' असे समर्थांनी सांगितलेच आहे. आपणही तो मार्ग अनुसरावा. दीनांचा दयाळू असलेल्या भगवंताला मनी आठवावे. त्याचे रूपगुण अंतरी साठवावे. अशा या भगवंताचे प्रभात समयी चिंतन करावे. संत एकनाथ महाराज म्हणतात," आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे."
स्वसंवाद
१. मी करत असलेल्या धार्मिक गोष्टी (व्रतवैकल्ये किंवा पूजा) केवळ 'इतरांना दाखवण्यासाठी' किंवा एक सामाजिक प्रथा म्हणून करत आहे का?
२. भगवंत माझ्या अंतर्यामीच आहे हे ठाऊक असूनही, मी त्याला शोधण्यासाठी बाह्य कर्मकांडात आणि सण-समारंभांच्या अवडंबरातच गुंतून पडलो आहे का?
३. जेव्हा माझ्याकडे आर्थिक मर्यादा असतात, तेव्हा मी देवाचा कोप होईल या भीतीने व्याकुळ होतो, की "तो दीनांचा दयाळू आहे" या भावनेने त्याला आर्ततेने साद घालतो?
४. संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मी सर्व चिंता त्या लक्ष्मीपतीवर सोडून देऊन कधी 'आवडीने आणि भक्तीभावाने' केवळ नामस्मरण केले आहे का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२२/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा