उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८०
धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।
तरा दुस्तरा त्या परा सागराते ।
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।
करा नीकरा त्या खरा मछराते ।।८०।।
अर्थ
हे मना, श्रीमहादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या सीतापती श्रीरामांना आपल्या हृदयात धारण कर. श्रीरामांना अखंड हृदयी धारण करून पार करण्यास अतिशय कठीण असा संसाररूपी सागर तरून जा. जे कितीही भरले तरी अपूर्णच राहते अशा पोटाला (संसाराला )विसरून जा. मत्सराशी निग्रहपूर्वक झगडून साधुसंतांनी सांगितलेल्या मार्गाने जा.
( श्रीवरा - सीतापती श्रीराम /लक्ष्मीपती विष्णू, हरा अंतराते - महादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या, दुस्तर - कठीण, परा - मोठा, सरा - अंश/छटा, दुर्भर - भरण्यास अतिशय कठीण, नीकरा - प्रयत्नपूर्वक/हट्टाने, खर - गाढव, मच्छराते - मत्सर )
या श्लोकाची रचना भाषिक दृष्टया फार सुंदर आहे. ' र ' या अक्षराची पुनरावृत्ती झाल्याने अनुप्रास अलंकार साधला गेला आहे. त्याशिवाय रचनेत सहजता आहे. श्रीवर म्हणजे भगवान विष्णू. श्री म्हणजे लक्ष्मी. राम हाही विष्णूचाच अवतार असल्याने येथे सीतापती राम असा देखील अर्थ घेता येतो. अशा या भगवंताला आपल्या हृदयात प्रत्यक्ष महादेव धारण करतात. त्या भगवंताला आपणही आपल्या हृदयी धारण करावे. श्रीरामांची योग्यता किंवा महती एवढी थोर की प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव त्यांना आपल्या हृदयात स्थान देतात. त्यांचे ध्यान करतात. त्यामानाने आपण तर सामान्य माणसे ! तेव्हा अशा या भगवंताला आपण देखील आपल्या हृदयात स्थान द्यावे.
समर्थ संसाराला संसार सागर म्हणतात. एक वेळ एखादी नदी पोहून पार करणे सोपे पण सागर पार करणे महाकठीण. हनुमंत सागर पार करून लंकेला पोहोचला होता. त्याने हृदयात रामनाम धारण केले होते. रामनाम ही एक अशी नौका आहे की जी आपल्याला हा महाकठीण असलेला भवसागर पार करण्यासाठी साहाय्यभूत ठरते. जो या नौकेत बसला, तो हा भवसागर तरून गेला.
पण हा भवसागर म्हणजे एक मायाजाल आहे. ते भल्याभल्यांना सोडवत नाही. भगवंताची माया अत्यंत प्रबळ आहे. एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात मासे अडकावेत तसा माणूस या मायेच्या जाळ्यात अडकतो. रामकृष्ण परमहंसांनी याबाबत बोलताना एका ठिकाणी अतिशय सुंदर दाखला दिला आहे. ते म्हणतात जे मासे कोळ्याच्या अवतीभवती असतात, ते जाळ्यात अडकतात. पण जे मासे कोळ्याच्या पायाजवळ असतात, ते मात्र जाळ्यात अडकत नाहीत. आपण संसारी माणसे म्हणजे या संसारसागरातील मासे. मायारूपी जाळ्यात आपण अडकतो. पण आपण जर भगवंताच्या पायाशी राहिलो, त्याचे चरण जवळ केले तर मायेच्या जाळ्यातून आपण सहीसलामत सुटू शकतो.
देवाने आपल्याला पोट दिले आहे. पोट ही अशी गोष्ट आहे की ती कधी भरतच नाही. अग्निमध्ये आहुती टाकल्यानंतर अग्नी आणखी प्रज्वलित होतो. तसेच हे आहे. संसाराची आसक्ती देखील अशीच आहे. ती कधीच संपत नाही. म्हणून ती थोडी का होईना पण विसरण्याचा प्रयत्न करावा. ते सोपे नाही. पण भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती बाजूला ठेवता आली पाहिजे.
आपली संसाराची हाव कधी संपत नाही. ' हवेपण ' सुरूच राहते. त्यातून मग एखादी गोष्ट नाही मिळाली आणि ती दुसऱ्याकडे असेल तर मत्सर किंवा द्वेष निर्माण होतो. मत्सराला काही कारण लागत नाही. म्हणून त्याची तुलना समर्थ गाढवाशी करतात. परमार्थात तर मत्सर अतिशय हानिकारक. तेव्हा अशा मत्सराचा निकराने म्हणजे सर्वशक्तीनिशी सामना करायला हवा. त्यासाठी विवेक आणि वैराग्य ही दोन प्रभावी शस्त्रे आहेत. मत्सर आणि संसाराची आसक्ती टाकून देऊन श्रीरामाला हृदयी धारण करा म्हणजे हा भवसागर तरून जाल असे समर्थांचे सांगणे आहे. ' नाम आहे आदी अंती, नाम सर्व सार, आहे बुडत्याला नौका ठेवली आधार.'
स्वसंवाद
१. मी या संसारसागरात 'मायेच्या जाळ्यात' अडकलो आहे हे मला जाणवते का ?
२. "कितीही दिले तरी न भरणारे हे दुर्भर पोट (आसक्ती)" याच्या मागे धावताना, मी कधी समाधानाचा अनुभव घेतला आहे का?
३. जेव्हा मला एखादी गोष्ट मिळत नाही आणि ती दुसऱ्याकडे दिसते, तेव्हा माझ्या मनात नकळत 'मत्सर' निर्माण होतो का ?
४.संसाररूपी जाळ्यातून सहीसलामत सुटण्यासाठी माझ्या ठायी भगवंताप्रती अनन्य शरणागती आहे का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा