मुख्य सामग्रीवर वगळा

माझ्या कल्पनेच्या भराऱ्या

 उगवतीचे रंग

माझ्या कल्पनेच्या भराऱ्या 

'वऱ्हाड निघालं लंडनला' मध्ये बाप्पा काशिनाथला एकदा चिडून म्हणतो, "असं काही बी बोलत जाऊ नको, काशिनाथ. आमच्या टकुऱ्यात काही बी येतं ना !" असं कधी कधी आमच्या बी टकुऱ्यात काही येतं. आता इथं बाप्पा नाही, नाहीतर त्याचे बोलणे ऐकावे लागले असते. त्यामुळे बोलायला काही हरकत नाही. फार तर तुम्ही हसाल, नावं ठेवाल ! पण जाऊ द्या. जे मनात येतं ते माणसानं सांगून मोकळं व्हावं.

एकदा झालं असं की आम्ही एका पेशंटला भेटण्यासाठी एका हॉस्पिटलात गेलो होतो बरं का ! असे उन्हाळ्याचेच दिवस होते. ज्याला भेटायला गेलो त्याचं कसलंतरी ऑपरेशन झालं होतं. तेवढं एक सोडलं तर बाकी गड्याची प्रकृती उत्तम होती. लोक त्याला भेटायला येत होते. येताना फळं, नारळपाणी असं काही ना काही घेऊन येत होते. तो गडीही सर्वांशी हसून संवाद साधत होता. मी याच हॉस्पिटलमध्ये का आलो, डॉक्टर किती हुशार आहेत, नर्स वगैरे सगळे वेळच्या वेळी कसे लक्ष देतात, डॉक्टरांचे किती अन केव्हा राउंड होतात अशा अनेक गोष्टी तो रसभरीत वर्णन करून सांगत होता. मला त्याचा हेवा वाटला. जिथे सगळे लोक दवाखाना नको म्हणून म्हणतात, डॉक्टर किती बिल काढतात वगैरे बद्दल तक्रार करतात, तिथे हा गडी भलताच आनंदी दिसला. मनात म्हटलं, "अगदी सगळंच काही वाईट नसतं. असंही आशादायक चित्र असू शकतं तर !"

तिथलं वातावरण बघून माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली. एसी सुरु असल्यामुळे छान थंड वातावरण होतं. कमालीची शांतता होती. आजूबाजूचे एकदोन बेड रिकामेच होते. त्यावर स्वच्छ पांढरी चादर घातलेली होती. म्हटलं इथं थोडा वेळ पडायला मिळालं तर किती छान होईल ! एक मस्त झोप होईल. घरी किती व्यत्यय येतात ? अहो, उठा... झोपला काय ? ही काय वेळ आहे का झोपायची वगरे ?अशी वाक्ये हमखास कानावर येतात. एकदोन वेळा तर असा विचारही मनात आला की जवळ जाऊन डॉक्टर किंवा नर्सला विचारावे की, "तपासणी फी नको, औषधं नको, फक्त एक तासाचा बेड चार्ज किती घ्याल ते सांगा!" हॉस्पिटलला जोडधंदा म्हणून 'रिलॅक्सेशन सेंटर' सुरू करायला काय हरकत आहे? पण मग विचार केला," आपण असा विचार करतो पण व्हायचे भलतेच! त्यांनी चुकून माझी चौकशी करून मला थेट 'मानसोपचार' विभागात दाखल करायचा सल्ला दिला तर व्हायची  पंचाईत! लेने के देने पड जायेंगे ! त्यामुळे मन आवरलं आणि बाहेर पडलो. 

आमच्या चाळीसगावच्या वाचनालयात बऱ्याच वेळा नवीन पुस्तकांचं आगमन होतं. नवीन पुस्तके आली की ग्रंथपाल मला त्या पुस्तकांचं सिलेक्शन करण्यासाठी बोलावतात. छान टेबल, खुर्चीची व्यवस्था असते. डोक्यावर फॅन असतो. मधून मधून चहा-कॉफीची व्यवस्था होते. शांत वातावरण असतं. ती वेगवेगळी नवी कोरी पुस्तकं मला अतिशय आकर्षित करतात. बऱ्याच वेळेला त्या पुस्तकांचं सिलेक्शन आपल्याला करायचं आहे हे विसरून मी ती पुस्तकं वाचायला सुरुवात करतो आणि मग ग्रंथपालांच्या ते लक्षात आल्यावर ते म्हणतात, " अहो सर, पुस्तकांचे सिलेक्शन करायचं आहे ना !" 

