मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ६७

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६७

घनःश्याम हा राम लावण्यरूपी ।

महा धीर गंभीर पूर्णप्रतापी ।

करी संकटी सेवकाचा कुडावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६७।।

अर्थ 

पावसाळी मेघाप्रमाणे श्यामल वर्ण हा राम अत्यंत सुंदर आहे. तो महा धैर्यवान आणि गंभीर असा असून अत्यंत पराक्रमी आहे. संकटात आपल्या भक्ताचे तो रक्षण करतो. अशा या श्रीरामाचे पहाटे चिंतन करावे. 

( कुडावा - रक्षण )

विवेचन 

मनाच्या श्लोकांमधील श्लोक ६६ ते ७६ हा दहा श्लोकांचा एक वेगळा गट आहे. याचे वैशिष्ट्य असे की या श्लोकांमध्ये समर्थ रामाच्या सगुण रूपाचे वर्णन करतात. आपल्याला त्याचे ध्यान करायला सांगतात. परमेश्वराची निर्गुण भक्ती ही श्रेष्ठ आणि सूक्ष्म मानली जाते. परंतु सगुण भक्ती आपल्यासारख्या सामान्य साधकांसाठी सुलभ आहे. म्हणून सुरुवात करायची झाली तर ती सगुण भक्तीपासून करावी. या पृथ्वीवर आपण देह धारण करून आलो आहोत. परमेश्वर देखील जेव्हा जेव्हा या धरतीवर अवतीर्ण झाला तेव्हा तेव्हा त्याने देह धारण करूनच आपले कार्य केले. त्यामुळे परमेश्वराच्या सगुण रूपाची कल्पना करणे आपल्याला सोपे जाते. म्हणूनच समर्थ या दहा श्लोकांच्या माध्यमातून श्रीरामाचे ( परमेश्वराचे ) सगुण रूप आपल्यासमोर ठेवताहेत. 

श्रीरामाचे रूप कसे आहे ? तर पावसाळी मेघाप्रमाणे सावळा. ' सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी...' त्या सावळ्या रंगात विलक्षण सौंदर्य आहे. वेद आणि पुराणात वर्णिल्याप्रमाणे आपले बहुतेक देव सावळेच आहेत. विष्णू, विठ्ठल, श्रीराम हे सावळेच आहेत. ' सावळे सुंदर, रूप मनोहर. राहो निरंतर हृदयी माझ्या...' असे संत तुकाराम म्हणतात. तेच समर्थ आपल्याला सांगत आहेत. श्रीरामाचे रूप वर्णन करताना समर्थांनी राम सुंदर आहे असे न म्हणता लावण्यरूपी असे म्हटले आहे. ' लावण्य ' या शब्दात आणखी खोल, गहन असा अर्थ आहे. त्यात माधुर्य आहे. म्हणून संतांनी देखील विठ्ठलाला लावण्याचा गाभा असे म्हटले आहे. 

या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत समर्थ श्रीरामाचे गुण वर्णन करताना म्हणतात, ' महा धीर गंभीर पूर्णप्रतापी.' ' महा ' हे विशेषण धीर आणि गंभीर या दोन्ही शब्दांसाठी लागू होते. तो अत्यंत धैर्यशाली आहे. तसेच तो अत्यंत गंभीर देखील आहे. इथे गंभीर या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही. तर जीवनातील सर्व संकटांचा सामना करताना जे धैर्य आणि गांभीर्य लागते, त्या अर्थाने हा शब्द इथे आला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीरामांचे धैर्य आणि शौर्य  सागराप्रमाणे अपार आहे. सागराजवळ अमर्याद जलसाठा आहे. पण तरीही तो आपले गांभीर्य म्हणजेच आपली मर्यादा सोडत नाही. तसेच सर्वगुणसंपन्न श्रीराम आहेत. ते पूर्णप्रतापी आहेत म्हणजे अत्यंत पराक्रमी आहेत. श्रीराम म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, धैर्य आणि गांभीर्य, पराक्रम ! असे अनेकविध गुण त्याच्या ठिकाणी वसतात.

अशा या धीर गंभीर आणि पूर्णप्रतापी श्रीरामांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या सेवकाच्या संकटात धावून जातात, त्याचे रक्षण करतात. ते भक्तवत्सल आहेत. ज्या ज्या भक्तांनी संकटकाळी त्यांचा धावा केला, त्यांच्या साहाय्याला ते तात्काळ धावून गेले आहेत. पण परमेश्वरावर दृढ श्रद्धा हवी. त्यासाठी परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती करावी लागते. अनन्यभावाने म्हणजे ' हे परमेश्वरा, मला तुझ्याशिवाय कोणी त्राता नाही. तूच माझे सर्वस्व आहेस.' अशा प्रकारची वृत्ती हवी. श्रीरामांचे किंवा श्रीकृष्णाचे भक्त हे अशा प्रकारचे होते. हनुमंताला तर एका रामाशिवाय दुसरे काहीच नको होते. अशा या रामाचे ( भगवंताचे ) पहाटे चिंतन करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत. 

रात्रीची शांत निद्रा आटोपली की पहाटेच्या वेळी आपले मन एखाद्या नदीच्या डोहासारखे शांत असते. पाणी जर स्वच्छ आणि शांत असेल तर त्यात आपले प्रतिबिंब दिसते. त्याचा तळ दिसतो. पहाटेच्या वेळी अशा शांत आणि इतर विचारांची गर्दी नसलेल्या मनात रामाचे चिंतन करावे. त्याचेच प्रतिबिंब आपल्या मनात पडावे. सकाळ जर अशी पवित्र आणि सुंदर झाली तर दिवसही चांगला जाईल. आपण जेव्हा त्याचे चिंतन करू तेव्हा त्याचे रूप आणि गुण आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. आपली सकाळ मोबाईल, टीव्ही किंवा वर्तमानपत्रांच्या बातम्याने बऱ्याच वेळा होते. त्यातील अपघात, खून, दरोडे, अत्याचार, राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप  इ. नकारात्मक बातम्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात न करता श्रीरामाच्या चिंतनानेच करावी. 

स्वसंवाद

१) माझ्या दिवसाची सुरुवात कोणत्या विचारांनी होते ? चिंतेने की चिंतनाने?
२) पहाटेच्या शांत वेळेत मी स्वतःसाठी आणि भगवंतासाठी काही क्षण राखून ठेवतो का?
३) संकटसमयी माझी भिस्त भगवंतावर असते का ?
४) मी दिवसभरात जास्त कोणत्या गोष्टी मनात साठवतो ? नकारात्मक बातम्या की सकारात्मक चिंतन?
५) रामाचे धैर्य, गांभीर्य आणि करुणा हे गुण माझ्यातही यावेत असे मला वाटते का ? (क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१५/०५/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासह अग्रेषित करावा )






















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...