मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ६९

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६९

सुखानंदकारी निवारी भयाते ।

जगीं भक्तिभावे भजावे तयाते ।

विवेके तजावा अनाचार हेवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६९।।

अर्थ 

भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आणि भयाचे निवारण करणारा आहे. त्याला भक्तिभावाने आराधना करावी. विवेकाच्या साहाय्याने अनाचार म्हणजे अनीतीने वागणे आणि इतरांचा हेवा किंवा द्वेष यांचा त्याग करावा. प्रभात समयी श्रीरामाचे ( भगवंताचे ) चिंतन करावे. 

( सुखानंदकारी - सुख आणि आनंद देणारा, तजावा - सोडून द्यावा, अनाचार -अनीतीचे वागणे )

विवेचन 

भगवंताचे गुण वर्णन करताना समर्थ म्हणतात की भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आहे. सुख आणि आनंद हे शब्द आपण सामान्यपणे समानार्थी समजतो पण त्यात फरक आहे. सुख हे क्षणिक असून इंद्रिये आणि भौतिक गोष्टींवर अवलंबून असते. माणूस आयुष्यभर या सुखाच्या मागे धावत असतो. आनंद ही एक वृत्ती किंवा मानसिक अवस्था असून ती दीर्घकाळ टिकणारी आहे. ती परिस्थितीवर अवलंबून नसते. जो स्वस्वरुपी स्थिर असतो, त्याच्याकडे कायमच आनंदी वृत्ती असते. भगवंत या दोन्हींचा दाता आहे. तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. दुःख हरण केल्यानंतर उरतो तो आनंद आणि सुख. 

भगवंत हा भयाचे देखील हरण करतो. माणसाला या ना त्या कारणाने आयुष्यभर कुठल्यातरी भयाने पछाडलेले असते. माझा पैसा टिकेल का, मुलेबाळे मला म्हातारपणी विचारतील का ? एक ना दोन अशा अनेक चिंतांनी मनुष्य ग्रस्त असतो. पण सर्वात मोठे भय असते ते मरणाचे. भगवंत या भीतीतून देखील आपली मुक्तता करतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका झाली तर मृत्यूचे देखील भय नाहीच !

पण या सुखानंदकारी अशा भगवंताच्या कृपेचा अनुभव यायचा असेल तर त्यासाठी कोणती अट आहे ? ती समर्थ पुढील ओळीत सांगतात. ते म्हणतात,"जगी भक्तिभावे भजावे तयाते." अत्यंत भक्तिभाव आपल्या ठायी असला पाहिजे. त्यासाठी मनाने आपण त्याचे होऊन जावे. आपले सर्वस्व त्याला अर्पण करावे. भगवंत माझा आहे आणि मी भगवंताचा आहे अशी दृढ भावना आपल्या ठायी असली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात 

नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मतारीची ।

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ।।

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी भगवंत आळवावा ।

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।।

भगवंत प्राप्तीसाठी वनात जाण्याची जरुरी नाही. कोणतेही कष्ट, उपासतापास करण्याची गरज नाही. आपण आहोत तेथेच त्याचे नामस्मरण करावे. मनाने त्याचेच होऊन राहावे. 

पण भगवंत प्राप्तीसाठी निर्मळ, शुद्ध अंतःकरणाची गरज असते. जी माणसे अनाचाराने म्हणजे अनीतीने वागतात, दुसऱ्यांचा द्वेष किंवा मत्सर करतात, अशांना भगवंत कसा प्राप्त होईल ? स्वच्छ पाण्यातच प्रतिबिंब दिसते. तसेच मनही शुद्ध, स्वच्छ हवे. अनीती, मत्सर, हेवेदावे हा मनातील गाळ आहे. तो काढून टाकायला हवा. अनीती आणि अनाचाराने वागणारी माणसे कितीही शक्तिमान आणि बलवान असली तरी शेवटी त्यांचा नाश अटळ असतो. रावण दुराचारी होता. शक्तिमान आणि विद्वान होता. पण त्याचा नाश झाला. तो स्वतः, त्याची मुले यांचा नाश झाला. अनीतीने वागणारे कौरव युद्धात मारले गेले आणि त्यांचे राज्यही नष्ट झाले. आपण जसे वागतो, तेच कर्माच्या सिद्धांतानुसार आपल्याकडे परत येते. हेवा किंवा मत्सर केल्याने दुसऱ्याचे फारसे नुकसान होणार नाही. पण हे दोष आपल्यालाच आतून संपवतात. द्वेष केला तर द्वेषच वाट्याला येईल. प्रेम दिले तर प्रेम परत मिळेल. म्हणून अनीतीने वागणे, दुसऱ्यांचा द्वेष करणे यासारख्या गोष्टींचा त्याग करायला हवा. 

या गोष्टी परमार्थातील अडथळा आहेत. त्यांचा त्याग विवेकाने म्हणजे विचारपूर्वक करावा. मला इतरांनी माझ्याशी जसे वागायला हवे असे वाटते, तसेच मी इतरांशी वागायला हवे. मला कोणी खोटे बोललेले आवडत नाही, कोणी माझा द्वेष केला तर मला आवडत नाही. मग मीही इतरांशी तसेच वागायला हवे, नाही का ?  मागील एका  मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात," विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ती कीजे." असा विचारपूर्वक मनाला बोध करून, संयम, विवेक आणि वैराग्य यांची कास धरून वाटचाल केली तर भगवंत दूर नाही. त्यासाठी पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि पुढेही दिवसभर आपली कामे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. 

स्वसंवाद 

१. मी  क्षणिक 'सुख' शोधतो की चिरंतन 'आनंद' ? 

२. माझ्याकडून नकळत का होईना पण कोणाचा 'हेवा' (मत्सर) किंवा द्वेष घडतो का? 

 ३. "इतरांनी माझ्याशी जसे वागावे असे मला वाटते, तसेच मी इतरांशी वागतो का?"

४. पहाटे उठल्यानंतर मी प्रथम श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन करतो का ?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१८/५/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...