तिथली ती शांतता आणि मधून मधून पुढे येणारे चहा कॉफीचे कप पाहून वाटतं, देवानं सुख द्यावं ते असं ! घरी पुस्तक हातात धरायचा अवकाश की मागून आवाज येतोच,"अहो, जरा बाजारात जाऊन भाजी आणून देता का?" किंवा "वाचत काय बसलात, जरा तो पसारा आवरता का ? संध्याकाळी पाहुणे येणार आहेत." तिथे या ग्रंथालयात कसं, या काही भानगडी नसतात. पुस्तकांच्या दुनियेत मीच राजा असतो.

मला कोणी विचारलं की समजा, तुम्हाला रिकामा वेळ मिळाला आणि तुम्हाला हवी ती गोष्ट उपलब्ध करून दिली तर तुम्ही कशाची निवड कराल ? छे छे!भलतेच काही विचार डोक्यात आणू नका. तर मंडळी, मला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सोडून द्या. सोबत द्या माझ्या आवडीची काही पुस्तके. वाचण्यासाठी छान, शांत निवांत वातावरण आणि राहण्याची व्यवस्था ! बस आणखी काय हवे ? पण मला माहिती आहे की हे सगळं वाचून तुम्ही हसणार. मनात म्हणाल, "हा कोण शहाणा लागून गेला की याची एवढी व्यवस्था करायची ?" त्यामुळे ही गोष्ट मी मनातच ठेवून आहे. पण तुम्हाला म्हणून मी विश्वासाने हे सांगितले आहे! अर्थात माझ्या पद्धतीने जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा जमेल तशी मी माझी ही हौस भागवतोच !

नुकतंच आम्ही एका ट्रीपला जाऊन आलो. मस्त थंड हवेचं ठिकाण होतं. जाऊ द्या ना, तुमची उत्सुकता फार ताणत नाही, नाव सांगून टाकतो. तर आमची नैनिताल ट्रीप होती. पण आमची राहण्याची व्यवस्था नैनितालपासून थोडं दूर असलेल्या भीमताल या ठिकाणी करण्यात आली होती. तिथलं वातावरण पाहून तर असं वाटलं की स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो अजून काय वेगळा असू शकेल ? समोर सुंदर तळं ! त्याच्यापाठीमागे हिमालयाची शिखरं. आजूबाजूला दाट झाडी. सगळं अगदी चित्रात असल्यासारखं वातावरण. सूर्योदय आणि सूर्यास्ताची तिथली शोभा काय वर्णावी !

ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्याच्यासमोरच हे सगळं निसर्गरम्य वातावरण होते. सकाळी नाश्त्याला विविध गरमागरम पदार्थांची रेलचेल. दुपारी आणि रात्री रसना तृप्त करील असं जेवण. माणसाला आणखी काय हवं असतं ? असं वाटलं आता कशाला पुन्हा आपल्या शहराच्या गडबडीच्या, गोंधळाच्या आणि प्रदूषित वातावरणात जायचं ? बस, इथेच राहावं. महिन्याचे किंवा वर्षाचे काय जे पैसे लागतील ते लागतील. एकदा वाटलं की हॉटेलच्या मॅनेजरला विचारावं, "महिनाभराचे काय पॅकेज द्याल मला इथे राहण्याचे ?" पण अचानक खिशाला हात लावला आणि लक्षात आले की, बँक बॅलन्स आणि भीमतालचे बिल यात 'जमीन-अस्मानाचा' फरक आहे ! या हिमालयाच्या शिखरांकडे पाहत राहणे फुकट आहे, पण तिथल्या बेडवर राहणे महागात पडेल. हॉटेलच्या बिलाचा दणका भीमाच्या गदेसारखा पाठीवर बसेल हे ओळखून मी मन आवरले. सगळे निघाले, मग मलाही त्यांच्याबरोबर निघावंच लागलं. 

असं कधीही माझ्या मनात काही येतं. तरी मी माझ्या मनातील दोन-तीन गोष्टीच फक्त तुम्हाला सांगितल्या आहेत. अहो, प्रत्यक्षात नाही जमलं तरी कल्पना करायला काय हरकत आहे ?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१७/५/२०२६

प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...