उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७०
सदा रामनामे वदा पूर्णकामे ।
कदा बाधिजेनापदा नित्यनेमे ।
मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७०।।
अर्थ
अगदी मनापासून रामनाम घ्यावे. नित्यनेमाने नाम घेणाऱ्यास संकटांचा त्रास होत नाही. अहंकार आणि आळस या दुर्गुणांचा त्याग करावा. आणि प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.
( वदा - म्हणा, पूर्णकामे - अगदी मनापासून, बाधणे - त्रास होणे, आपदा - संकट, मद - अहंकार, आलस्य - आळस )
विवेचन
या श्लोकात भगवंताचे नाम अगदी मनापासून घ्यावे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी ' पूर्णकामे ' हा सुंदर शब्द वापरला आहे. व्यवहारात कोणतीही गोष्ट आपण केली तर आपल्याला तिचे काय फळ मिळेल याकडे आपले लक्ष असते. फळाची अपेक्षा ठेवूनच आपण कर्म करीत असतो. पण जेव्हा रामनाम किंवा भगवंताचे नाम आपण घेतो तेव्हा त्यापासून आपल्याला काय फळ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. नाम फक्त नामासाठीच किंवा भगवंतासाठीच घ्यावे. असे नाम जेव्हा आपण घेऊ त्यावेळी इतर सर्व अपेक्षा आपोआपच नाहीशा होतील. ते नाम मग मनापासून घेतले जाईल म्हणजेच समर्थ सांगतात तसे ' पूर्णकामे.'
तसेच समर्थ म्हणतात की नित्यनेमाने नाम घेणाऱ्याला संकटे त्रास देत नाहीत. नित्यनेमामुळे संकटे येत नाहीत असे नाही, तर संकटातही मनाचा समतोल राखण्याची आणि त्या आपदा सोसण्याची शक्ती रामनामामुळे मिळते असा याचा अर्थ आहे. संकटांची धाव देहापर्यंतच असते परंतु अखंड नामस्मरण करणाऱ्याला त्यांचा त्रास होत नाही.
परंतु असे अगदी मनापासून नाम घेण्याच्या आड दोन मोठया अडचणी उभ्या राहतात. एक म्हणजे आपला अहंकार. मी कशाला नाम घेऊ ? मला त्याची काय आवश्यकता ? नाम घेणे हे रिकामटेकड्या लोकांचे काम आहे. त्याशिवाय नुसते नाम घेऊन काय होणार ? त्याच्या जोडीला ज्ञान नको का ? असे नानाविध विचार मनात येऊन माणूस नाम घेण्याच्या विचारापासून परावृत्त होतो. पण इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सगळ्याच संतांनी नामस्मरणाचा महिमा वर्णन केला आहे. भगवंत प्राप्तीसाठी नामसारखे सोपे साधन नाही असे ते म्हणतात. गोंदवलेकर महाराजांनी तर आपल्या प्रत्येक प्रवचनात निरनिराळ्या प्रकारे केवळ नाम घेण्याचा उपदेश केला आहे.
नाम घेण्याच्या आड येणारी दुसरी गोष्ट म्हणजे आळस. आळसाने मोठमोठी कार्ये नासतात. चौऱ्यांशी लक्ष योनींचा प्रवास करून आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो असे म्हटले जाते. मनुष्य प्राण्यांखेरीज इतरांना विचार करण्याची शक्ती परमेश्वराने दिलेली नाही. या नरदेहाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घेतल्याशिवाय पर्याय नाही. मूळ स्वरूप म्हणजेच भगवंताचे ज्ञान. आपली नित्यकर्मे करता करता आपण सहज भगवंताचे नाम घेऊ शकतो. परंतु प्रत्येक वेळी आपला आळस आपल्याला या गोष्टीपासून प्रतिबंध करतो आणि नामस्मरण करायचे तर निवृत्तीनंतर करू. आताच काय घाई आहे अशा प्रकारचा सोयीस्कर विचार आपण करत असतो. पण तो बालपण खेळात जाते, तरुणपण धुंदीत निघून जाते. मग म्हातारपणी काही करू म्हटले तर शरीर साथ देत नाही. म्हणूनच समर्थ आपल्याला एका अभंगात सांगतात,"काळ जातो क्षणाक्षणा, मूळ येईल मरणा..." म्हणून जोवर शरीर साथ देते आहे तोवरच परमेश्वराचे नामस्मरण नित्यनेमाने करावे असे समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद
१. मी करत असलेल्या उपासनेच्या किंवा चांगल्या कामाच्या मागे काही 'भौतिक फळाची अपेक्षा' असते का? की मी ते निरपेक्ष भावनेने करतो?
२. "नामस्मरण ही केवळ निवृत्तीनंतर करण्याची गोष्ट आहे" असा सोयीस्कर विचार करून मी आजचा वेळ 'आळसात' घालवत आहे का?
३. माझ्या ज्ञानाचा, पदाचा किंवा संपत्तीचा 'अहंकार' मला भगवंताच्या चरणी लीन होण्यापासून रोखत आहे का?
४. काळाचा प्रत्येक क्षण वेगाने पुढे जात असताना, मी माझ्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी दिवसातील काही वेळ नित्यनेमाने नामस्मरणाला देतो का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१९/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा