मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ६४

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६४

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।

अती काम त्या राम चित्ती वसेना ।

अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।

अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ।६४।

अर्थ  

मूढ म्हणजे मूर्ख मनुष्य. अशा व्यक्तीला आपले हित कशात आहे हे कळत नाही. त्याच्याजवळ साहजिकच दृढ बुद्धी म्हणजे निश्चयाचा अभाव असतो. ज्याच्या मनामध्ये विषयवासना मोठ्या प्रमाणात घर करून असतात, त्याच्या मनात साहजिकच भगवंताला स्थान मिळणे शक्य नसते. अती लोभी माणसाला शेवटी क्षोभाला म्हणजे क्रोधाला सामोरे जावे लागते. विषय विकारांच्या अती अधीन  झालेला माणूस लाचार आणि दीनवाणा असतो.

विवेचन 

' अति सर्वत्र वर्जयेत 'असे संस्कृत वचन आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो सर्वनाशाला कारणीभूत होतो. एखादी गोष्ट आरोग्याला हितकारक जरी असली तरी तिचा अतिरेक झाला तर तो घातक ठरतो. उत्तम प्रकृतीसाठी शरीराला व्यायाम आवश्यक असतो. पण त्याचा अतिरेक झाला तर अंतिमतः हानीच होते. त्याप्रमाणे सर्वच गोष्टींचे आहे. अती खाणे, अती बोलणे, अती निद्रा, अती उर्मटपणा अशी कोणतीही गोष्ट अती झाली की नुकसानच होते.'अती तिथे माती ' असे आपण म्हणतो ते यामुळेच. 

कामवासना किंवा विषय सेवन आपल्या आयुष्यात जेवढे आवश्यक असते, तेवढे करण्याची परवानगी आपल्याला आपली संस्कृती देते. त्यासाठी एक विशिष्ट चौकट आपल्या संस्कृतीने आखून दिलेली आहे. त्यासाठी विवाह संस्कार आहे. तात्पर्य एका मर्यादेत विषय सेवन शास्त्रास मान्य आहे. परंतु विषय सुखाच्या अधीन होऊन त्यापलीकडे दुसरे काहीच न दिसणे हे तामसी वृत्तीचे लक्षण आहे. पशुसुद्धा आवश्यक तेवढाच कामवासनेचा आधार घेतात. प्रजोत्पादन हे त्यांचे उद्दिष्ट असते. परंतु माणूस मात्र कोणतीही मर्यादा पाळत नाही. कामातुराणां न भयं न लज्जा असे एक संस्कृत वचन आहे. सध्या विविध माध्यमांमुळे माणसांच्या वासना भडकवल्या जातात. त्यांचा अतिरेक झाला तर काय होते याचे प्रत्यंतर आपल्याला रोजच्या बातम्या पाहिल्या तरी येते.

अती विषयी माणूस हा मूढ बुद्धी असतो. मूढ बुद्धी म्हणजे आपल्या हिताचे न कळणारा. त्याला कोणी कितीही समजावून सांगितले तरी ते पटत नाही. पटले तरी ऐकण्याची तयारी नसते. रावण हा स्त्रीलंपट होता. विषयलोभी होता. त्यातूनच त्याने सीतेसारख्या पतिव्रतेला उचलून आणण्याचे पातक केले. बिभीषण, मंदोदरी आदींनी त्याला वेळोवेळी समजावून सांगितले पण त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असल्याने त्याला आपल्या हिताचा सल्ला देखील रुचला नाही. 

ज्यांच्या मनात सदैव विषयवासनेनेच ठाण मांडलेले असते, त्यांच्या चित्तात राम म्हणजे भगवंत राहीलच कसा ? परमेश्वर प्राप्तीसाठी शुद्ध आणि निर्मळ चित्त हवे. बऱ्याच वेळा अशी काही माणसे भगवंताचे नाम घेताना दिसतात. पण ते लोकांची दिशाभूल करीत असतात. त्यांचा अंतर्गत हेतू वेगळाच असतो. मुहमें राम बगलमे छुरी अशी स्थिती असते. अशा माणसांपासून सावध राहिलेले बरे. 

जशी अवस्था अती कामी माणसाची होते, तशीच अवस्था अती लोभी माणसाची होते. अग्नीत जेवढे तूप टाकले तेवढा तो अधिक प्रज्वलित होतो. काम आणि लोभ यांचे देखील असेच आहे. कुठे थांबायचे हे कळत नाही. गरज आणि लोभ यात अंतर आहे. गरजा मर्यादित असतात. लोभ किंवा हाव यांना कोणतीही मर्यादा नसते. लोभापोटी माणसाच्या हातून अनेक अपराध आणि नको त्या गोष्टी घडतात. आपल्या प्रपंचासाठी जेवढे आवश्यक तेवढे मिळवणे हे प्रापंचिक माणसाचे कर्तव्यच आहे. ते देखील योग्य मार्गाने ! पण लोभी माणसाचा विवेक हरवलेला असतो. त्यामुळे माझे ते माझे पण तुझे तेही माझेच अशी त्याची वृत्ती होते. येनकेन मार्गाने तो ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी या गोष्टींची हाव माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाते आणि त्याचे अध :पतन घडवून आणते. 

आपल्याला हवी ती गोष्ट नाही मिळाली की मग अशा माणसांचा संताप होतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, ' अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा.' दुर्योधनाला राज्य आणि सत्तेची एवढी हाव होती की त्याने पांडवांच्या हिश्याचे राज्य तर सोडाच परंतु त्यांना पाच गावेही देण्यास नकार दिला. दुष्ट शकुनीच्या बदसल्ल्याला तो बळी पडली. त्याच्या हिताचे सांगणाऱ्या भीष्म, विदुर, श्रीकृष्ण आदींच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे त्याला मनःशांती नव्हती. त्याचे चित्त क्षोभाने व्यापलेले होते. शेवटी सत्ता आणि संपत्ती यांच्या अतिलोभाने त्याचा घातच केला. 

म्हणूनच दासबोधात समर्थ सांगतात की ' अती सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहुनि वर्तावे.' धर्माने घालून दिलेल्या मर्यादेत सर्व गोष्टींचा उपभोग घ्यावा. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ' सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी तोचि तो मानवी धन्य होतो.' असेच वागणे आपल्या हिताचे आहे. जे अती विषयी माणसे असतात त्यांची अवस्था व्यवहारात अत्यंत दीनवाणी होते. त्यांना किंमत राहत नाही असे समर्थ म्हणतात. दैनंदिन जीवनातही अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यांच्या लोभ किंवा कामवासनेच्या अतिरेकामुळे लोकांमध्ये त्यांची छी थू होते. माणूस जेव्हा विषयांच्या अधीन होतो, तेव्हा तो त्याचा मालक न राहता गुलाम होतो. मग ही गुलामगिरी त्याला वाटेल तसे वागण्यास भाग पाडते. त्यात आपण लाचार किंवा दैन्यवाणे होत जात आहोत हेही त्याच्या लक्षात येत नाही. 

स्वसंवाद

१. माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीचा 'अतिरेक' होतोय का? (उदा. सोशल मीडिया, खाणे, राग किंवा कामाचा अट्टाहास) 

२. माझी कोणतीही कृती ही 'गरज' आहे की 'लोभ', हे मी ओळखू शकतो का?

 ३. जेव्हा मला माझ्या आवडीची गोष्ट मिळत नाही, तेव्हा माझ्यात 'क्षोभ' (राग) निर्माण होतो का? तो शांत करण्यासाठी मी काय करतो? 

४. माझे चित्त 'निर्मळ' ठेवण्यासाठी मी दिवसातला किती वेळ स्वतःला आणि परमेश्वर चिंतनाला देतो?

Ⓒ विश्वास देशपांडे,चाळीसगाव 

५/५/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...